Pages - Menu

Wednesday, July 8, 2015

तबकधारिणी

आटपाट नगरातल्या राजाच्या राजवैद्यांच्या कपाळावर आठी बघून मास्तर विचारात पडले. एखादा निदान करण्यास अवघड असा रुग्ण आला की एखाद्या रुग्णाची तब्येत अनपेक्षितपणे खालावली?
"वैद्यराज, सर्व काही क्षेम आहे ना?" गुरुजींनी विचारपूस केली.
"अं... ह..हो. तसे पाहिले तर सर्व काही क्षेम आहे" राजवैद्य उत्तरले.
"मग ही कपाळावरची आठी?"
आपल्या कपाळावर आठी दिसते आहे हे राजवैद्यांना तेव्हा कुठे समजले.
"अहो गुरुजी काय सांगू? आमचा तो राक्षस आहे ना..."
"राक्षस म्हणजे सर्वांना छळणारे ते सहवैद्य का?" गुरुजींनी विचारले.
"तेच ते. त्यांचे वर्तन आठवून कपाळावर आठी पडली. आज मी रुग्णांना तपासण्याच्या फेरीवर चाललो होतो, तेव्हा पाहिले, तर एक पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी वैद्य मुलगी शल्यक्रियाग्रुहाबाहेर अवघडून उभी होती. अंगावर शल्यक्रियाग्रुहात घालायचे हिरवे कपडे होते. दोन्ही हातांवर तिने हिरव्या कपड्यांची एक जोडी तबकांत धरावी तशी तोलून धरली होती. शल्यक्रियाग्रुहाचा सेवकसुद्धा असा कपडे धरून उभा रहात नाही. मी तिला विचारले की ती अशी का उभी आहे, तेव्हा पत्ता लागला की राक्षस समोर विश्रामकक्षांत बसला होता आणि तो बाहेर आला की त्याला ते कपडे देण्यासाठी ती तेथे उभी होती."
"राक्षसाचे वर्तन राजेशाही दिसते" गुरुजी म्हणाले.
"अहो, महाराजांना एक वेळ जे शोभेल तसे वर्तन राक्षसाला कसे शोभेल? मी स्वतः राजवैद्य असून मी सर्व आयुष्यांत असा कधी वागलो नाही."
"मग तुम्ही काय केलेत?" गुरुजींनी विचारले.
"ते कपडे त्यांना दे आणि शल्यक्रियाग्रुहांत जा असे मी तिला सुचवले" राजवैद्य म्हणाले. "पण ती हसली आणि नको असे म्हणाली."
"शेजारच्या भोजनकक्षांतले एक जेवणाचे ताट तिला द्यायचे होतेत" गुरुजी म्हणाले "त्यांत कपडे ठेवून उभी राहिली असती तर तबकांत ठेवल्यासारखे वाटले असते."
राजवैद्य हंसले.