Sunday, November 29, 2015

कुत्र्याची उपमा

आटपाट नगरच्या राजाने आपल्या रुग्णालयांचा प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून प्रथेप्रमाणे  दरबारातील सर्वात वयोव्रुद्ध व्यक्तीला नेमले होते. या नेमणूकीत ज्ञान किंवा कार्यक्षमता यापेक्षा जास्त सेवाकाळ पदरी असणे आणि राज्यांतील राजाकारण्यांच्या मर्जीत असणे ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या असत. त्यामुळे कूपनलिका खोदणारी (ज्याला आंग्लभाषेत one who drills a borewell असे म्हणतात) व्यक्ती या पदावर विराजमान झाली होती. जरी तिचा वैद्यकशास्त्राशी काडीचाही संबंध नव्हता आणि त्याचे कणभरही ज्ञान नव्हते तरी ही व्यक्ती आपण म्हणजे कोण अशा अविर्भावात वागत असे, आणि अतिशय कुशल व ज्ञानी अशा व्यक्तींवर मोठमोठ्या आवाजांत ओरडून त्यांचा पाणउतारा करत असे. शिक्षणकाळात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याची पात्रता नसल्यामुळे तिला कूपनलिका खोदणे हे काम अंगिकारावे लागले होते. आता प्रथितयश वैद्यांचा पाणउतारा करून ती स्वतःचे श्रेष्ठत्व स्वतःला आणि इतरांना सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असे रुग्णालयांतले लोक न्हणत असत.
त्या दिवशी राजवैद्य रुग्णालयाच्या मार्गिकेतून जात असतांना खालील संंभाषण त्यांच्या कानांवर पडले.
"मी माझ्या बदलीसाठी रुग्णालयाप्रमुखाच्या कार्यालयांत गेले होते. प्रमुख तर कोणत्यातरी पूजेसाठी की उद्घाटनासाठी गेले होते. मग मी त्यांच्या स्वीय सहायकाना भेटले. ते म्हणाले की त्यांच्या हातात काहीच नव्हते. ते प्रमुखांबरोबर आपण होऊन काही बोलायलाही जात नसत कारण ते कुत्रासारखे वागायचे."
"वाईट माणसे कुत्र्याला वागवतात तसे की कुत्रा वागतो तसे?"
"कुत्रा भुंकतो आणि अंगावर येतो तसे".
"अरे अरे. विनाकारण श्वानवंशाची बदनामी केली ना?"
राजवैद्य चपापले. प्रमुखांबद्दल कर्मचारी असे उघडपणे बोलतात तर, आपण बोलतो त्या विषयाचा गंधही नसताना हेच प्रमुख एकदा राजवैद्यांसारख्या ज्ञानी व्यक्तीच्या अंगावरही असेच भुंकले होते ते त्यांना आठवले. त्यानंतर त्यांनीही प्रमुखांना टाळणेच पसंत केले होते.मूर्खाच्या नादी न लागण्यात शहाणपणा असतो हे त्यांना माहीत होते.
"प्रमुख असे वागतात म्हणून सर्व जण कंटाळले आहेत" संभाषण पुढे चालू होते. "त्यांचा सेवानिव्रुत्तीचा दिवस कधी येतो त्याची प्रतीक्षा करत आहेत. कधी कधी तर वाटते की ते काहीतरी होऊन पटकन मरून गेले तर बरे."
राजवैद्यांना हेही नवे होते. कोणाच्या सेवानिवॄत्तीची किंवा मरणाची लोक वाट बघतात हे त्या व्यक्तीला अगदी लांछनास्पद आहे असे त्यांच्या मनात आले. ते दोघे जण त्यानंतर आपल्या मार्गाने गेले, त्यामुळे पुढील संभाषण राजवैद्यांना ऐकू आले नाही. येव्हढ्या लोकांचे शिव्याशाप स्वतःतील कमतरतेमुळे घेण्यापेक्षा मरून जाणे वरे असे त्यांच्या मनांत आले. 

Friday, November 27, 2015

असत्यं वचनम् प्रियम्

आटपाट नगरच्या राजवैद्यांना कलियुग चालू आहे हे माहित होते, पण ते आपल्या रुग्णालयातल्या वरिष्ठ वैद्यांवर येव्हढा परिणाम करणारे असेल असे वाटले नव्हते.
"गुरुजी, आज माझा मोठा भ्रमनिरास झाला" राजवैद्य म्हणाले. "मोठ्या हुद्द्यावरच्या व्यक्ती असत्य बोलत असतील असे मला पूर्वी स्वप्नांतही खरे वाटले नसते."
"आपल्या परिचयाची कोणी व्यक्ती असे खोटे बोलली काय?" गुरुजींनी विचारले.
"होय हो. इतर वैद्य या वैद्यांच्या असत्यवचनाबद्दल बोलत असत, पण मला ते कधी खरे वाटले नव्हते. काय झाले, आमचे प्रशिक्षणार्थी निवासी वैद्य संपावर गेले. राजाच्या हुकुमाप्रमाणे असा संप झाला की आम्हा वैद्यांच्या सर्व रजा रद्द होतात. आम्ही संपकर्‍यांना आदेश दिले की संप होणार असे नक्की ठरले की आपापल्या प्रमुख वैद्यांना दूरध्वनी करून तसे क्ळवा. म्हणजे दुसर्‍या दिवशी ते सगळे कामावर येतील आणि रुग्णसेवा करतील. त्याप्रमाणे एक वैद्य सोडून इतर सर्व वैद्य कामावर आले. न आलेल्या वैद्य रजेवर होत्या. त्यांना कळविले का असे विचारल्यावर त्यांचा निवासी वैद्य म्हणाला की त्यांचा दूरध्वनी लागत नाही. या विधानाच्या सत्यतेबद्दल इतरांनी शंका व्यक्त केली म्हणून आम्ही प्रयत्न केला तेव्हा असे लक्षांत आले की दूरध्वनी जुळत होता, पण वैद्य प्रतिसाद देत नव्हत्या. आम्ही त्या निवासी वैद्याला वेगवेगळ्या प्रकारे विचारले तेव्हा निष्पन्न झाले की त्याने दूरध्वनी करून वरिष्ठ वैद्यांना संपाची कल्पना दिली होती व कामावर रुजू होण्याचा निरोपही दिला होता. तेव्हा आपल्याला संपर्क झाला नाही असे तू सर्वांना सांग असे त्यांनी त्याला सांगितले व त्याप्रमाणे त्याने केले. आम्हाला हे समजले आहे हे त्या वैद्य बाईंना नंतर समजले व त्यांनी आम्हाला दूरध्वनी करून आपण त्या गावच्याच नाही असा बहाणा केला अणि संपाबद्दल आत्ताच समजले व आपण लगेच कामावर येतो असे सांगितले. त्या कामावर आल्या तेव्हा सकाळचे काम इतरांनी करून पूर्ण केले होते. खोटे बोलण्याचे कारण विचारले तेव्हा त्यांनी आणखी इतर असत्य वचनेही केली आणि बचावाचा प्रयत्न केला."
"फारच वाईट" गुरुजी म्हणाले.
"ते तर झालेच. पण असे खोटे बोलणे यांत गैर असे काही नाही अशी शिकवण त्या निवासी वैद्याला मिळाली. या वैद्य बाई घरातल्या मुलांवर असेच संस्कार करत असणार असे आम्हाला वाटते आहे. उद्याची पिढी कशी घडते आहे ते बघून आम्हाला भविष्याची चिंता वाटते आहे."
यावर काय बोलायचे ते गुरुजींना सुचले नाही. राजवैद्यांसारखी भीती आता त्यांनाही वाटायला लागली.

Wednesday, November 25, 2015

वातकुक्कुट




वाचकहो.
मी येथे वातकुक्कुट गोल गोल फिरवले आहे खरे, पण त्या बरोबर माझी छायाचित्रही गोल गोल फिरायला लागली ना. माझी छायाचित्रे स्थिर ठेवून फक्त वातकुक्कुटच कसे फिरवायचे ते माझ्या लक्षात येत नाही आहे. आपल्याला ते कसे करावयाचे ते सुचले तर क्रुपया कळवा. नाहीतरी घटकाभराची करमणूक म्हणून ते तसेच सोडून पुढे जायला हरकत नाही.







(Key words: weather vane, Y-axis rotation, HTML, Javascript)

Monday, November 23, 2015

दुष्काळाचे गणित

"यंदा पाऊस खूपच कमी प्रमाणात झालाय. पाणी जपून वापरायला हवे" आटपाट नगरचे महाराज म्हणाले. "आपण काय कार्यवाही केली?"
"महाराज, वेगवेगळ्या वॉर्डांचा पाणीपुरवठा तीस टक्के कमी केला आहे" अमा्त्य म्हणाले.
"आणि आपल्या रुग्णालयांत काय केले आहे?"
"सर्वांनी पाणी जपून वापरावे म्हणून परिपत्रक काढले आहे."
राजवैद्य शांतपणे सर्व ऐकत होते. सकाळी एका कक्षाच्या प्रमुख परिचारिकेने केलेली तक्रार त्यांना आठवली. 'तीन दिवस झाले. वरच्या मजल्यावरच्या कक्षाच्या स्नानगॄहांतून आमच्या कक्षाबाहेर धो धो पाणी वहात आहे. अभियांत्रिकी विभागाला तीन वेळा पाचारण केले. आत्ता येतो असे म्हणतात पण कोणीही फिरकत नाही.' पिण्यासाठी पाणी नाही म्हणून माणसे देशोधडीला लागली आहेत, आणि येथे बेफिकीरीमुळे किती पाण्याची नासाडी होते आहे, असे त्यांचा मनांत आले. त्यांनी स्वतः अभियांत्रिकी विभागात दूरध्वनी केला. पण उपयोग झाला की नाही ते मात्र त्या जगन्नियंत्यालाच ठाऊक. समोरच्या इमारतीतून पंप लावून हजारो लिटर पाणी गेले दोन दिवस उपसून बाहेर टाकत होते तेही त्यांना आठवले. ते दूरध्वनी करून कोणाला कळवायचे ते माहीत नसल्यामुळे  ते गप्पच राहिले होते. शेवटी तिसर्‍या दिवशी ते थांबले.


विषय निघाला त्यावरून राजवैद्यांना पूर्वीच्या एका दुष्काळाची आठवण आली आणि मनाची खपली निघाली. कर्करोग झाला त्याच्या उपचारांसाठी त्यांची काकी अकस्मात त्यांच्या घरी काकांसह आली होती. महिनाभर मुक्काम ठोकून, बरी होऊन परत गेली होती. काकी म्हणून राजवैद्यांनी सर्व काही केले होते. पु्नःतपासणीसाठी दोघे परत आले तेव्हा शहरात पाऊस सुरूच होत नव्हता. नक्षत्रे कोरडी जात होती. सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले होते. काका-काकी राजवैद्यांच्या घरीच मुक्काम ठोकून होते. 'आता पाऊस आला नाही तर आम्ही सर्व जण पाण्यासाठी गावाला तुमच्या धरी येतो' असे राजवैद्यांच्या मातोश्री काका-काकींना सहज म्हणाल्या. क्षणभरही विचार न करता काकी म्हणाल्या, 'पाणी आम्ही देऊ, पण धान्य वगैरे तुम्ही भरा हो'. हक्काने आपल्या घरी येऊन, महिन्यामागून महिने आपल्याच खर्चात काढून, आपलेच सर्व काही फुकट वापरून, वर काकींनी असे म्हणावे हे राजवैद्यांच्या जिव्हारी लागले. पाण्यासाठी कोणीही गावाला गेले नाही. कालांतराने काका-काकी वयोपरत्वे वारले. पण पाऊस पडला नाही की राजवैद्यांची जुनी जखम परत भळभळ वाहू लागे.
(Key words: Drought, water wastage)

Saturday, November 21, 2015

जोडलेली मने

गुरुजींचा एक जुना मित्र त्यांना खूप दिवसांनी भेटला. क्षेमकुशल विचारून झाले. घरच्यांची विचारपूस करून झाली. कामकाजासंबंधी चौकशी करून झाली. मित्र गुरुजींना भेटून आनंदला होता खरा, पण पूर्वीसारखा आनंदी वाटत नव्हता.
"मित्रा, तुझ्या मनाला काहीतरी त्रास होतो आहे" गुरुजी म्हणाले. "आपल्या विद्यार्थीदशेत होतास तसा आता तू आनंदी वाटत नाहीयेस."
"काय सांगू रे" मित्र म्हणाला. "बोलून काही फायदा होईल असे वाटत नाही."
"प्रयत्न तर करून पहा" गुरुजी म्हणाले.
"कामाच्या मागे वेळ कसा जातो समजत नाही. पैसा खूप कमावला, पण माणसे पूर्वीसारखी जोडलेली रहात नाहीत."
"अरे, तो जीवनाचा नियमच आहे. तरीपण लोकांबरोबर जोडलेले रहाण्यासाठी तू काय काय केलेस ते तर सांग."
"मोबाईल फोन आले तेव्हा नोकिआ कंपनीची जाहिरात पाहिली. 'Nokia, connecting people'. हातांत गुंफलेला हात होता त्या जाहिरातीत. पटकन जाऊन एक फोन घेऊन आलो."
"मग प्रश्न सुटला असेल?" गुरुजी म्हणाले.
"छे रे! ईमेल वापरायचो. त्यानेही काही फरक पडला नाही. संपर्कात बरेच जण होते. पण काहीबाही एकीकडून आलेले इतरांना फॉर्वर्ड करणे या पलिकडे काही होईना. मग स्मार्ट फोन आले. ते व्हॉट्सऍप माझ्या प्रश्नाचे उत्तर आहे असे परिचीत म्हणाले. झाले. जाऊन एक स्मार्ट फोन घेऊन आलो. व्हॉट्सऍप घातले. पूर्वी फॉरवर्ड केलेल्या ईमेल्स यायच्या त्यांची जागा कालापव्यय करणार्‍या चुटक्यांनी, गोष्टींनी, व्हिडियो क्लिप्सनी घेतली. माणसे काही जोडलेली राहीनात. आता मी काय करू सांग."
"बाबारे, एकमेकांना ईमेल आणि मेसेज करून कालापव्यय केल्यामुळे माणसे जोडलेली रहात नाहीत. संपर्काची साधने कोणतीही असोत, जर मने जुळलेली नसतील तर काही उपयोग नसतो. एकमेकांच्या आनंदाच्या प्रसंगी आनंद व्यक्त करणे, दुःखाच्या प्रसंगी सांत्वन करणे, अडीअडचणीला धावून जाणे, स्वार्थीपणे न वागणे यामुळे मने जुळतात आणि जुळलेली रहातात बघ."
मित्राने असे काही पूर्वी ऐकले नव्हते. आजच्या काळांत मोठे झालेल्या त्याच्या मुलाबाळांना तर या गोष्टीची कल्पना असण्याचे काही कारणच नव्हते. मनाशी काही निर्धार करून मित्र उठला, आणि म्हणाला, "मित्रा, तो पहिला मोबाईल फोन खरेदी करण्यापूर्वी तू भेटला असतास तर किती बरे झाले असते."

Thursday, November 19, 2015

पायघोळ अडचण

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयात शल्यक्रियागृहात प्रवेश करण्यापूर्वी आपले कपडे बदलून स्वच्छ हिरव्या रंगाचे सुती कपडे घालावे लागत असत. सदरा आणि पायजमा असा तो पेहेराव असे. जंतूसंसर्ग होण्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून हा नियम केला होता. कपडे रुग्णालय पुरवीत असे. ते रुग्णालयाचा धोबी धुवून देत असे. छोटे, मध्यम, मोठे असे भिन्न आकाराचे कपडे शिवण्याची तेथे पद्धत नव्हती. त्यामुळे माणूस कोणत्याही आकाराचा असो, त्याला मध्यम आकाराचे कपडे वापरावे लागत असत. स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी भिन्न आकाराचे किंवा प्रकारचे कपडे नसत. नाहीतरी तोंडाला शल्यक्रियेचे मास्क लावले की पुरुष आणि स्त्री यांतला फरक कोठे समजत असे? छोट्या चणीच्या स्त्रियांना यामुळे एक त्रास होत असे. सदरा जरा लांब झाला किंवा त्याच्या बह्या कोपराखाली उतरल्या म्हणून काही फारसे बिघडत नसे. पण पायजम्याचे पाय पावलांच्या खालीपर्यंत पोहोचले की ते चालताना पायांत येत आणि अडखळून पडायला होत असे. खाली दाखविलेल्या छायाचित्रात ही गोष्ट स्पष्ट दिसते.


शल्यक्रियागृहात कधीकधी धावपळ करावी लागे. अशा वेळी पायांत पायजमा अडकून पडण्याचे प्रमाण जास्त असे. दुचाकी चालविताना तुमानीचे पाय चेनमध्ये अडकू नये म्हणून त्यांना लावायला क्लिपा वापरत असत. आटपाट नगरात त्या क्लिपा मिळत की नाही कोण जाणे. दुसरा सोपा उपाय म्हणजे पायजम्याचा पाय खोटेभोवती गुंडाळून त्यावर चिकटपट्टी लावणे. पण ते छान दिसत नाही म्हणून म्हणा की त्यामुळे उकडते म्हणून म्हणा, स्त्रिया तसेही करत नसत. अगदी पुनःपुन्हा पडायले झाले तरीही.
(Key words: Operation theater dress)

Tuesday, November 17, 2015

शल्यक्रियागृहात मेजवानी

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयातील शल्यक्रियागृहात काम खूप असायचे. शल्यतज्ज्ञ तिथे आलटून पालटून कामावर असले तरी  भूलतज्ज्ञवैद्य मात्तिरथे रोजच काम करायचे. त्यांना जेवायला जायला वेळ मिळणे शक्यच नसायचे. मग बिचारे मुदपाकखान्यातून जेवण मागवायचे. ते आले तरी लगेच जेवता येईल याची शाश्वती नसायची. चालू असलेली शल्यक्रिया संपून रुग्ण शुद्धीवर आला की ते जेवायला पोहोचायचे. तोपर्यंत जर झाकण ठेवलेले नसले तर ते अ्न्न उघडेच असायचे. झाकण असलेच तर ते बहुधा आदल्या दिवसाच्या वर्तमानपत्राचे असायचे. जेथे ते जेवायचे ती खोली शल्यक्रियाग्रुहाचे भांडार होते. कपाटाच्या मागे उंदराचे बीळ होते. उंदीर धीट होता. दिवसाढवळ्या तो बाहेर यायला घाबरत नसे. एके दिवशी दुपारी राजवैद्य तेथून जात होते तर त्यांच्या नजरेला काय आक्रीतच पडले.


जेवण ठेवले होते त्या मेजाच्या पायावरून एक छोटासा उंदीर वर चढला आणि त्या जेवणाचा आस्वाद घेऊ लागला.
"ए, शू!" असे म्हणून राजवैद्यांनी उंदराला हाकलले. मग त्यांनी ज्याचे ते जेवण होते त्या भूलतज्ज्ञवैद्याच्या कानावर ही गोष्ट घातली. बिचार्‍याने तोंड वाकडे केले आणि म्हणाला, "जाऊ द्या. आज नशीबात जेवण नाही असे दिसते."
येव्हढे सगळे होईपर्यंत उंदीर परत आला आणि परत मेजावर चढून जेवायला लागला. आता त्याला हाकलून काही फायदा होणार नव्हता. राजवैद्यांनी त्याला निवांतपणे जेवू दिले, आणि त्याचे छायाचित्र काढून घेऊन संग्रही ठेवले. त्यांच्या एका कनिष्ठ वैद्याने ते पुढे फेसबूक की ट्विटरवर टाकले.

Sunday, November 15, 2015

दीपावलीत अंधार

दीपोत्सव चांगला चार दिवस चालला. चांगला झाला की नाही ही गोष्ट वेगळी. खरं तर लोकसंख्या येव्हढी वाढलेली आहे, की कितीही जनजाग्रुती केली आणि त्यामुळे फटाके लावणाऱ्यांचे प्रमाण कितीही कमी झाले तरीही फटाके लावणऱ्यांची संख्या गत वर्षांपेक्षा बरीच जास्त असायला हवी होती. ती तेव्हढी नव्हती, आणि ते जनजाग्रुतीमुळे घडले असे वर्तमानपत्रवाल्यांचे मत पडले. संख्याशास्त्र आणि ठोस पुरावा यांचा अशा बातम्यांशी फारसा संबंध नसतो असे म्हणतात. तेव्हा ही कारणमीमांसा खरी की खोटी हे ठरवण्यासाठी आपण या फोटोकडे पाहूया.


भाऊबीजेच्या दिवशी काढलेला हा फोटो किती घरांमध्ये दिवे आणि आकाशकंदील दिसत होते ते दर्शवितो. सर्वत्र हीच परिस्थिती होती, त्यामुळे एकच फोटो दाखविणे पुरेसे आहे. या इमारतीतील बारा घरांपैकी अवघ्या तीन घरांत दीपावलीची रोषणाई दिसते आहे. ऐन दीपावलीत १२ पैकी ९ घरांत अंधार आणि खाली एटीएम् आणि दुकानांत लखलखाट हे चित्र पुरेसे बोलके आहे. महागाईने कंबरडे मोडलेली इतकी कुटुंबे दीपावली अंधारात काढावी लागते या दुःखात असताना आनंदोत्सव साजरा करणाऱ्यांना अपराधी वाटून त्यांचा आनंद कमी तर झाला नसेल ना?
(Keywords: Diwali dark)

Friday, November 13, 2015

सात जणी

दिवाळीचा पाडवा होता. 'मुंबई पुणे मुंबई २' चा पहिलाच शो होता. त्या सात मुली बाल्कनीच्या मागून दुसऱ्या रांगेत येऊन बसल्या. दहावी बारावीत शिकत असाव्यात. जाहिराती आणि इतर सिनेमांची ट्रेलर चालू होती तेव्हा त्यांची चिवचिव आणि एकमेकींच्या फिरक्या घेणं चालू होतं. पण सिनेमा सुरू झाला आणि सगळ्या एकदम गप्प झाल्या.  नायक आणि नायिकेचं लग्न ठरलं होतं. बोलणी वगैरे झाली होती. प्रेमविवाह होता. त्यामुळे प्रेम तर होतच. नायक स्वप्नील जोशी - चॉकलेट हिरो. त्याच्या छोट्याछोट्या गंमतीदार संवादांना त्या उस्फूर्तपणे एकसुरांत दाद देत होत्या. त्याच्या प्रेमाच्या संवादांवर उस्फूर्तपणे एकसुरांत उसासे टाकत होत्या. मध्ये एकदा नायिका आणि तिच्या आईचा सीन होता. नायिका अस्वस्थ होती. आईवडिलांचं घर सोडून परक्या घरांत जायचं म्हणून तिला एक अनामिक भिती पण वाटत होती. आईचं लहानपणापासूनचं प्रेम आठवत होतं. 'लग्न झाल्यावरपण आई तू मला पहिल्यासारखीच मेसेज करत रहात हां, म्हणजे बरोबर तू आहेस असं वाटेल आणि धीर येईल, करशील ना?' असं ती आईला म्हणाली. ती माउली मुलगी सासरी जाणार म्हणून आधीच व्याकूळ झाली होती. मुलीचं बोलणं ऐकून तिचा बांध फुटला. इथे सात जणींचाही बांध फुटला. उद्या कधीतरी त्या अशाच सासरी जाणार होत्या, त्या आजच आई वडिलांना सोडून निघाल्यासारख्या रडल्या. आपल्या आया अशाच रडतील म्हणून कासावीस झाल्या. त्यांच्या आयांना घरी पत्ता नव्हता असेल की आपल्या पोरींच्या ह्रुदयांत काय कालवाकालव होत असेल. त्या आपापल्या घरी जाऊन यांतलं काहीच सांगणार नव्हत्या हे नक्की. त्यांच्या अईवडिलांना ती वेळ आल्यावर ते घडलं की कळलंच असतं. पण मागच्या रांगेत बसलेल्या एका वयस्क ग्रुहस्थाला ते कळलं. त्याच्या पत्नीने डोळ्यांना रुमाल लावलाच होता. तिला स्वतःच्या लग्नाची वेळ आठवली असेल. आपल्याला मुलगी असती तर तीही अशीच आपल्या नकळत स्वतःच्या भविष्याच्या विचारांत रडली असती या विचाराने त्या ग्रुहस्थाचं पित्याचं ह्रुदय व्याकूळ झालं. चष्मा काढून त्याने रुमालाने डोळे पुसले. कसं कोण जाणे, त्याच्या पुढे बसलेल्या मुलीला काहीतरी जाणवलं. इंटर्वल झालं होतं. मंद दिवे लागले होते. तिने मागे वळून पाहिलं. त्या ग्रुहस्थाच्या चेहऱ्यावरचे कष्टी भाव बघितले. काय ते समजली आणि आपल्या लग्नाच्या वेळी आपला पिता असाच व्याकूळ होईल असं वाटून परत समोर बघायला लागली. मैत्रीणींची नजर चुकवून तिने परत डोळ्यांना रुमाल लावला.

Wednesday, November 11, 2015

क्रुतीशीलता

"गुरुजी, नवे वारे वाहू लागले आहेत हो" आटपाटनगरच्या राजाच्या रुग्णालयांतील राजवैद्यांनी जाहीर केले. "आमचे जुने ठोकताळे आता बहुधा मागे पडणार."
गुरुजी राजवैद्यांना चांगले ओळखत होते. ते जरा तिरकस बोलत आहेत हे त्यांच्या लगेच लक्षांत आले.
"ते कसे काय?" गुरुजींनी विचारले.
"पूर्वीसारखे र्वैद्यकशास्त्र आले की झाले असे हल्ली उरले नाही. नव्या दमाचे वैद्य आणि जुन्या दमाचे पण केस काळे केलेले वैद्य व्यवस्थापन वगैरेच्या कार्यशाळा करून येतात. क्रुतीशीलता (ज्याला management मध्ये proactivity असे म्हणतात) वगैरे मुळे रुग्णांवर उपचार अधिक कुशलतेने करता येतात असे ते म्हणतात."
"म्हणजे काय ते नीटसे कळले नाही" गुरुजी म्हणाले.
"गुरुजी, क्रुतीशीलता म्हणजे पुढे काय होणार याचा विचार करून आधीच योग्य ती पावले उचलणे. अतिशय योग्य अशी संकल्पना आहे ती. आता आमच्या क्रुतीशील वैद्यांनी काय केले ते पहा. आमच्या एका रुग्णाला आंतडे अडकण्याचा विकार झाला होता. ती दोन महिन्यांची गर्भार पण होती. शल्यक्रिया करून तिचे आंतडे सोडवावे अशी विनंती आम्ही शल्यक्रिया करणाऱ्या वैद्यांना केली. पण त्यांनी कार्यवाहीत विलंब केला. तिला जंतूसंसर्ग झाला. रक्तांत दोष निर्माण झाला आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबली (ज्याला disseminated intravascular coagulation किंवा DIC असे म्हणतात). पोटात गर्भाचा म्रुत्यू झाला तरीही हा विकार होऊ शकतो. पण तिला तो विकार आधी झाला आणि नंतर तिच्या गर्भाचा म्रुत्यू झाला. कालांतराने तिची शल्यक्रिया झाली पण ती दगावली. माताम्रुत्यू अन्वेषणाच्या वेळी शल्यक्रिया करणऱ्या वैद्यांनी असा मुद्दा माडला की गर्भाच्या म्रुत्यूमुळे तिला तो रक्ताचा विकार झाला. आणि त्यामुळे ती दगावली."
"यांत क्रुतीशीलता कोठे आली? उलट निष्क्रियता दिसून आली" गुरुजी म्हणाले.
"गर्भ म्रुत झाल्यावर पांच आठवड्यांनी हा रक्ताचा विकार होतो. या रुग्णामध्ये आता गर्भ मरेल अशी परिस्थिती आली आणि शल्यक्रिया करणारे वैद्य क्रुतीशील असल्यामुळे हा रक्ताचा विकार आधीच झाला. निदान असे त्यांच्या म्हणण्यावरून वाटते. हे क्रुतीशीलतेचे उदाहरण असावे" राजवैद्य म्हणाले. "मी भरल्या बैठकीत तसे सर्वांसमोर म्हणालो देखील."
"मग ते काय म्हणाले?"
"काही नाही. गप्प बसले."
(Keywords: proactivity in medicine)

Monday, November 9, 2015

दीपावलीच्या शुभेच्छा

दीपावलीच्या शुभेच्छा



Saturday, November 7, 2015

श्रद्धास्थान

आटपाट नगरचे राजवैद्य आणि गुरुजी संध्याकाळी निवांत बसले होते. राजवैद्य गप्प गप्पच होते.
"काय राजवैद्य, आज गप्पसे? काही विपरित तर घडले नाही ना?" गुरुजींनी विचारले.
"नाही. जुनी आठवण आली. तेव्हाची श्रद्धास्थाने आज डळमळीत वाटायला लागली म्हणून मन उदास झालेय."
"कशाबद्दल म्हणताय तुम्ही?" गुरुजींनी विचारले.
"माझ्या विद्यार्थीदशेतली गोष्ट आहे. शल्यक्रियाशास्त्राचे आमचे प्राध्यापक होते. त्यांचे व्यक्तीमत्व आम्हाला उत्तुंग वाटायचे. त्यांचा आदर्श नजरेपुढे ठेवून भविष्याकडे वाटचाल करावी असे वाटायचे. त्या काळच्या दोन घटना आठवल्या. एकदा सायंकाळी आपत्कालीन शल्याक्रियाग्रुहांत ते एका रुग्णाचे अपेंडिक्स काढणार होते. सामान्यपणे हे काम कनिष्ठ वैद्य करत असत. प्राध्यापकांकडून ते  शिकायला मिळणार म्हणून मी तेथे गेलो होतो. शल्यक्रिया सुरू करण्यापूर्वी त्यांनी मला एका बाजूला बोलावले आणि हलक्या आवाजांत म्हणाले 'आता मी जे अपेंडिक्स काढणार आहे ते खरे तर तीव्र अपेंडिसायटिस झाले म्हणून काढत नाहीये. आपल्या एका वैद्यांचा खाजगी रुग्ण आहे, त्यांनी विनंती केली म्हणून काढतो आहे. तर ते निरोगी दिसते आहे असे मोठ्याने म्हणू नकोस,' मी तत्काळ नाही असे म्हटले आणि माझा शब्द पाळला.. तेव्हा मला त्यांत गैर काय ते काही समजले नाही. नंतर एकदा मी त्यांना एका रुग्णाच्या जखमेची मलमपट्टी स्वतः करताना पाहिले. प्राध्यापक स्वतः हे काम कधी करत नाहीत तर शिकाऊ वैद्यांना करायला सांगतात हे मला माहीत होते. त्यांना मी परत कधीही कोणाची मलमपट्टी करताना पाहिले नाही."
"यामुळे आपण आज व्यथित का झाला आहात?" गुरुजींनी विचारले.
"आज मला एकदम जाणवले की खाजगी व्यवसाय करण्यास राजाची परवानगी नसताना त्यांनी आपले खाजगी रुग्ण राजाच्या रुग्णालयांत आणले आणि त्यांच्यावर उपचार केले, ज्याचे पैसे त्यांनी रुग्णालयाबाहेर घेतले असावे. माझ्याकडे या गोष्टीचा काही पुरावा नाही. पण आज खुले आम काय चालले आहे ते पाहता माझा अंदाज खरा असावा असे वातते.. विद्यार्थ्यांसमोर असा आदर्श ठेवणारे वैद्य एकेकाळी आमचे श्रद्धास्थान होते याचा आज विषाद वाटतोय."

Thursday, November 5, 2015

मशरूम - नवी जात

आमच्या बाल्कनीतल्या बागेत नव्या गोष्टी घडत असतात. त्यांत मशरूमच्या नव्या जातीची भर पडली आहे. एक दिवस अकस्मात आम्हाला मातीत तरारून आलेले मशरूम दिसले.


 या छायाचित्रात पफबॉल सारखे पांढ~या रंगाचे तीन मशरूम दिसत आहेत. त्यांतील एक पूर्ण वाढलेले आहे.


या छायाचित्रात पफबॉल सारखे पांढ~या रंगाचे एक मशरूम दिसत आहे.


पहिल्या छायाचित्रात दिसणारे मशरूम या छायाचित्रात उजवीकडे खालच्या भागात दिसत आहे. वरच्या भागात डावीकडे सहा-सात पट लांबलेले आणि सपाट झालेले त्याचे खोड आणि त्याच्या टोकाला आलेले फूल दिसत आहे.


टेपवर्मसारखे दिसणारे लांबच लांब खोड आणि त्याच्या टोकाला मशरूमचे फूल दिसत आहे.


या छायाचित्रात फुले झालेले दोन मशरूम दिसत आहेत.

इतर मशरूमपेक्षा आमच्या घरी उगवलेले मशरूम वेगळे आहे. पूर्ण वाढलेले मशरूम साधारणपणे तसेच रहाते. आमच्या मशरूमचे खोड सहा-सात पट लांब झाले आणि टेपसारखे सपाट झाले. त्याच्या टोकाला पाकळ्या असणारे फूल आले. असे आजपर्यंत झालेले ऐकिवात नाही आणि गूगलवर शोध करूनही सापडले नाही.
(Keywords: mushroom, flat stem, lengthening of stem, flower)

Tuesday, November 3, 2015

सहा आणि आठ पाकळ्यांचे जास्वंद

साधारणपणे जास्वंदाच्या फुलाला पाच पाकळ्या असतात. आमच्या गॅलरीतल्या बागेत आलेल्या नेहमीपेक्षा वेगळ्या जास्वंदाच्या फुलांबद्दल आणि जास्वंदाच्या खोडावर आलेल्या मुळांबद्दल मी यापूर्वी लिहिले आहे. जर आपण ते वाचू इच्छिता, तर ती पोस्टस् खालील संकेतस्थळांवर उपलब्द्ध आहेत.

  1. चार पाकळ्यांचे जास्वंद
  2. एका झाडावर दोन प्रकारची जास्वंदाची फुले
  3. एका झाडावर विविध प्रकारची जास्वंदाची फुले
  4. जास्वंदाच्या खोडावर मुळे

आज मंगळवार - श्री गणपतीबाप्पांचा वार. त्यांचे आवडते फूल जास्वंद. आज आमच्या घरच्या बागेत सहा पाकळ्यांची जास्वंदाची दोन फुले आली, तर आठ पाकळ्यांचे एक फूल आले. त्यांची छायाचित्रे खाली दाखविली आहेत.


सहा पाकळ्यांचे जास्वंदाचे फूल.


आठ पाकळ्यांचे जास्वंदाचे फूल.

आठ पाकळ्यांच्या जास्वंदाच्या फुलाच्या पाकळ्या असमतोल पद्धतीने आल्या आहेत. त्यांतल्या पाच पाकळ्या पुढे आहेत, तर तीन मागे आहेत. सहा आणि आठ पाकळ्यांची फुले का आली याबद्दल मला काही म्हणायचे नाही - कारण मी वनस्पतीशास्त्रज्ज्ञ नाही, आणि अशास्त्रीय कारणे मला द्यायची नाहीत. पण गूगलवर शोधली असता अशी फुले सापडली नाहीत हे नक्की.

२७-१२-२०१७
दहा पाकळ्यांचे जास्वंद

पावणेतीन वर्षांनंतर मी हे जुने पोस्ट एडिट करतोय. आज आमच्या घरी दहा पाकळ्यांचे जास्वंद फुलले. पाच अतिरिक्त पाकळ्या नेहमीच्या पाकळ्यांच्या खालच्या बाजूने दिसत आहेत (बाणांनी दर्शवलेले). ज्याला सेपल म्हणतात, ते हिरवे असतात. या फुलांत ते पाकळ्यांसारखे (पेटल) बनले आहेत.


(Key words: Hibiscus with four petals, Hibiscus with six petals, Hibiscus with eight petals)

Sunday, November 1, 2015

मरायची वेळ

आटपाट नगरांत देवाचा उत्सव सुरू व्हायचा होता. आबालव्रुद्ध उत्साहात आणि आनंदात होते. देवाचे आगमन घरोघरी होणार होते तसेच सार्वजनिक उत्सवांतही व्हायचे होते. तयारी जोरात सुरू होती.
"अहो ऐकलत का? काकी वारल्या" गुरुजी पत्नीला म्हणाले. काकी व्रुद्ध होत्या. कधीतरी देवाघरी जाणारच होत्या. तरीही आपले माणूस गेले की दुःख हे होतेच.
"कधी हो?" गुरुजींच्या पत्नीने विचारले.
"काल अर्ध्या रात्री गेल्या. आताच दूरध्वनी आला."
"वाईट झाले" गुरुजींची पत्नी म्हणाली.
गुरुजींनी काकींच्या मुलाबाळांचे सांत्वन केले. मग रोजची कामे. दिवस हां हां म्हणता सरला.
दुस~या दिवसाची पहाट झाली आणि गुरुजींचा दूरध्वनी खणखणला. येव्हढ्या पहाटे कधी कोणी त्यांना दूरध्वनी करत नसे. त्यांच्या ह्रुदयांत चर्र झाले.
"गुरुजी, काकींचा पुतण्या वारला,"
गुरुजी सुन्न झाले. काकींचे वय झाले होते तसे पुतण्याचे झाले नव्हते.
"बरे झाले बोललात" गुरुजी म्हणाले. "अकस्मात गेला! काकी गेल्या म्हणून हाय खाऊन गेला की काय?"
"नाही हो" पलीकडून उत्तर आले. "बरा होता. उत्सवाच्या तयारीत मग्न होता. काकी गेल्याचे समजले तेव्हा चिडून म्हणाला देखील की काकींना जायला हीच वेळ मिळाली? आता आपल्याला देव पूजता येणार नाही. सगळी तयारी वाया गेली."
"वाईट झाले" गुरुजी म्हणाले. गुरुजी पुढे काही बोलतील म्हणून बातमी देणारा थांबला. पण गुरुजी काहीच बोलले नाहीत. वाट बघून तो बर तर मग असे म्हणाला आणि त्याने दूरध्वनी खाली ठेवला. मनातल्या विचारांच्या कल्लोळात ते गुरुजींच्या लक्षातही आले नाही.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क