Pages - Menu

Wednesday, July 15, 2015

मनोरुग्ण वैद्य

आटपाट नगरचे राजवैद्य आणि गुरुजी सायंकाळी एकत्र फिरायला म्हणून बाहेर पडले होते. समोरून एक वेडा हातवारे करत आणि मोठ्यामोठ्याने ओरडत येत होता. त्याला पाहून गुरुजींना एक जुना अनुत्तरीत प्रश्न आठवला.
"राजवैद्य, वेड्या रुग्णांवर उपचार करणारे वैद्य कालांतराने स्वतः वेडे होतात असे मी ऐकले आहे. ते खरे आहे काय?"
"नाही हो. ती एक भ्रामक समजूत आहे. वेडेपणा हा काही संसर्गजन्य रोग नसतो" राजवैद्य  म्हणाले.
"नशीब. नाहीतर वैद्यच वेडा झाला तर रुग्णांचे व्हायचे काय?" गुरुजी म्हणाले.
"वैद्यसुद्धा मनोरुग्ण असतात हो" राजवैद्य  म्हणाले.
"काय सांगता काय?" गुरुजी आश्चर्याने म्हणाले.
"असे वैद्य रुग्णांवर उपचार करू लागले तर कठीण परिस्थिती येऊ शकते. पण आजार नियंत्रणात असताना जर योग्य विचार करून त्यांनी व्यवस्थापकीय काम घेतले, तर तेव्हढी कठीण परिस्थिती येत नाही. मोठमोठ्या रुग्णालयांतले प्रमुख किंवा उपप्रमुख वैद्य स्किट्झोफ्रेनिया या आजाराने ग्रस्त असल्याचे इतिहास सांगतो."
"आपल्या रुग्णालयांत असे वैद्य होते का?" गुरुजींनी विचारले.
"हो. पण क्रुपा करून त्यांची नावे विचारू नका." राजवैद्य  म्हणाले.
"पण ते असे असल्याचे विद्यार्थीदशेत लक्षांत आले, तर त्यांना वैद्य होण्यापासून थांबविता येत नाही का?"
"कल्पना चांगली आहे, पण तसे आजवर झालेले नाही. मुलांचे पालक त्याला विरोध करतात. मध्ये आमच्याकडे असा एक विद्यार्थी होता. बरोबरच्या विद्यर्थिनींना तो अश्लील संदेश पाठवायचा. घाणेरडी छायाचित्रे पाठवायचा. प्रकरण कोतवालीत गेले होते. त्याचे वडील मध्यपूर्वेच्या देशांत गडगंज कमवीत होते. त्यांनी ते प्रकरण दाबून टाकले. मुलगा हुशार होता, पण हुशारी भलत्याच गोष्टींत चालू लागली. कसाबसा वैद्य झाला. मग काही उद्योग न करता निवडक शिक्षकांच्या बद्दल सोशल मिडियात गलिच्छ भाषेत लिहायला लागला. स्वतः पुरुष असून स्त्रीची छायाचित्रे स्वतःची म्हणून इंटरनेटवर टाकू लागला. उत्तरेच्या खेड्यांत रहात असूनही आपण प्रगत विदेशांत रहातो असे सांगू लागला."
गुरुजींचे डोके गरगरले. "सोशल मिडिया आणि इंटरनेट म्हणजे काय ते समजले नाही" ते म्हणाले.
"ते विदेशी तंत्रज्ञान आहे. तुमच्या मुला-नातवंडांना ते समजेल, तुम्हाला नाही. अजून आपल्याकडे त्याचा प्रसार झालेला नाही. ते असो. त्याला उपचार करण्यासाठी त्याचे पालक आणत नाहीत तोवर काहीच करता येत नाही. आमच्या रुग्णालयांत हा एक, पण जगांत असे किती असतील."
"आपण ज्या वैद्याकडे औषधोपचारांसाठी जातोय तो स्वतःच मनोरुग्ण निघाला तर काय, या विचाराने भिती वाटते हो" गुरुजी म्हणाले.
"आम्ही आहोत ना? चिंता करू नका" राजवैद्य  म्हणाले.
"होय हो. पण तुम्ही आम्ही एक दिवस वर जाणार. आमच्या मुलाबाळांचे काय होईल या विचाराने भिती वाटते" गुरुजी म्हणाले.
"परमेश्वरावर विश्वास ठेवा, गुरुजी. 'परित्राणाय साधूनाम्, विनाशाय च दुष्क्रुताम्' असे भगवान श्रीक्रुष्णांनी सांगितले आहे. ते या दुष्क्रुतांचे निर्मूलन करतील" राजवैद्य  म्हणाले.