Pages - Menu

Sunday, August 30, 2015

शेजारधर्म

आटपाट नगरातली गोष्ट आहे. गुरुजींच्या शेजारपाजारी भली माणसे रहात असत. गोडीगुलाबीने आणि सलोख्याच्या वातावरणात सर्वांचे आयुष्य व्यतीत होत होते. पण उडदामाजी काळे गोरे म्हणतात ना, तसा प्रकार व्हायला लागला.
एके दिवशी प्रक्रुती अस्वास्थ्यामुळे गुरुजी सकाळी कामावर गेल्यानंतर तासाभरातच घरी परतले. दाराबाहेर जरा गडबड दिसली. ते थबकले आणि काय चाललेय त्याचा त्यांनी अंदाज घेतला.
"ही शिडी घ्या आणि आमच्या दूरध्वनीची तार बदला" गुरुजींच्या शेजारच्या बाई दूरध्वनी तंत्रज्ञाला सांगत होत्या. त्याने गुरुजींच्या दाराबाहेर ठेवलेली त्यांची शिडी घेतली आणि काम सुरू केले. गुरुजी सर्द झाले. शेजा~यांकडे त्यांची स्वतःची चांगली शिडी होती. असे असतांना त्यांनी स्वतःच्या कामासाठी गुरुजींची शिडी वापरावी हे काही योग्य दिसत नव्हते. काही न बोलता ते आपल्या घरांत शिरले. शेजारच्या बाईंचा चेहरा जरा पडला. सायंकाळी त्यांनी पत्नीला ही गोष्ट सांगितली, तेव्हा ती म्हणाली,
"गेल्या आठवड्यांत त्यांचा दिवा बदलायचा होता, तेव्हापण त्यांनी आपल्याला न सांगता आपली शिडी वापरली होती."
नंतर पावसाळा आला. रविवार असल्यामुळे गुरुजी घरी होते. दारांत उभे राहून काही काम करत होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. तेव्ह्ढ्यात त्यांच्या शेजारच्या बाई आल्या. त्यांची छत्री गळत होती. गुरुजींनी काय असे काय, भिजायला झाले ना, वगैरे म्हटले पण त्या आपल्या घरी काही जाईनात. शेवटी त्यांनी गुरुजींच्या पायाजवळचे 'सुस्वागतम' असे लिहिलेले गुरुजींचे पायपुसणे खस्सकन ओढून घेतले, त्याला पाय पुसले, आणि मग आपल्या घरांत शिरल्या. इतकी वर्षे या बाई आपलेच पायपुसणे वापरत आल्या आहेत हे गुरुजींना तेव्हा समजले.
पोस्टमनने आणलेल्या पत्राची गोष्ट तर कमालीची होती. गुरुजींच्या घरी पोस्टमन दिवसांतून एक फेरी करत असे. त्या दिवशी पोस्टमनने गुरुजींच्या समोरच त्यांच्या पत्रपेटीत त्यांची पत्रे टाकली. गुरुजींनी ती घेतली आणि ते घरांत आले. थोड्या वेळाने त्यांची पत्नी घरी आली आणि तिने पत्रपेटी उघडून पाहिली. आंत एक पत्र मिळाले, ते घेऊन ती घरांत आली.
"अहो, त्या शेजारच्या पलिकडच्या इमारतीत रहाणा~यांचे पत्र आपल्याकडे आले आहे. असे बरेचदा होते. आता ते नेऊन दिले पाहिजे." गुरुजींची पत्नी म्हणाली.
"अग, ते कसे शक्य आहे? मी तासाभरापू्र्वीच सगळी पत्रे घरांत आणली. पोस्टमन परत येणे शक्य नाही."
"अगोबाई, मग आपल्या शेजारणीने ते पत्र तिच्या पेटीत सापडले ते आपल्या पेटीत टाकले की काय?" गुरुजींची पत्नी म्हणाली. गुरुजीना ते खरे असण्याची शक्यता वाटली. खात्री करण्यासाठी म्हणून त्यांनी ते शेजा~यांच्या पेटीत टाकले. दुस~या दिवशी पत्र गुरुजींच्या पेटीत परत हजर झाले.
"बघा कशी आहे ती!" गुरुजींची पत्नी म्हणाली.
"जाऊ दे. परमेश्वर बघत असतो" गुरुजी म्हणाले. त्यांनी ते पत्र पोस्टांत नेऊन दिले. यापुढे संभाळून रहायचे असे त्यांनी ठरवले, पण अतर्क्य अशा गोष्टींची कल्पना नसते त्यांच्यापासून संभाळायचे कसे हे काही त्यांच्या लक्षांत येईना.