Pages - Menu

Saturday, August 8, 2015

फुल्ली

"अहो गुरुजी, आमच्या शिकणा~या वैद्यांनी नवेनवे शब्द वापरायला सुरुवात केली आहे. कधी कधी काय  म्हणतात तेच कळत नाही" राजवैद्य गुरुजींना म्हणाले.
"एखादे उदाहरण दिलेत तर बरे होईल" गुरुजी म्हणाले.
"आता प्रसूती होतांना गर्भवतीला तपासतात, तेव्हा गर्भाशयाचे मुख किती उघडले आहे ते पहावे लागते. ते पूर्ण उघडते तेव्हा ते १० सेंटीमीटर असते. मग त्यांतून बाळ बाहेर येऊ शकते. ते पूर्ण उघडले आहे हे सांगायसाठी आमचे विद्यार्थी म्हणतात, 'राजवैद्य, ती गर्भवती फुल्ली आहे."
"फु्ल्ली? तिला ते फुल्ली का म्हणतात? तिला त्यामुळे राग येणार नाही का?"
"ते तर झालेच. पण फुल्ली म्हणजे काय आणि त्याचा तिच्या उपचारांशी संबंध कसा जोडायचा ते समजेना. शेवटी त्यांना विचरले तेव्हा शोध लागला. मध्यंतरी आमच्याकडे पाश्चात्य देशांतले विद्यार्थी आले होते. आंग्लभाषेत ते गर्भाशयाचे मुख पूर्ण उघडले असण्याच्या स्थितीला 'फुल्ली डायलेटेड ' असे म्हणायचे. ते आमच्या विद्यार्थीमित्रांना फार आवडले. बोलले मराठीतून, तरी त्यांत 'फुल्ली डायलेटेड' मात्र आंग्लभाषेतले म्हणायचे. मग त्याचा सोईसाठी अपभ्रंश करून फक्त 'फुल्ली' म्हणायला लागले. आता बोला."
"मनोरंजक आहे" गुरुजी म्हणाले. "आंग्लभाषा, मराठी भाषा, आणि आपली सोय यांचा किती मजेशीर मिलाफ करता येतो ते बघून मजा वाटली."