Pages - Menu

Saturday, January 2, 2016

वैद्यांचा छळ

आटपाटनगरचे राजवैद्य सकाळचे रुग्णपरिचर्येचे काम संपवून आपल्या कार्यालयांत बसले होते. तेव्हढ्यात  दोन कनिष्ठ वैद्य तेथे आल्या. त्यांच्या चेहर्‍यांवरून काहीतरी बिनसले आहे याची कल्पना येत होती.
"काय झाले? सर्व काही क्षेम आहे ना?" राजवैद्यांनी विचारले.
"राजवैद्य, काल आम्ही आपत्कालीन विभागात कार्यरत होतो. नवे वर्ष सुरू झाले म्हणून रात्री बाहेरून जेवण आणि सरबत मागविले होते. पदव्युत्तर प्रशिक्षणार्थी वैद्यही जेवायला होते. जेवण झाले. सरबत कोणाला फारसे आवडले नाही म्हणून शिल्लक राहिले. उष्टे खरकटे साफ केले, पण सरबत टाकून द्यायचे जिवावर आले म्हणून त्याची बाटली टेबलावर तशीच ठेवली."
"मग काय झाले? कोणी ते पिऊन गेले काय?" राजवैद्यांनी विचारले. आणखी काही विपरित होईल असे त्यांना वाटले नाही.
"नाही हो. तसे झाले असते तर बरे झाले असते. पैसे फुकट गेले नसते. सकाळी आग्यावेताळ वैद्य आले ते आमच्या खो्लीत गेले. त्यांनी ती बाटली पाहिली. मग त्यांनी त्या बाटलीचे आपल्या मोबाईल फोनवर फोटो काढले. आता ते तुमच्याकडे तक्रार करणार आहेत."
"का? सरबत पिऊ नये असा नियम आहे का?" राजवैद्यांनी विचारले.
"आम्ही मद्य प्राशन केले असे ते सुचवित आहेत. पण ते सरबतच होते. आम्ही पण फोटो काढले आहेत. बाटलीवर सरबत असे लेबल लावलेले स्पष्ट दिसते आहे" वैद्य म्हणाल्या.
"त्या उरलेल्या सरबताचे आपण काय केले? रासायनिक परीक्षेसाठी पाठवायचे आहे का?" राजवैद्यांनी विचारले.
"नाही हो. आम्ही ते ओतून टाकले" वैद्य म्हणाल्या.
"ठीक आहे. तक्रार आली तर मी बघतो काय करावयाचे ते. आपण निश्चिंत रहा" राजवैद्य म्हणाले.
तक्रार काही आली नाही.
"आग्यावेताळ वैद्य असे इतरांना विनाकारण मानसिक त्रास का देतात?" दुसर्‍या एका वैद्यांनी राजवैद्यांना विचारले.
"स्वभाव. त्यांत त्यांना दुष्ट आनंद मिळत असावा. लहानपणी ते झुरळे पकडून त्यांचे ए्क एक पाय तोडत होते असणार, फूलपाखरांना पकडून त्यांचे पंख तोडत होते असणार, किंवा मुंग्यांना जळत्या उदबत्तीने मारत होते असणार. एक प्रकारचा मनोविकार आहे त्याच्यात असे होते. त्याला औषध नाही."
"आग्यावेताळ वैद्य सेवानिव्रुत्त होण्यापूर्वी अशा औषधाचा शोध लागावा" ते वैद्य म्हणाले.