Pages - Menu

Tuesday, November 17, 2015

शल्यक्रियागृहात मेजवानी

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयातील शल्यक्रियागृहात काम खूप असायचे. शल्यतज्ज्ञ तिथे आलटून पालटून कामावर असले तरी  भूलतज्ज्ञवैद्य मात्तिरथे रोजच काम करायचे. त्यांना जेवायला जायला वेळ मिळणे शक्यच नसायचे. मग बिचारे मुदपाकखान्यातून जेवण मागवायचे. ते आले तरी लगेच जेवता येईल याची शाश्वती नसायची. चालू असलेली शल्यक्रिया संपून रुग्ण शुद्धीवर आला की ते जेवायला पोहोचायचे. तोपर्यंत जर झाकण ठेवलेले नसले तर ते अ्न्न उघडेच असायचे. झाकण असलेच तर ते बहुधा आदल्या दिवसाच्या वर्तमानपत्राचे असायचे. जेथे ते जेवायचे ती खोली शल्यक्रियाग्रुहाचे भांडार होते. कपाटाच्या मागे उंदराचे बीळ होते. उंदीर धीट होता. दिवसाढवळ्या तो बाहेर यायला घाबरत नसे. एके दिवशी दुपारी राजवैद्य तेथून जात होते तर त्यांच्या नजरेला काय आक्रीतच पडले.


जेवण ठेवले होते त्या मेजाच्या पायावरून एक छोटासा उंदीर वर चढला आणि त्या जेवणाचा आस्वाद घेऊ लागला.
"ए, शू!" असे म्हणून राजवैद्यांनी उंदराला हाकलले. मग त्यांनी ज्याचे ते जेवण होते त्या भूलतज्ज्ञवैद्याच्या कानावर ही गोष्ट घातली. बिचार्‍याने तोंड वाकडे केले आणि म्हणाला, "जाऊ द्या. आज नशीबात जेवण नाही असे दिसते."
येव्हढे सगळे होईपर्यंत उंदीर परत आला आणि परत मेजावर चढून जेवायला लागला. आता त्याला हाकलून काही फायदा होणार नव्हता. राजवैद्यांनी त्याला निवांतपणे जेवू दिले, आणि त्याचे छायाचित्र काढून घेऊन संग्रही ठेवले. त्यांच्या एका कनिष्ठ वैद्याने ते पुढे फेसबूक की ट्विटरवर टाकले.