Pages - Menu

Tuesday, September 1, 2015

हस्तप्रक्षालन

राजवैद्य खेदाने डोके हलवित असताना गुरुजी तेथे पोहोचले.
"राजवैद्य, काय झाले म्हणून आपण डोके हलवित आहात?" गुरुजींनी विचारले.
"अहो, काय सांगू? काहीही खाण्यापूर्वी हात धुवावे हे आपण लहान मुलांना शाळेत शिकवितो. उलट्या आणि जुलाब होऊ नयेत म्हणून वैद्य रुग्णांचे तसे प्रबोधन करतात. निदान त्यांनी तरी हात धुवून खावे?" राजवैद्य म्हणाले.
"बरोबर आहे. सर्व वैद्य तसे करत नाहीत का?"
"तेच तर माझ्या खेदाचे कारण आहे. आमच्या विभागांत बरेच जण स्वच्छतेच्या मोठमोठ्या गप्पा मारतात. पण कोणी मिठाई आणली आणि देऊ केली की हात न घुताच मिठाईचा तुकडा बिनदिक्कतपणे उचलतात. काही जण तर अगदी कहरच करतात. ते आपल्या घाण हातांनी एक तुकडा उचलून त्याचा छोटा भाग काढून घेतात आणि उरलेला भाग परत मिठाईच्या खोक्यांत ठेवतात. म्हणजे नंतर जो कोणी तो तुकडा खाईल त्याच्या पोटांत या माणसाच्या हातांची घाण जाईल."
गुरुजींना काय बोलायचे ते सुचेना. ते गप्पच राहिले.
"आमच्या रुग्णालयाच्या प्रमुख एक बाई होत्या. परदेशी वैद्यांच्या स्वागतासाठी महाराजांनी एक मेजवानी ठेवली होती. तेथे तर या काय काम करत होत्या ते अर्धवट सोडून आल्या, आपली खुर्ची हातांनी ओढून हवी तशी ठेवली आणि त्याच हातांनी जेवल्या."
"मग जुलाब झाले असतील?" गुरुजी म्हणाले.
"देव जाणे" राजवैद्य म्हणाले. "झाले असतील किंवा नसतील. पण आपण इतरांना काय आदर्श घालून देतो याचे या मोठ्या पदावरच्या बाईंना भान असायला हवे होते ना? त्या एकट्याच तशा होत्या असे नाही. त्यांच्या नंतर त्या पदावर आलेले प्रमुख वैद्य स्वतः शल्यतज्ज्ञ होते. त्यांना तर जंतूसंसर्गाची सखोल माहिती होती. एकदा मी रुग्णालयाच्या कामानिमित्त त्यांना भेटायला गेलो. ते स्वतःचे काम करता करता पुडींत हात घालून चटपटे खात होते. मला पाहून त्यांनी पुडीतून थोडे चटपटे काढले आणि मला देऊ केले. मी नको म्हटले. ते म्हणाले, घ्या हो, संकोच करू नका. मी म्हटले, संकोच नाही. पण प्रक्रुतीस्वास्थ्यासाठी मी हात धुतल्याशिवाय काही खात नाही. तर या ग्रुहस्थाने थोडासा विचार केला आणि हात मागे घेतला. हातातल्या चटपट्यांचे त्यांनी काय केले असेल?"
"स्वतःच्या तोंडात टाकले असतील" गुरुजी म्हणाले.
"नाही."
"पुडीत परत टाकले असतील" गुरुजी म्हणाले.
"नाही."
"मग काय केले त्यांनी?" गुरुजींनी विचारले.
"टाकून दिले".
गुरुजींना त्यावर काय बोलायचे ते सुचेना.