Pages - Menu

Monday, July 13, 2015

जबर आत्मविश्वासाचा पाया

राजवैद्य नुकतेच कनिष्ठ सहवैद्यांच्या नियुक्तीच्या मुलाखती घेऊन आले होते. त्यांच्या पत्नीने गुळाचा खडा आणि पाणी त्यांच्या समोर आणून ठेवले होते. ते कपाळावरचा घाम पुसत असतांना आपल्या घरी जाता जाता गुरुजी त्यांच्या घरांत डोकावले.
"काय राजवैद्य, कशा काय झाल्या मुलाखती?" गुरुजींनी विचारले.
"या गुरुजी. बसा. अहो, गुरुजींना गूळ पाणी द्या जरा."
"नको" गुरुजी म्हणाले. "घरी जायला पाहिजे."
'मुलाखती नेहमीप्रमाणेच झाल्या" राजवैद्य म्हणाले. "तसेच उमेदवार, तेच तेच प्रश्न, तशीच उत्तरे..."
"नवे नवे उमेदवार येतात तर नवे अनु्भव येत असतील ना?" गुरुजींनी विचारले.
"येतात ते अनुभव कथन करण्यासारखे नसतात" राजवैद्य म्हणाले.
"मी समजलो नाही" गुरुजी म्हणाले.
"इतरांपेक्षा वेगळे असे थोडे उमेदवार असतात. त्यांचा आत्मविश्वास प्रचंड असतो. आयुष्यभर ज्ञान वेचले तरी असणार नाही असा तो आत्मविश्वास असतो. प्रत्येक सत्रांत असा एक उमेदवार तरी असतोच."
"प्रचंड ज्ञान आणि कर्त्रुत्व असणारे सहवैद्य मिळत असतील तर वाईट काय आहे?" गुरुजींनी विचारले.
"अहो, त्यांचे ज्ञान आणि कर्त्रुत्व प्रचंड नसते हो." राजवैद्य म्हणाले.
"मग मूर्ख असणार" गुरुजी म्हणाले.
"अं हं! मूर्ख नाही, अती शहाणे असतात. आपली निवड नक्की होणार अशी त्यांची खात्री असते. आणि त्याचे कारण प्रचंड ज्ञान आणि कर्त्रुत्व नसून शिफारस हे असते. मंत्री, मनसबदार, सचिव वगैरे लोकांकडून या उमेदवारांची निवड करा असे आदेश असतात. ते त्यांना माहित असते. मग का बरे प्रचंड आत्मविश्वास असणार नाही?"
गुरुजी स्तब्ध झाले. राजवैद्यांच्या मनाला होणा~या यातना, या विषवल्लीच्या फळांचे होणारे समाजावरचे दूरगामी परिणाम हे सगळे त्यांच्या डोळ्यांपुढून झरकन गेले. काही न बोलता गुरुजी उठले, पायांत वहाणा सरकवल्या आणि घराकडे निघाले. राजवैद्यांनी पत्नीने दिलेला गुळाचा खडा तोंडात टाकला, पण त्यांना तो गोड काही लागला नाही.