Pages - Menu

Saturday, November 7, 2015

श्रद्धास्थान

आटपाट नगरचे राजवैद्य आणि गुरुजी संध्याकाळी निवांत बसले होते. राजवैद्य गप्प गप्पच होते.
"काय राजवैद्य, आज गप्पसे? काही विपरित तर घडले नाही ना?" गुरुजींनी विचारले.
"नाही. जुनी आठवण आली. तेव्हाची श्रद्धास्थाने आज डळमळीत वाटायला लागली म्हणून मन उदास झालेय."
"कशाबद्दल म्हणताय तुम्ही?" गुरुजींनी विचारले.
"माझ्या विद्यार्थीदशेतली गोष्ट आहे. शल्यक्रियाशास्त्राचे आमचे प्राध्यापक होते. त्यांचे व्यक्तीमत्व आम्हाला उत्तुंग वाटायचे. त्यांचा आदर्श नजरेपुढे ठेवून भविष्याकडे वाटचाल करावी असे वाटायचे. त्या काळच्या दोन घटना आठवल्या. एकदा सायंकाळी आपत्कालीन शल्याक्रियाग्रुहांत ते एका रुग्णाचे अपेंडिक्स काढणार होते. सामान्यपणे हे काम कनिष्ठ वैद्य करत असत. प्राध्यापकांकडून ते  शिकायला मिळणार म्हणून मी तेथे गेलो होतो. शल्यक्रिया सुरू करण्यापूर्वी त्यांनी मला एका बाजूला बोलावले आणि हलक्या आवाजांत म्हणाले 'आता मी जे अपेंडिक्स काढणार आहे ते खरे तर तीव्र अपेंडिसायटिस झाले म्हणून काढत नाहीये. आपल्या एका वैद्यांचा खाजगी रुग्ण आहे, त्यांनी विनंती केली म्हणून काढतो आहे. तर ते निरोगी दिसते आहे असे मोठ्याने म्हणू नकोस,' मी तत्काळ नाही असे म्हटले आणि माझा शब्द पाळला.. तेव्हा मला त्यांत गैर काय ते काही समजले नाही. नंतर एकदा मी त्यांना एका रुग्णाच्या जखमेची मलमपट्टी स्वतः करताना पाहिले. प्राध्यापक स्वतः हे काम कधी करत नाहीत तर शिकाऊ वैद्यांना करायला सांगतात हे मला माहीत होते. त्यांना मी परत कधीही कोणाची मलमपट्टी करताना पाहिले नाही."
"यामुळे आपण आज व्यथित का झाला आहात?" गुरुजींनी विचारले.
"आज मला एकदम जाणवले की खाजगी व्यवसाय करण्यास राजाची परवानगी नसताना त्यांनी आपले खाजगी रुग्ण राजाच्या रुग्णालयांत आणले आणि त्यांच्यावर उपचार केले, ज्याचे पैसे त्यांनी रुग्णालयाबाहेर घेतले असावे. माझ्याकडे या गोष्टीचा काही पुरावा नाही. पण आज खुले आम काय चालले आहे ते पाहता माझा अंदाज खरा असावा असे वातते.. विद्यार्थ्यांसमोर असा आदर्श ठेवणारे वैद्य एकेकाळी आमचे श्रद्धास्थान होते याचा आज विषाद वाटतोय."