Pages - Menu

Monday, June 29, 2015

गोगलगाय

आमच्या झाडांच्या मातीत, सुमारे ३ मिलिमीटर लांबीच्या, हिरवट अंगाच्या गोगलगाई कित्येक वर्षे आहेत. त्यांचे शंख सरळ आणि सफेद रंगाचे असतात. त्या मातीतच रहातात, आम्ही टाकलेल्या भाजीपाल्याच्या तुकड्यांवर जगतात, आणि माती सुपीक बनवतात. त्यांचा त्रास काहीच नाही आणि फायदा खूप आहे, म्हणून मला त्या लहानपणापासून आवडत आल्या आहेत. आज मला एक नवीन, बरीच मोठी गोगलगाय सापडली.



सुमारे आठवडाभर आमच्या येथे मुसळधार पाऊस पडला. पाणी गळू नये म्हणून बसविलेला ग्रिलवरचा पत्रा आणि भिंत यांच्यामधून पाणी झिरपते का याचा अंदाज घेण्यासाठी मी बाहेर वाकून पहात होतो, तेव्हा मला खिडकीच्या मोठ्ठ्या काचेच्या वरच्या टोकाला एक इंच लांबीची गोगलगाय आढळली. बहुधा पुढे जायचा रस्ता खुंटल्यामुळे ती तेथेच स्थिर होती. आता खाणे पिणे न मिळाल्यामुळे बिचारी मरून जाईल म्हणून मी तिला पाण्याने ओलसर केलेल्या पातळ पु्ठ्ठ्यावर घेऊन घरांत आणले. तिचे स्वतःच्या संग्रहासाठी फोटो काढले. मग आमच्या शोभेच्या झाडांमध्ये तिला सोडले तर ती सगळी झाडे फस्त करून टाकेल म्हणून तिला बागेत नेऊन एका छोट्या झाडावर सोडले. त्या ओलसर पुठ्ठ्यावर ती मरगळल्यासारखी झाली होती. त्या झाडावर सोडताच ती इतक्या पटपट बुंध्यावरून वरवर जाऊ लागली, की ही खरच गोगलगाय आहे की एखादा चपळ प्राणी आहे असा संशय यावा.

Saturday, June 27, 2015

पायांना मदत हातांची

गुरुजी दिवसाभराचे काम उरकून घरी चालले होते. पेशाने शिक्षक असल्यामुळे गुरुजींच्या नीती-अनीतीच्या कल्पना इतरांपेक्षा बेगळ्या होत्या. राजाने पाचवा वेतन आयोग लागू केल्यापासून बरोबरच्या इतर गुरुजनांनी स्वतःसाठी रथ विकत घेतले होते. रथ चालविण्यासाठी इंधन वापरणे म्हणजे राष्ट्राच्या संपत्तीची उधळमाधळ करणे आहे असे गुरुजींच्या मनाने घेतले. स्वकष्टार्जित रथ त्यांनी तडकाफडकी कवडीमोलाने विकून टाकला. स्पष्ट सांगायचे तर फुकून टाकला. नवा रथ घ्यायचा तर प्रचंड किंमत मोजावी लागे. पण जुन्या रथाचे मूल्य भंगारासारखे असे. असो. गुरुजींच्या नीतीमूल्यांपुढे पैशांचे ते काय येव्हढे?
तर रथ नसल्यामुळे गुरुजी सार्वजनिक वाहतुकीच्या बसने घरी जात असत. त्या दिवशी गुरुजींची बस आली तेव्हा त्यांच्यापुढे राजाच्या रुग्णालयातली एक आयाबाई होती. मलईमुळे रुग्णांचे कोलेस्टेरॉल वाढेल म्हणून त्यांच्या दुधावरची सगळी मलई ही आयाबाई मट्ट करीत असे अशी वदंता होती. खरे खोटे परमेश्वराला माहीत. पण आयाबाईचे वजन सुमारे १३५ किलो होते. बस अपंगांसाठी असते तशी कमी उंचीच्या पाय~यावाली होती. दारातला दांडा धरून आयाबाईने पहिल्या पायरीवर उजवा पाय ठेवला आणि त्याने जोर लावून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. पण त्या पायाच्या स्नायूंची ताकद कमी पडली. अंग काही वर उचलले जाईना. आयाबाईने पुनःपुन्हा प्रयत्न केला, पण व्यर्थ. मग तिने दोन्ही हातांनी बसचा दांडा पकडला आणि अंग वर खेचण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्नही पुनःपुन्हा असफल ठरला. बसचे वाहक आणि चालक खोळंबून होते. गुरुजी आपल्याला न घेता बस सुटेल म्हणून कासावीस व्हायला लागले होते. लोकांनी प्रोत्साहन देऊनही आयाबाईचे सगळे प्रयत्न फोल ठरले. शेवटी तिने माघार घेतली आणि परत येऊन बसच्या थांब्यावर स्थानापन्न झाली. वाहकाने दुहेरी घंटा मारून बस सुरू करवण्यापूर्वी गुरुजी चपळाईने बसमध्ये चढले. दुस~या दिवशी त्यांना राजवैद्य भेटले तेव्हा त्यांनी ही गोष्ट त्यांच्या कानावर घातली.
"पायांच्या ताकदीपलिकडे वजन वाढले की हे असे होते" राजवैद्य म्हणाले. "माझ्याकडे एक तरुण स्त्री उपचारांसाठी येत असे. तिच्या पतीचे अकस्मात निधन झाल्यावर ती मनाने खचली. नैराश्याच्या भरात मनाला विरंगुळा म्हणून ती खा खा खायला लागली. तिचे वजन येव्हढे वाढले की ती आली की जमिनीवर बसायची, आसनावर नाही. तिथून तिला कोणीतरी पडून उचलेपर्यंत तिला उठता येत नसे. नाहीतर ती जवळपासच्या मेज किंवा खुर्चीला पकडून हाताने अंग वर उचलून घेत असे."
"अरे बापरे" गुरुजी म्हणाले.
"लहान मुलांना होणारा डुशेन स्नायूंची डिस्ट्रॉफी नावाचा एक गुणसूत्रांशी संबंधित आजार असतो" राजवैद्य म्हणाले. "त्याच्यात त्या मुलांचे पायाचे स्नायू येव्हढे कमकुवत असतात, की जमिनीवर बसलेल्या स्थितीतून उभे रहाण्यासाठी ती मुले आपल्या पायांवर हाताने पावलापासून सुरुवात करून वरच्या दिशेला ढकलत जात जात चढतात आणि शेवटी उभी रहातात. हातांनी पायांवर चढतात म्हणा ना."
"याला काही उपाय?" गुरुजींनी विचारले. उद्या कोणावर अशी पाळी आली तर माहिती असलेली बरी असे त्यांच्या मनांत आले.
"डुशेनच्या आजाराला काही उपाय नाही. त्या दुस~या प्रकारात वजन आटोक्यात ठेवणे आणि नियमितपणे व्यायाम करणे या दोन गोष्टींमुळे सर्व ठीक होते."
रोज व्यायामशाळेत जाण्याचे आपले वय नाही. पण सायंकाळी दूरदर्शनवर काहीबाही बघत बसण्यापेक्षा पत्नीबरोबर अर्धा एक तास फिरायला जायचे असे गुरुजींनी ठरवले.
"अहो, या वयांत हे काय रोज फिरायला जायचे खूळ काढलेत?" त्यांच्या पत्नीने पतीची इच्छा समजल्यावर म्हटले.
"अग, तरूणपणी प्रेमासाठी फिरायचे असते, आणि या वयात तब्येत राखण्यासाठी" गुरुजींनी समजावले.

Thursday, June 25, 2015

उलटतपासणी

आटपाट नगरीच्या राजाने गुरुजींवर एक महत्वाचे काम सोपवले होते. राजाच्या एका रुग्णालयामध्ये शिक्षण घेणा~या काही विद्यार्थिनींनी तेथील काही पुरुषांविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केल्या होती. त्या गोष्टीची प्राथमिक चौकशी करण्याचे काम राजाने त्या रुग्णालयामधील व्यक्तींवर सोपविले होते. पण आपला विश्वासू माणूस त्या वेळी हजर असावा असे राजाला वाटत होते. म्हणून त्याने ही जबाबदारी गुरुजींवर सोपविली होती. गुरुजींना तेथे निरीक्षक म्हणून उपस्थित रहायचे होते.
आरोपींमध्ये काही विद्यार्थी होते, तसेच काही वैद्यही होते. चौकशीचे काम तेथील दोन वरिष्ठ वैद्य आणि एक प्रशासक स्त्री मिळून करत होते. प्रशासक बाई न्यायशास्त्रांतही निपूण होत्या. चौकशी पद्धतशीरपणे चालू होती. होता होता एका विध्यार्थ्याची चौकशी सुरू झाली. त्याच्यावरचे आरोप तर फारच गंभीर होते.
"तो कामावर येतो तेव्हा त्याच्या तोंडाला सिगारेट आणि दारूचा वास येतो" पीडीत विद्यार्थिनीने चौकशी समितीला सांगितले. "त्यामुळे त्याच्याबरोबर काम करायची भिती वाटते. त्याने मला एकदा सनी लिओनीचा फोटो पाठवला."
"तुझ्या चलत दूरध्वनी यंत्रावर तो फोटो असेल ना?" बाईंनी विचारले.
"ते यंत्र मोडले" असे ती मुलगी म्हणाली.
"हरकत नाही. तुला दूरध्वनी सेवा पुरवणा~या सेवादात्याच्या सर्वरवर त्याची नोंद असेल" वरिष्ठ वैद्य म्हणाले.
गुरुजींना सिगारेट आणि दारू या शब्दांचा अर्थ समजला, पण ते सनी लिओनी काय ते समजले नाही. निरीक्षक असल्यामुळे आणि अज्ञान प्रकट करायची लाज वाटल्यामुळे ते गप्प राहिले. जेव्हा हा आरोपी विद्यार्थी चौकशीला सामोरे जाण्यासाठी आला, तेव्हा त्याला प्रशासक बाईंनी विचारले,
"तू सिगारेट ओढून कामावर येतोस असा तुझ्यावर आरोप आहे" प्रशासक बाई म्हणाल्या.
"मी? छे!" तो निष्पाप चेह~याने म्हणाला.
"तू दारू पिऊन कामावर येतोस असाही तुझ्यावर आरोप आहे" प्रशासक बाई म्हणाल्या.
"मी आणि दारू?" तो म्हणाला, "कदापी नाही."
"तुझे हात आत्ताही थरथरतायत" प्रशासक बाई म्हणाल्या.
त्याचे हात थरथरत होते हे गुरुजींनी तो येऊन स्थानापन्न झाला तेव्हाच पाहिले होते. हात थरथरण्याचे एक कारण दारू पिणे असते हे त्यांना राजवैद्यांनी सांगितले होते ते त्यांना आठवले होते. त्याचे डोळे लाल आहेत का हे पण त्यांनी पाहून ठेवले होते.
"पण मी दारू पीत नाही" तो म्हणाला.
"तू त्या विद्यार्थिनीला सनी लिओनीचा फोटो पाठविलास असा आरोप आहे" प्रशासक बाई म्हणाल्या. हे म्हणतांना त्यांचा चेहेरा शरमेने काळवंडलेला आहे असे गुरुजींच्या लक्षांत आले. ते गप्पच राहिले. प्रश्न विचारण्याची ती वेळ नव्हती.
आरोपीने अचंभित चेहरा करून म्हटले, "कोणी, मी? छे छे. मी नाही."
सामान्यपणे निष्पाप माणसाचा असतो त्यापेक्षा खूपच जास्त प्रमाणात याचा चेहरा निष्पाप दिसतोय, असे गुरुजींच्या मनांत आले. तो बहुतेक निष्पाप असण्याचे बेमालूम नाटक करत असावा असे त्यांना वाटले. प्रशासक बाई तर हाडाच्या वकील होत्या. त्यांना तो संशय गुरुजींच्या आधीच आला होता.
"सनी लिओनी कोण?" त्यांनी त्या आरोपीला विचारले.
"सनी लिओनी?" त्याने अतिनिष्पाप चेह~याने विचारले. "माहित नाही."
"ठीक आहे, तू जाऊ शकतोस" असे बाई विचित्र चेहेरा करून म्हणाल्या.
"हे सनी लिओनी प्रकरण काय आहे?" असे तो आरोपी गेल्यावर गुरुजींनी विचारले. बाई गप्पच राहिल्या. पण वरिष्ठ वैद्यांनी उत्तर दिले,
"गुरुजी, कॅनडा नावाच्या विदेशातून या मूळ भारतीय वंशाच्या लिओनी नावाच्या बाई भारतवर्षांत चलतचित्रपटांत काम करण्यासाठी आलेल्या आहेत. पूर्वी त्या मोठ्या माणसांसाठी असणा~या चित्रपटांत (ज्याला आजकाल सेक्स मुव्ही असे म्हणतात) काम करत असत. गेल्या वर्षी त्यांना भारतवर्षांतील चित्रपटांत काम करणारी सर्वात मादक नटी म्हणून जनतेने मला वाटते एसेमेस आणि इंटरनेटवरील कौलातून निवडून दिले होते. तुम्ही इंटरनेट वापरत नसाल, पण वर्तमानपत्रपण वाचत नाही असे दिसते."
"अं.." गुरुजी पुटपुटले. हा विषय त्यांना तितकासा योग्य वाटला नव्हता, आणि एक स्त्रीच्या समोर त्यावर बोलणे तर त्यांना फारच अवघड वाटत होते. तो आरोपी धादांत खोटे बोलत होता याचा सर्वांत मोठा पुरावा म्हणजे सनी लिओनी कोण हे त्याला माहित नव्हते असे तो म्हणाला, आणि ते प्रशासक बाईंनी उलटतपासणीत अचूक पकडले हे मात्र त्यांच्या ध्यानांत आले.

Tuesday, June 23, 2015

राक्षस

आटपाट नगरांतली गोष्ट आहे. गुरुजी फिरायला म्हणून बाहेर पडले होते. समोरून राजवैद्य येतांना दिसले. त्यांची भ्रुकुटी जरा वक्र दिसली म्हणून गुरुजींनी त्यांना थांबवले आणि विचारले,
"वैद्यराज, आपण जरा त्रासलेले दिसता. सर्व काही क्षेम आहे ना?"
"अहो गुरुजी काय सांगू? मला स्वतःला काही त्रास नाही. पण तो राक्षस आहे ना, त्याचे वर्तन पाहून मन विषण्ण होते हो."
"राक्षस? मी समजलो नाही" गुरुजी म्हणाले. प्रभू रामचंद्रांनी राक्षसांचा नायनाट करून तपे उलटली होती. आता नव्याने राक्षस कोठून आला हे त्यांच्या ध्यानांत आले नाही.
"अहो, आमचे एक सहवैद्य. त्यांनी एका प्रशिक्षणार्थी वैद्य मुलीला नको जीव करून टाकले आहे."
"काय करतात तरी ते काय असे?"
"अहो, मुलांची जात. शिकतांना चुका करायचीच. चुकले तर समजावून सांगायचे. तरी समजले नाहीत तर ओरडायचे. अती झाले तर शिक्षा म्हणून त्यांची शल्यक्रिया करण्याची पाळी येईल तेव्हा त्यांना त्या संधीपासून वंचित ठेवायचे. पण त्यांचा छळ नसतो हो करायचा या राक्षसासारखा."
"काय केले तरी काय त्यांनी?" गुरुजींनी भीत भीत विचारले. मुलीला त्याने काय केले असेल अशा विचाराने त्यांच्या मनाला कापरे भरले.
"अहो, त्या दिवशी मी रुग्णांना तपासण्याच्या फेरीवर होतो तेव्हा पाहिले. ही मुलगी रुग्णकक्षाबाहेर रुग्णांसाठी प्रसाधनग्रुह आहे त्याच्या दारांत उभी होती. चेहेरा रडकुंडीला आलेला होता. कक्षांत गेलो तर राक्षस इतर प्रशिक्षणार्थी वैद्य आणि कनिष्ठ वैद्य यांच्याबरोबर रुग्ण तपासत होता. मग समजले की तिला शिक्षा म्हणून बाहेर उभे केले होते."
"प्रसाधनग्रुहाबाहेर उभे?" गुरुजींना शरमल्यासारखे वाटले. येव्हढ्या शिकलेल्या मुलीला सर्वांसमोर असे लज्जित केल्यामुळे तिच्या मनाची काय अवस्था झाली असेल या कल्पनेने त्यांना कसनुसे झाले.
"मी कक्षाबाहेर आलो आणि तिला म्हटले, बाळ, अशी उभी राहू नकोस. या आसनावर बस. ती म्हणाली, नको वैद्यराज, मी उभीच रहाते" राजवैद्य म्हणाले.
"हं ..." गुरुजींना बोलण्यासारखे काही सुचले नाही.
"आज तर कहरच झाला. राक्षस स्वतःच्या सर्व प्रशिक्षणार्थींना घेऊन मेजवानीला गेला. कार्यकाळात जाण्याची गरज नव्हती, तरी पण गेला. पण या मुलीला नेले नाही."
"तिचा उपास वगैरे असेल" गुरुजी पुटपुटले. पण त्यांना मनांतून खात्री वाटत होती की तिचा उपास नसणार.
"छे हो! हल्लीची मुले उपास करतात काय? ती सामान्य सभेला आली तेव्हा मी तिला विचारले, की तू मेजवानीला गेली नाहीस काय?. आपण काहीतरी खाऊन घेतले आहे, असे ती म्हणाली."
"प्रशिक्षणार्थी हे आपल्या मुलांसारखे असतात. त्यांच्यात असा दुजाभाव दाखवणे बरे नाही" गुरुजी म्हणाले.
"माझेही तेच मत आहे. अहो, काय सांगू? ती मुलगी एरवी कष्टी असते. आज राक्षस नव्हता तर ती चक्क स्मितहास्य करत होती" राजवैद्य म्हणाले.
"आता मला समजले आपण त्या वैद्यांना राक्षस का म्हणता ते" गुरुजी म्हणाले. "पण राजाकडे कोणी तक्रार घेऊन का जात नाही?"
"सर्व जण भितात हो. परिक्षेत अनु्त्तीर्ण केले तर, असे त्यांना वाटते. मांजराच्या गळ्यांत घंटा बांधणार कोण?"
"पण एक दिवस एखा्दी हळव्या मनाची मुलगी जीव देईल हो" गुरुजी म्हणाले.
"त्या चिंतेनेच तर मी पोखरला जातोय" राजवैद्य म्हणाले.

Sunday, June 21, 2015

आंतरराष्ट्रीय योगा दिवस

आज आंतरराष्ट्रीय योगा दिवस. योगाचे महत्व भारतीयांना सांगायला नको, कारण अनादी कालापासून भारतबर्षात योगा प्रचलित आहे. पण इतर प्रगत देशांत योगाचे लोण वाढायला लागल्यापासून भारतातल्या नागरिकांना आपल्या या महान वारशाचे महत्व जास्त जाणवायला लागलेय. पंतप्रधांनांनी पुढाकार घेऊन आंतरराष्ट्रीय योगा दिवसाचे आयोजन केल्यामुळे आज देशाच्या कानाकोप~यात योगासने केली जात आहेत. देव करो अणि हा उत्साह फक्त आजच्यापुरता मर्यादित न रहाता कायमचा टिको. पुढे फक्त दोनच आसने दाखविली आहेत, त्याचा अर्थ ती सर्वांत महत्वाची आसने आहेत असा नाही.

एकपादचक्रासन


डोके, मान, पाठ, कंबर, छाती, हात, पाय यांच्यासाठी हे आसन उपयुक्त असते. हात, पाय आणि कंबरेचे स्नायू यांच्यात पुरेशी ताकद नसेल तर हे आसन करतांना पाठीवर दणकन पडण्याची शक्यता असते. तेव्हा जरा जपून असावे.


शवासन


हे आसन करावयास अगदी सोपे वाटते खरे, पण शरीराच्या विशिष्ट अवस्थेबरोबरच संपूर्णपणे शिथिल असलेले स्नायू आणि विचाररहित मन हे जमवणे तेव्हढे सोपे नसते. मानसिक ताण कमी करण्यासाठी हे आसन अतिशय उपयुक्त असते. ह्रुदयविकार, उच्चरक्तदाब या विकारांवर मात करण्यासाठी हे आसन फार लाभदायक असते.


Friday, June 19, 2015

सोपा उपाय

गुरुजींच्या सार्वजनिक वाहनांतून प्रवास करण्यामुळे त्यांना अनेक गमतीदार अनुभव यायचे. हा स्वतःचा रथ न बाळगण्याचा एक फायदा होता. तसे वाईट अनुभवही यायचे. पण त्याला इलाज नव्हता. उडदामाजी काळे गोरे असे म्हणतात ना? पण चांगले तेव्हढे घेऊन पुढे जायचे असे ठरविले की मग फारसा मोठा प्रश्न उरत नसे.
एके दिवशी गुरुजी सार्वजनिक बसमधून प्रवास करत होते. त्यांना खिडकीजवळची बसायची जागा मिळाली होती. उरलेले आसन रिकामे होते. गुरुजी खिडकीबाहेर बघत प्रवास करत होते. बाहेर काही फार मोठी गंमत होती अशातला भाग नव्हता. पण प्रवास करताना खिडकीबाहेर बघायचे अशी सवय प्रत्येक लहान मुलाला त्याचे पालक लावत असतात आणि ती सवय मोठेपणीही रहाते, या नियमाला गुरुजी अपवाद नव्हते.
"जरा सरकून बसा" असे शब्द गुरुजींच्या कानावर पडले. त्यांनी वळून पाहिले. एक सुमारे १२० किलो वजनाची स्त्री बसण्यासाठी जागा हवी म्हणून त्यांना सरकून बसायला सांगत होती.
गुरुजी खिडकीच्या दिशेला शक्य होईल तेव्हढे सरकले. तसे पाहिले तर ऐसपैस बसून सगळे आसन अडवणे हे गुरुजींच्या स्वभावातच नव्हते. गुरुजींनी अर्ध्यापेक्षा थोडे कमीच आसन व्यापले होते. पण कोणी विनंती केली तर तिला मान द्यायचा म्हणून त्यांनी सरकण्याचा होईल तेव्हढा प्रयत्न केला.
त्या स्त्रीने उपलब्ध झालेली जागा नजरेने मोजली. "आणखी थोडे सरका ना" ती म्हणाली.
"अहो, मी येव्हढा बारीक माणूस आहे. अर्ध्यापेक्षा कमी आसन मी व्यापून बसलो आहे. माझ्या या बाजूला बसची बाजू मला चिकटली आहे. आणखी सरकायचे तर मला बसची बाजू फोडून बसबाहेर पडावे लागेल."
गुरुजींचे बोलणे ऐकून स्त्री निरुत्तर झाली. पण निरुत्तर झाली म्हणून गप्प होणे तिच्या स्वभावात नसावे.
"मग आता काय करायचे?" तिने विचारले. बहुतेक गुरुजींनी स्त्रीदाक्षिण्य म्हणून उठून संपूर्ण आसन तिला बसण्यासाठी द्यावे अशी तिची अपेक्षा असावी. साध्या स्वभावाच्या गुरुजींना ते काही समजले नाही. स्त्री या प्रश्नाला उपाय काय असे विचारते आहे असे त्यांना वाटले. त्यांना जो उपाय योग्य वाटला तो त्यांनी सुचवला.
"आपण आपले वजन कमी करावे, म्हणजे अशी अडचण येणार नाही" गुरुजी म्हणाले.
'ते जमले असते तर बघायलाच नको होते' अशा अर्थाची मुद्रा करून  महिला बसायला प्रशस्त अशी जागा दुसरीकडे कोठे मिळते का हे बघायला निघून गेली. रोज विद्यार्थ्यांना करायचे तसा उपदेश त्या स्त्रीला केल्यामुळे आपण आपले कर्तव्य पार पाडल्याच्या आनंदात गुरुजी परत खिडकीबाहेर बघू लागले.

Wednesday, June 17, 2015

आपल्या दोघांच्या जन्मदिवशी




प्रिय दादा आणि भाई,
आपल्या दोघांच्या मध्ये दोन गोष्टी सारख्या होत्या. आपणा दोघांचाही जन्म १७ जूनला झाला. आपण दोघेही आम्हाला अकालीच सोडून गेलात. आत माझेही वय साठीच्या जवळ येतेय. पण तुमच्या आठवणी लहानपणी होत्या तशाच आहेत.
आपण दोघेही होतात तेव्हा कंप्यूटर नव्हते. ते बरेच नंतर आले. त्यामुळे त्यांतली गंमत आपल्याला कदाचित समजायची नाही. पण आजच्या आपल्या दोघांच्या जन्मदिवशी काहीतरी नवे करावे आणि आपल्याला दाखवावे असे मनांत आले. काय करायचे ते मनांत स्पष्ट असे नव्हते. पण करता करता कल्पना सुचत गेल्या. या पानावर दिसते ते कागदावर रंगवायला आणि लिहायला बराच कमी वेळ लागला असता. कंप्यूटरवर कोड वापरावे लागते.जीआयएफ चलतचित्रे वापरावी लागतात. इतर कोणी न केलेले काहीतरी करायला तर खूपच श्रम घ्यावे लागतात. भाई, तुला कुत्रे आवडत असत. तुझ्यासाठी धावणारे कुत्रे आहेत. दादा, आपल्याला आयुष्यातला सर्व प्रकारचा आनंद आवडत असे. माझ्या या प्रयत्नांत थोडासा आनंद आपल्याला सापडो अशी ईश्वरचरणी प्रार्थना.



Monday, June 15, 2015

पाउस

पाऊस आला.
गेली काही वर्षे तो येव्हढ्या उशीराने येत होता,की तो येतो की नाही या विचाराने प्राण कंठाशी यायचे.
या वर्षी तो वेळेवर आला. आल्यावर एक दिवस बरसून दिसेनासा झाला नाही.
परमेश्वराची क्रुपा, तो टिकून आहे.
लहान होतो तेव्हा पाऊस आला की मजा वाटायची. पाण्यांत खेळण्याची मजा काही औरच असायची.
मोठ्ठा पाऊस आला की आता शाळा बंद पडेल आणी सुट्टी मिळेल अशी आशा वाटायची. कधीकधी ती इच्छा पूर्णपण व्हायची.
थोड्या वर्षांपूर्वी २६ जुलैला आकाश फाटले. शहरांत पूर आला. अनेक जण वारले. गोरगरिबांची वाताहत झाली. तेव्हापासून मोठा पाउस आला की मनांत अनामिक भिती दाटून येते.ही भिती आता शेवटपर्यंत साथ सोडेल असे वातत नाही. देव करो आणि तसा पाउस परत न येवो.

या पानाच्या मागे जे पावसाचे चित्र वापरले आहे त्यासाठी मी या संकेतस्थळाचे आभार मानतो. ते जीआयएफ चलतचित्र पानभर वापरण्यात थोडेसे कोड वापरावे लागले. नाहीतर पानाच्या एकाच कोप~यात पाऊस पडला असता.

Saturday, June 13, 2015

गौडबंगाल

मध्यंतरी जरा बद्धकोष्ठाचा त्रास झाला म्हणून औषधांच्या दुकानात जाऊन एका प्रसिद्ध कंपनीचे औषध आणले.
"२०० मिलि. ची बाटली घेतलीत तर १०६ रुपये पडतील. ४०० मिलि. ची बाटली १४५ रुपयांना मिळेल" असे दुकानदार म्हणाला. फक्त ३९ रुपये जास्त देऊन २१२ रुपयांचे औषध १४५ रुपयांना मिळते म्हटल्यावर साहजिकपणे ४०० मिलि. च्या बाटलीची खरेदी झाली. सहा दिवस नेमाने औषध घेतले, पण गुण काही येईना. असे पूर्वी कधी झाले नव्हते. शेवटी दुकानांत जाऊन २०० मिलि. ची बाटली आणली. काय सांगू, एका दिवसात गुण आला. गुण आल्याचा आनंद काही औरच असतो. बद्धकोष्ठ बरे झाल्यावर जरासे संशोधन केले. तेव्हा शोध लागला की २०० आणि ४०० मिलि. च्या बाटल्यांमधल्या औषधांचे प्रमाण समान होते. मग असे का व्हावे?

मग गूगलवर शोध घेतला, तेव्हा तेथे सापडलेली माहिती तर आणखीनच चक्रावून टाकणारी निघाली.



२०० मिलि. च्या बाटलीची किंमत फक्त २२.९३ रुपये होती, तर ४०० मिलि. च्या बाटलीची किंमत फक्त ९८ रुपये होती.
अनुत्तरीत राहिलेले प्रश्न असे.

  1. इंटरनेटवर दिलेली किंमत आणि दुकानातील किंमत यांत येव्हढी मोठी तफावत कशी?
  2. २०० मिलि. च्या बाटलीतील औषध प्रभावी ठरते पण ४०० मिलि. च्या बाटलीतील त्याच प्रमाणात बनविले आहे असे लिहिलेले औषध प्रभावी ठरत नाही याचे कारण काय?
  3. मोठ्या प्रतिष्ठित कंपनीच्या औषधाची ही गत आहे तर छोट्या कंपनीच्या औषधाची काय गत असेल?
  4. जर डॉक्टरला असे प्रश्न पडतात आणि त्यांची उत्तरे नसतात, तर डॉक्टर नसणा~या इतर माणसांची काय गत असेल?
कदाचित इंटरनेटवरील किंमती जुन्या असतील. पण औषधाचा परिणाम न होण्याचे कारण काही समजू शकत नाही.

Thursday, June 11, 2015

शेजा~यांची बोगनवेल

काही कामानिमित्त आमच्या मजल्यावरच्यांच्या घरी जाण्याचा योग आला. काम पार पडल्यावर आमच्या सज्जातल्या बागेबद्दल बोलणं सुरू झालं.
"आमच्या सज्जातून तुमच्या बोगनवेली इतक्या छान दिसतात म्हणून सांगू" शेजारी म्हणाले.
"बघू तरी" असं म्हणून मी त्यांच्या सज्जाबाहेर डोकवलो.


गुलाबी, पांढरी आणि अबोली रंगांची बोगनवेलीची आमची फुले आमच्या घरांतून दिसतात त्याहून जास्त सुंदर दिसत होती. सोबतच्या फोटोत आमच्या शेजारांच्या सज्जाखाली लावलेले ग्रिल दिसते आहे, ज्यामुळे  बोगनवेली संपूर्णपणे दिसत नाहीयेत. नुसत्या डोळ्यांनी बघताना नजर झाडांवर स्थिरावलेली असल्यामुळे गज द्रुष्टीस जाणवत नव्हते आणि फुलांचे सौंदर्य जास्तच खुलून दिसत होते.
"तुमची फुले बघून आम्ही बाजारांत मिळतील त्या सर्व रंगांच्या बोगबवेली आणून लावल्या आहेत" शेजारी म्हणाले. छोट्याशा हरित क्रांतीची ही सुरुवात तर नव्हे?

Tuesday, June 9, 2015

कलियुगाची नांदी

आटपाट नगरीच्या राजाच्या रुग्णालयाची दुरुस्ती करण्याची वेळ आली तेव्हा छताचा मुलामा रुग्णांच्या आणि वैद्य, परिचारिका, आणि सेवकांच्या डोक्यावर पडू लागला होता. स्वच्छताग्रुहांमध्ये वरच्या मजल्याच्या तत्सम जागेतून पाणी किंवा सद्रुश द्रव गळू लागला होता, आणि रुग्णालयाची इमारतच लौकरच कोसळेल अशी भिती सर्वांना वाटू लागली होती. इमारत राजेशाही होती. राजाने तिच्या दुरुस्तीसाठी आपल्या अभियांत्रिकी विभागाला पाचाराण न करता ते काम एका विलक्षण चतुर स्थापत्यशास्त्रज्ञावर सोपविले. त्याने कामाचा आराखडा बनविला आणि कामासाठी निविदा मागविल्या. बाजारभावापेक्षा एक त्रितीयांश कमी दराने निविदा भरणा~या ठेकेदाराला काम देण्यात आले. त्याने योग्य त्या व्यक्तींना उचित अशा भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला, आणि मग कामास सुरुवात केली. भेटवस्तू दे्ण्यात अमाप पैसा खर्च झाला होता. निविदा कंबरडे मोडेल अशा कमी दराची होती. खर्च वजा जाता थोडा तरी फायदा होणे अपेक्षित होते. त्यामुळे केवळ परिस्थितीपुढे मान तुकवून त्याने अशातशा प्रकारचे साहित्य वापरून जमेल तसे काम उरकले. चकचकीत दिसणा~या रुग्णालयांत परत रुग्णसेवा सुरू झाली. एका महिन्यांत छताचा मुलामा परत पडावयास सुरुवात झाली. भिंतीच्या फरशा निखळून खाली पडू लागल्या. स्वच्छताग्रुहांत वरच्या मजल्यावरच्या तत्सम जागेतून परत द्रव गळू लागला. वैद्यांनी आणि परिचारिकांनी तक्रारी केल्या, त्यांना केराची टोपली दाखविण्यात आली.
"हे असे का?" वैद्यराजांनी विचारले.
"योग्य त्या ठिकाणी भेट म्हणून पेट्या आणि खोके दिले की मग असे होते" असे त्यांना एका माहितगाराने सांगितले.
"म्हणजे काय ते मला समजले नाही" वैद्यराज म्हणाले.
"येणा~या कलियुगाची ही नांदी आहे वैद्यराज" माहितगार म्हणाला.
"निदान स्वच्छताग्रुहांत तरी पाणी गळू नये" वैद्यराज म्हणाले. "बिचा~या रुग्णांना ती एक गोष्ट तरी निर्विघ्नपणे करता यावी."
वैद्यराजांच्या समाधानासाठी म्हणून त्या चतुर स्थापत्यशास्त्रज्ञाला पाचारण करण्यात आले. त्याने वैद्यराजांचे म्हणणे नीट ऐकून घेतले.
"त्याचे काय आहे वैद्यराज" स्थापत्यशास्त्रज्ञ म्हणाला, "स्वच्छताग्रुहांच्या जमिनींत क्षार जास्त प्रमाणात आहेत. ते क्षार पाणी शोषून घेता आणि त्यामुळे गळती होते."
"पण जमीन फुटली म्हणून तुम्ही संपूर्ण स्लॅबच बदलली हो्ती ना?" वैद्यराजांनी विचारले. "मग क्षार आले कोठून?"
"अहो, आपल्याला मी काय सांगायचे? मनुष्याच्या मूत्रामध्ये क्षार ब~याच जास्त प्रमाणात असतात. ते गळतीबरोबर जमिनीत जातात." असे म्हणून स्थापत्यशास्त्रज्ञ वैद्यराजांचा बिरोप घेऊन निघून गेला.
नवी स्लॅब घातल्यावर जमीन पाणी झिरपणार नाही अशी बनवतात, तर मग क्षार जमिनींत गेले कसे असे वैद्यराजांना विचारायचे होते, पण तोपर्यंत स्थापत्यशास्त्रज्ञ आपल्या रथांत बसून राजाच्या स्थापत्य विभागाच्या अमात्यांच्या महालात पोचला होता.
"वैद्यराज, आपली मुद्रा अशी व्यथीत का?" असे त्यांना कोणितरी विचारले.
"कलियुगाची नांदी झाली हो" असे वैद्यराज विषण्णपणे म्हणाले.

Sunday, June 7, 2015

भुंग्याचे घर

आटपाट नगरांत एका भुंग्याने गुरुजींच्या घरातच घर बांधायचे असे ठरवले. खिडकीची कडी अडकविण्याचे छिद्र होते ते त्याला पसंत होते. त्या छिद्रातून त्या अल्युमिनियमच्या खिडकीच्या पोकळ चौकटीत प्रवेश करता येत असे. आतमध्ये जागा प्रशस्त होती. घर मोक्याच्या जागी होते. भरपूर झाडे होती, ज्यांची पाने आणि फुले तो खात असे. कावळ्याला घातलेले पाणी कावळा जवळपास नसताना तो पीत असे. तसे पाहिले तर बॅंक, पोस्टऑफिस, शाळा, महाविद्यालय, बस थांबा, टॅक्सीचा थांबा, रेल्वे स्टेशन, एटीएम, उपहारग्रुह, केशकर्तनालय, भांड्यांची दुकाने, तयार कपड्यांची दुकाने, विद्युत उपकरणांचे दुकान, वैद्य, औषधांचे दुकान वगैरे महत्वाची स्थळेही अगदी जवळ होती, पण भुंग्याला त्या गोष्टींमध्ये रस नव्हता. नाट्यग्रुह आणि चित्रपटग्रुह जरा लांब होते, पण भुंग्याला त्या गोष्टींमध्येही रस नव्हता. एक जैन देरासर, सहा मंदिरे, दोन मशि्दी आणि एक चर्च हाकेच्या अंतरावर होते. पण भुंग्याचे धर्माबद्दलचे मत फारसे स्पष्ट नव्हते, म्हणून तसा काही फरक पडत नव्हता. भुंग्याने घर बांधायला घेतले. फे~यांमागून फे~या मारून तो घरांत पावसाळ्याची बेगमी करायला लागला. पायांत पकडून तो फुलांच्या पाकळ्या आणि पानांचे तुकडे आणायचा, ते घेऊन त्या घरांत जायचा, ते साठवून ठेवायचा आणि  मग पुढच्या फेरीला रवाना व्हायचा.
"अहो, त्या भुंग्याने आपल्या घरात घर बांधायला घेतलेय हो" गुरुजींची पत्नी म्हणाली.
"असू दे ग" गुरुजी म्हणाले.
"असू दे काय? आपल्याला चावला म्हणजे? तुम्ही दिवसभर घराबाहेर असता. मी घरी असते. मलाच चावायचा."
"हं..." गुरुजी म्हणाले.
"तो बघा आला" गुरुजींची पत्नी म्हणाली.
गुरुजींनी त्या दिशेने पाहिले. भुंगा पांढ~या रंगाची एक फुलाची पाकळी घेऊन आला, जराही न अडखळता आपल्या घरात घुसला, थोड्या वेळाने रिकाम्या पायाने बाहेर आला आणि निघून गेला.
"खरंच ग! किती छान दिसतेय त्याची हालचाल. पाकळीसकट त्या येव्हढ्याश्या छिद्रातून आंत जाणे म्हणजे काही खायची गोष्ट नाही." गुरुजींनी पटकन भुंग्याचे छायाचित्र काढले होते.
"पुरे झाले त्याचे कौतूक. मी सांगतेय काय आणि तुम्ही म्हणताय काय? तो बघा परत आला."
एव्हाना खूप उकडते म्हणून गुरुजींनी पंखा लावला होता. भुंगा पायात फुलाची पाकळी धरून आत आला, पण त्याला त्याच्या घरात घुसता येईना. दारापर्यंत आला की तो वहावत गेल्यासारखा एका दिशेला जाई. मग प्रयत्न करून तो परत दाराशी गेला की परत वहावत जाई.
"अग, पंख्याच्या वा~यामुळे त्याने पायांत धरलेल्या पाकळीत हवा भरतेय, आणि शिडाच्या होडीसारखा तो वहावत जातोय. पंखा बंद कर जरा" गुरुजी म्हणाले.
"अहो, काहीतरीच काय? मी त्याचा बंदोबस्त करा म्हणतेय आणि तुम्ही त्याला त्याच्या घरात जायला मदत व्हावी म्हणून पंखा बंद करायला सांगताय?" असे म्हणून त्यांची पत्नी फणका~याने उठली, एक फडका घेऊन आली आणि तिने त्या भुंग्याला एक फटका मारला. 'अग थांब, लागेल त्याला' असे गुरुजी म्हणायच्या बेतात होते. पण पत्नीचा नेम लागणार नाही याची कल्पना असल्यामुळे आणि सूज्ञपणा असल्यामुळे त्यांनी तोंड बंद ठेवले. त्यांच्या अटकळीप्रमाणे त्यांच्या पत्नीचा नेम चुकला. पण त्या हवेच्या जोरदार झोक्यामुळे म्हणा किंवा घाबरून म्हणा, भुंग्याच्या पायांतून पाकळी आणि पान दोन्ही निसटले. त्या दोन गोष्टी खाली पडल्या आणि भुंगा उडून गेला. पत्नीने त्या गोष्टी तपासून पाहिल्या.
"अहो, ही फुलाची पाकळी नाहीये. हा पांढ~या दो~यांचा गुंता आहे" पत्नी उदगारली.
"आपल्या बाळांना झोपायसाठी त्याने ते दोरे आणले असणार" गुरुजी म्हणाले. त्यांचा जीव भरून आला.
"चला, उठा. ते छिद्र बंद करा" गुरुजींची पत्नी म्हणाली.
गुरुजी उठले. एक कापसाचा बोळा त्यांनी त्या छिद्रांत कोंबला. भुंगा आला, त्या बंद केलेल्या छिद्राभोवती थोडा वेळ उडला, आणि शेवटी निघून गेला.
त्याची आठवण म्हणून गुरुजींनी त्याचे छायाचित्र गूगल फोटोवर टाकले. त्यांच्या परवानगीने ते येथे ठेवले आहे.


भुंगा पिवळ्या बाणाने दाखविला आहे. त्याने पायांत धरलेली फुलाची पाकळी काळ्या बाणाने दाखविली आहे. छायाचित्र फारसे स्पष्ट नाही कारण एकतर गुरुजींना छायचित्र घेण्याची कला फारशी अवगत नव्हती आणि भुंगा जलद गतीने उडत होता.

Friday, June 5, 2015

आग्यावेताळ

गुरुजींच्या महाविद्यालयात एक दुसरे गुरुजी होते. त्यांचे वय गुरुजींच्या वयापेक्षा जास्त असले तरी ते गुरुजींना सेवेत कनिष्ठ होते, कारण सेवाज्येष्ठता ही शिक्षण, अंगभूत गुण, कार्य वगैरे अनेक गोष्टींवर अवलंबून असे. हे दुसरे गुरुजी अतिशय खाष्ट होते. बारीक बारीक गोष्टींवरून ते हाताखालच्यांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना धारेवर धरत असत आणि अगदी नको जीव करून टाकत असत. गुरुजी त्यांचे वरिष्ठ असूनही ते त्यांच्या मेंदूलाही आपल्या वर्तनाने मुंग्या आणत असत. सर्वांनी त्यांचे नांव आग्यावेताळ गुरुजी असे ठेवले होते.
राजाकडे शिक्षणसंस्थांचे नियम मोठे कडक होते. मनांत आलेल्याला शिक्षक म्हणून नेमता येत नसे. त्यामुळे शिक्षकांचा तसा तुटवडा जाणवत असे. वरिष्ठ शिक्षक सेवानिव्रुत्त झाले की जर त्याच दर्जाचे नवीन शिक्षक मिळाले नाहीत तर विद्यालयाची मा्न्यता जाण्याचा धोका असे. अशी परिस्थिती आली की राजा शिक्षकांच्या सेवानिव्रुत्तीचे वय वाढवत असे. म्हणजे आजचे मरण उद्यावर ढकलण्याची गोष्ट म्हणा ना. पण राजाच्या अंगी इतर अनेक गुण असले तरी दूरद्रु्ष्टीचा अभाव होता. त्यामुळे योग्य वेळी नवीन शिक्षकांच्या नेमणुका करण्याऐवजी तो तहान लागली की विहिर खणायला घेत असे. अशा विहिरी्तून पाणी थो्डेच मिळते. मग राजा शिक्षक मिळत नाहीत म्हणून सेवनिव्रुत्त होणा~या शिक्षकांचे सेवानिव्रुत्तीचे वय वाढवीत असे. त्यामुळे ते शिक्षक खूश झाले तरी कनिष्ट शिक्षक नाराज होत असत. कारण त्यांना बढती मिळणे तेव्हढ्या वर्षांनी पुढे ढकलले जात असे. राजाने आतापर्यंत सेवानिव्रुत्तीचे वय ५८ वरून ६० आणि नंतर ६० वरून ६२ करून झाले होते. आता राजा ते ६३ करण्याच्या विचारात होत, आणि नंतर ते ६५ करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन होता.
जेव्हा हा ६३ चा प्रस्ताव येऊ घातला तेव्हा गुरुजींनी कपाळाला हात लावला, कारण आता आग्यावेताळ गुरुजी आणखी एक वर्ष आपल्याला त्रास देणार हे त्यांच्या लक्षात आले. या विषयावर सर्व कनिष्ठ शिक्षकांनी संपावर जाण्याचा जाहीर इशारा दिला. पण आग्यावेताळ गुरुजींच्या हाताखाली काम करणा~या तीन शिक्षकांनी तर कमालच केली. ही गोष्ट गुरुजींना विभागांत काम करणा~या एका व्यक्तीकडून समजली.
"गुरुजी, ते तीन शिक्षक म्हणत होते की जर का राजाने सेवानिव्रुत्तीचे वय आणखी एक वर्षाने वाढविले, तर ते तिघेही राजीनामा देऊन नोकरी सोडून जातील. ते अगदी कंटाळलेत या आग्यावेताळ गुरुजींना. आग्यावेताळ गुरुजी सेवानिव्रुत्त झाल्यावर जर राजाने ते वय ६३ केले तर त्यांची हरकत नाहीये."
"अहो, मला त्यांचे दुःख समजतय हो. मी स्वतः आग्यावेताळ गुरुजींना वरिष्ठ असूनही इतका कंटाळलोय, की कधी कधी मुदतपूर्व सेवानिव्रुत्ती घेऊन येथून बाहेर पडावे असे मला वाटते."
"मग?"
"मी सेवानिव्रुत्त झालो तर आग्यावेताळ प्रमुख् शिक्षक होतील आणि सगळ्यांना रोज छळतील म्हणून मी येथे टिकून राहिलोय."

Wednesday, June 3, 2015

अगम्य थरथर

आटपाट नगरातले गुरुजी ज्या मुलांना शिकवत असत ती महाविद्यालयातली मुले होती. खरे तर त्यांना मुले न म्हणता बापेच म्हणायला हवे होते, कारण ती सर्व मुले मुली विशीच्या वरची असत. पण त्यांचे शिक्षण चालू होते म्हणून त्यांना मुले म्हणायचे येव्हढेच. आणि तसे पाहिले तर गुरुजींचे वय पहाता ती सर्व त्यांची मुले शोभण्याच्या वयाची होती. पण मुले म्हटले तरी त्यांचे सर्व व्यवहार मोठ्या माणसांसारखेच असायचे. दुर्दैवाने ते सरळ मनाच्या गुरुजींच्या लक्षात येत नसे.
गुरुजी मुलांना पुस्तकी ज्ञानाबरोबरीने प्रात्यक्षिकेही शिकवायचे. शिकवून झाल्यानंतर त्यांच्या निरीक्षणाखाली मुले ती प्रात्यक्षिके स्वतः करत असत. चुका झाल्यावर गुरुजी ओरडतील हे माहीत असल्यामुळे घाबरतही असत. गुरुजी फक्त मुलांमध्ये सुधारणा व्हावी म्हणून ओरडायचे. मुलांना घाबरवणे हा त्यांचा हेतू नसायचा. त्यामुळे ती घाबरत असतील असे त्यांच्या मनात येत नसे. पण प्रात्यक्षिके करताना आपण जवळ उभे राहिलो की विद्यार्थांचे, विशेषतः मुलींचे हात थरथरतात, आणि आपण जवळ आहोत हे माहीत नसले तर थरथरत नाहीत हे जेव्हा त्यांच्या लक्षांत आले, तेव्हा त्यांना या थरथरण्याचे कारण समजले. गुरुजींनी विद्यार्थ्यांची थरथर थांबविण्यासाठी काय करता येईल याचा खूप विचार केला, पण उपाय काही मिळाला नाही.
"अहो, ती मुले तुम्हाला येव्हढी घाबरतात, याला उपाय एकच. तुमचा रागीट स्वभाव सोडून द्या" असा त्यांच्या पत्नीने त्यांना सल्ला दिला. पण स्वभाव काही सोडायचा म्हणून सुटतो का? पण विध्यार्थ्यांमध्ये सुधारणा झाली की गुरुजी त्यांचे कौतुक करायचे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढायचा. मग अशी थरथर होत नसे.
गुरुजींना मुलांच्या थरथरण्याचे कारण समजले. आता न समजण्यासारखे काही राहिले नाही असे त्यांना वाटले. पण जीवनात असे थोडेच होत असते? काही काही बाप्या विद्यार्थ्यांचे हात प्रात्यक्षिके करत नसतांनाही थरथरत असत. गुरुजींनी गूगल वर शोध घेतला तेव्हा ही थरथर आवश्यक (आंग्लभाषेत त्याला इसेन्शिअल असे म्हणत) अशा प्रकारची असेल असे त्यांना आढळले. ही अनावश्यक असणारी थरथर आवश्यक कशी असू शकते हे काही त्यांना समजेना. अशी थरथर असणा~या वि्द्यार्थांचे डोळे लाल का असतात हेही त्यांना समजेना. शेवटी त्यांनी हा प्रश्न राजाच्या रुग्णालयातील वैद्यमहाराजांना विचारला.
"गुरुजी, सुरापान करणा~या माणसांना अशी थरथर होते बरे" असे वैद्यराज थोडेसे हसून म्हणाले.
"विद्यार्थीदशेत सुरापान? शांतं पापं!" गुरुजी म्हणाले.
"गुरुजी, आपला काळ गेला. आजच्या काळात हे असेच चालायचे" वैद्यराज म्हणाले.
"मला थोडे्से कनिष्ठ एक शिक्षक आहेत. त्यांचे हातही असेच थरथरतात. ते सुद्धा ...." गुरुजी चाचरले.
"मी ओळखतो त्यांना" वैद्यराज म्हणाले. "ते सुद्धा."
"आणि माझ्या आधी आमच्या मुख्य होत्या त्या शिक्षिका? त्यांचे हात थरथरायचे. त्यांना आवश्यक थरथर असावी नाही?" गुरुजींनी विचारले.
"त्यांच्या बद्दल मी काही बोलणे योग्य होणर नाही, काही आजार झाला तर उपचारांसाठी त्या माझ्याकडेच येत असत" वैद्यराज म्हणाले. "पण या कारणामुळे थरथर होणा~या स्त्रिया मी पाहिल्या आहेत."
"स्त्री आणि सुरा?"
"गुरुजी, कोठच्या काळांत आहात तुम्ही? आजकाल वरच्या सामाजिक स्तरातल्या काही स्त्रिया पार्ट्यांमध्ये आणि घरीसुद्धा सुरापान करतात हो."
गुरुजी थोडा वेळ गप्प राहिले. मग त्यांनी घाबरत घाबरत विचारले.
"या दोन कारणांपेक्षा वेगळी अशी थरथर होण्याची इतर कारणे मी आणि माझे विद्यार्थी यांच्याशी संबंधित आहेत का? असली तर मला सांगून ठेवा."
"म्हातारपणामुळे होते असे. इतर आजारांतही थरथर होऊ शकते. पण तसे काही वाटले तर माझ्याकडे संबंधितांना पाठवून द्या. तुम्ही डोक्याला त्रास करून घेऊन नका."
"आणखी एक विचारू?"
"अवश्य विचारा."
"तुमच्या वैद्यक व्यवसायात अशी उदाहरणे आढळतात का हो?"
"हो तर! दोन्ही प्रकारची आढळतात. अगदी शल्यविशारदांतही आढळतात. अहो, सगळी माणसे इथून तिथून सारखीच असतात हो."
गुरुजींनी मनातल्या मनात कपाळाला हात लावला.

Monday, June 1, 2015

नलिकेवरचे झाड

आटपाट नगरात सुरुवातीला बैठी घरे होती. पण लोकसंख्या वाढू लागली त्या प्रमाणात राज्याचे क्षेत्रफळ काही वाढेना. शेवटी अनेक मजली घरे बांधावी लागली. त्यामुळे नवेच प्रश्न निर्माण झाले. घरे जमिनीच्या जवळ होती तेव्हा मलनिःसारण करणे सोपे होते. ते जमिनीत सोडून दिले की काम होत असे. पण वरच्या मजल्यावरच्या घरांचे मलनिःसारण कसे करायचे? मैला डोक्यावरून वाहून नेण्यास तर राजाने कायदा करून बंदी घातली होती. मग त्याच्या अभियांत्रिकी विभागाने शक्कल लढविली. त्यांनी सहा इंची नळ्या बसवून मल वाहून नेण्याची तजवीज केली. सर्व प्रजाजन आनंदाने नांदू लागले.अभियंत्यांचे प्लंबिंग कधीकधी ढिले पडत असे. मग जोडलेल्या नळ्यांच्या सांध्यांतून आत असणारा द्राव बाहेर वहात असे. समजूतदार नागरिक प्लंबरला बोलावून सांधे जोडून धेत असत आणि आयुष्य पुढे चालू रहात असे.
नगरात एक साध्या आणि सरळ स्वभावाचे गुरुजी रहात असत. ते कोणाच्या अध्यातमध्यात नसत. गुरुजी वरच्या मजल्यावर रहात असत. त्याच इमारतीत पहिल्या मजल्यावर एक तामस व्रुत्तीचा ब्राम्हण रहात असे. ब्राम्हण स्वतःच्या हक्कांबाबत अतिसजग आणि चिड्खोर होता. जरा काही मनाविरुद्ध झाले की तो हमरातुमरीवर येत असे. एक दिवस ब्राम्हणाच्या घरातून बाहेर जाणा~या नळीचा सांधा ढिला पडला. ब्राम्हणाला काही हे समजले नाही, कारण वेळ रात्रीची होती, आणि अंधारात घराबाहेर काय घडते आहे हे त्याला समजण्याचा काही मार्ग नव्हता. अकस्मात त्याचा आंतर-दूरध्वनी खणाणला. रात्री पावणेबारा वाजता दूरध्वनी खणाणल्यावर ब्राम्हणाच्या ह्रुदयांत धस्स झाले. आंतर-दूरध्वनी  वाजतॉ आहे म्हणजे इमारतीतीलच कोणीतरी दूरध्वनीवर असणार असे त्याच्या मनात आले.
"हॅलो" गुरुजींनी आंतर-दूरध्वनीच्या मौखिकेत म्हटले.
"तुम्ही खिडकीतून बाहेर पाणी ओतता आहात काय?" असा ब्राम्हणाचा उच्चरवातला उर्मट आवाज आला. "ते आमच्या घरात येते आहे."
मागे एकदा खिडकीच्या काचा धुताना याच मुद्द्यावरून ब्राम्हणाने मोठे भांडण केले होते ते गुरुजींना आठवले. तसेच एकदा पाऊन आला तेव्हा तुम्हीच पाणी ओतत आहात असा आरोप ब्राम्हणाच्या मातोश्रींनी करून भांडण करण्यास सुरुवात केली होती तेही त्यांना स्मरले.
"नाही बुवा" गुरुजी म्हणाले.
"मग वरून पाणी येतेय कोठून" ब्राम्हणाने विचारले.
"आमच्या वरच्या किंवा खालच्या मजल्यावरून येत असेल. आपण समोरच्या इमारतीच्या गच्चीवर जाऊन ते पहावे. आता मला बोलत बसायला वेळ नाही. उद्या सकाळी मुलांना शिकवायला जायचे आहे" असे म्हणून गुरुजींनी दूरध्वनी बंद केला.
दुस~या दिवशी हे खिडकीतून ओतलेले पाणी नसून निःसारणाचे पाणी आहे हे ब्राम्हणाला समजले. त्याने इमारतीच्या कचेरीत जाऊन गळणा~या नलिकेची दुरुस्ती युद्धपातळीवर करून घेतली. गुरुजींना मात्र त्याने अक्षरानेही काय घडले ते सांगितले नाही. ते त्यांना दुरुस्तीचे काम होताना पाहूनच समजले.
दोन वर्षे गेली. गुरुजींच्या घराच्या निःसारणाच्या नलिकेच्या सांध्यावर पिंपळाचे झाड उगवले. जॅक आणि बीनस्टॉक या गोष्टीतल्या झाडासारखे ते वेगाने फोफावू लागले. गुरुजींच्या घरात लावलेली तुळस खतपाण्याचे लाड करूनही खुरटलेली होती, आणि घराबाहेरच्या नलिकेवर वाढणारे हे झाड असे वेगाने वाढत होते, हे कसे ते गुरुजींना समजेना.
"अहो, त्या नलिकेच्या सांध्यातून त्या झाडाच्या मुळांना सोनखत मिळत असणार. आता लवकरच तो सांधा निखळेल, आणि मग पूर्वीसारखे भांडण होईल. त्यापूर्वीच झाड काढून घ्या" असे गुरुजींच्या पत्नीने म्हटले.
गुरुजी इमारतीच्या कार्यालयात गेले आणि त्यांनी तक्रार नोंदविली. एक आठवडा गेला, पण झाड काढायला कोणी आले नाही. झाड गुरुजींच्या सज्जापर्यंत पोहोचले. आता ब्राम्हण त्या गोष्टीतल्या जॅकसारखा झाडावर चढून आपल्या घरी भांडण करायला येईल अशी त्यांना भिती वाटू लागली. ते परत इमारतीच्या कार्यालयात पोहोचले. सचिवाने त्यांचे स्वागत केले. बसवून घेतले. गुरुजींनी आपली व्यथा त्याला सांगितली.
"ते झाड काढून घेता येईल का?" गुरुजींनी नम्रपणे विचारले.
"गुरुजी, माझे हात बांधलेले आहेत. कार्यकारिणी बदलते आहे. आज मी या कामाचा खर्च केला तर नवे कार्यकारी मंडळ आक्षेप घेईल."
"नको नको. राहू दे" गुरुजी म्हणाले. "उगाच त्यातून नवे वाद निर्माण व्हायला नकोत. तुमच्या डोक्याला उगाच त्रास होईल. आपण थांबूया. नवी कार्यकारिणी कार्यान्वित होण्यापूर्वी जर नलिकेचा सांधा झाडाच्या मुळांनी तोडला, तर ब्राम्हण आपल्या कार्यालयात धावतपळत येईलच ते दुरुस्त करून घ्यायला."
"ते तर खरंच" सचिव म्हणाले. "पण तो तुमच्यासारखा सभ्यपणे बोलणार नाही."
गुरुजींनी सचिवाकडे चमकून बघितले. दोन वर्षांपुर्वी आणि बहुतेक इतर अनेक वेळा ब्राम्हणाने कार्यालयात येऊन कसे वर्तन केले असावे ते त्यांच्या पटकन ल्क्षांत आले. ते मिस्किलपणे हसले आणि घरी जाण्यासाठी उठले.