Pages - Menu

Tuesday, July 21, 2015

चिमट्याचा चिमटा

आटपाट नगरात वैद्यकीय सेवा प्रगत म्हणाव्या अशा होत्या. आंग्लदेशांत प्रसूती अडलेल्या स्त्रीला मोकळे करण्यासाठी मुलाच्या डोक्याला चिमटा लावतात तसा चिमटा राजाच्या रुग्णालयांतही लावत असत. हा चिमटा लावण्याचे विशिष्ट असे तंत्र असे. चिमट्याची दोन पाती मुलाच्या डोक्याच्या दोन बाजूंना लावावी लागत असत. जर ती तिरकी लावली तर मुलाचे डोके खूप दाबले जाऊन अंतर्गत रक्तस्त्राव होणे, कवटीचे हाड मोडणे वगैरे होण्याचा धोका असे.
त्या दिवशी राजवैद्य अस्वस्थ दिसत होते. गुरुजींनी आपल्या आणि त्यांच्या घरांच्या मधल्या कुंपणावरून ही गोष्ट पाहिली.
"राजवैद्य, आपण अस्वस्थ का आहात?" गुरुजींनी कुंपणावर रेलून विचारले.
"अहो, आमच्याकडे एक सहाय्यक वै्द्य आहेत. प्रसूतीच्या वेळी मुलाच्या डोक्याला चिमटा लावावा लागला, तर ते हटकून चिमटा तिरका लावतात. ते धोक्याचे असते. तो सरळच लावायचा असतो."
"पण त्यांना तसे करतांना थांबवीत का नाही?" गुरुजींनी विचारले.
"ते रात्रपाळीच्या वेळी चिमटा लावतात तेव्हा कोणी वरिष्ठ उपस्थित नसतात. ही गोष्ट दुस~या दिवशी समजते.".
"पण ते तुम्हाला दुस~या दिवशी कसे समजते?"
"त्या चिमट्याचे वळ मुलाच्या नाजूक त्वचेवर दिसतात ना. कपाळावर, डोळ्यांभोवती असे वळ दिसले की समजायचे, चिमटा तिरपा लावला होता."
"त्यांना समजावून सांगून सुधारायला हवे" गुरुजी म्हणाले.
"अहो, आपण तिरपा चिमटा लावला असे ते कबूलच करत नाहीत. आपण चिमटा व्यवस्थितपणे लावला होता असेच ते म्हणतात" राजवैद्य म्हणाले.
"मग ते वळ कसे उठतात? की ते वैद्य चिमटा लावतांना ते प्रसूत न झालेले अर्भक नको नको अशा अर्थी डोके हलवते आणि चिमटा डोक्याच्या बाजूंना न लागता समोर आणि पाठी लागतो?" गुरुजी बोलून गेले.
अर्भकाला 'नको नको' अशा अर्थी डोके हलविता येते का आणि येत असले तरी प्रसूतीमार्गांत डोके गच्च अडकलेले असतांना त्याला तसे करता येईल का हे बहुधा गुरुजींना उमजले नसावे अशा शंकेने राजवैद्यांनी गुरुजींकडे पाहिले. गुरुजींचे मिस्किल स्मिहास्य पाहून त्यांना गुरुजींचा उपरोध समजला आणि ते सुद्धा हसले.