Sunday, March 29, 2015

Hibiscus Flower With Four Petals: A Letter To My Father

तीर्थरूप दादा यांना,
स. सा. न. वि. वि.
एकोणतीस वर्षांपूर्वी रामनवमीच्या दिवशी आपण देवाघरी गेलात. त्यानंतर काही दिवस डोळ्यांना काहीच स्पष्ट असं दिसत नव्हतं. नंतर वर्षभर खिडकीत उभं राहिलं की रस्त्यावरून जाणारी एखादी व्यक्ती तु्म्हीच आहात असा भास व्हायचा. पण ते तुम्ही नसायचा. कधीतरी चमत्कार होईल आणि तुम्ही भेटाल असं गेली एकोणतीस वर्षे वाटत राहिलं. डॉक्टर म्हणून चमत्कारांवर विश्वास नसला तरी या बाबतीत तरी तसं वाटत राहिलं. या रामनवमीला श्रीरामांच्या देवळात तुम्ही नक्की भेटाल असं अकस्मात वाटलं. वयाप्रमाणे मन हळवं झाल्यामुळे तसं झालं असावं. हॉस्पिटलात लवकर पोचणं आवश्यक होतं तरी मी देवळांत गेलो. देवदर्शन झालं, पण तुमचं दर्शन काही झालं नाही. 'काहीतरी वेडपटपणा!' असं माझ्याच मनात आलं. वेडेपणा बाजूला ठेवून मी होस्पिटलात कामाला गेलो.

चमत्कारांवर विश्वास नसला तरी ते व्हावेत अशी माझी इच्छा सदैव असायची. आपल्या घरी असलेल्या जास्वंदाला नेहमी पांच पाकळ्यांची फुलं येतात, जशी ती जगात सर्वत्र येतात.. जास्वंद हे श्री गणपतीबाप्पाचं आवडतं फूल. एक दिवस चमत्कार होईल आणि आपल्याकडे चार पाकळ्यांचे फूल उमलेल असं मला रोज वाटायचं. दररोज मी देवासाठी झाडावरून काढलेल्या प्रत्येक फुलाच्या पाकळ्या मोजायचो. निसर्गाच्या नियमांत ते बसत नाही हे माहीत होतं तरी मी पाकळ्या मोजायचो. तुम्ही दिसाल असं समजून भेटलेल्या सर्वांकडे पहायचो, तसंच काहीसं. रोज पाच पाकळ्यांचीच फुलं यायची. पण मी पाकळ्या मोजायचं काही सोडलं नाही. काल रामनवमीच्या दिवशी सगळा दिवस उदास गेला. संध्याकाळी देवाला वहाण्यासाठी फुलं काढायला गेलो. काय सांगू? झाडाला लागलेल्या सतरा फुलांमधल्या पहिल्याच फुलाला चार पाकळ्या होत्या. मी फारसा पुण्यवान नाही. परमेश्वराने माझ्यासाठी जे काही केलं आहे त्यापलिकडे जाऊन मला चमत्कार दाखवावा येवढं पुण्य तर माझ्या गाठीशी नक्कीच नसावे. जेथे तुम्ही असाल तेथून तुम्ही मला भेटायला येऊ शकत नसलात तरी माझ्यावर तुमच्या मायेची पाखर अजूनही आहे असं दाखवण्यासाठी तुम्हीच हे फूल पाठवलंत असं मला वाटतं आहे. हा केवळ योगायोग होता असं इतर मंडळी म्हणतील हे मला माहीत आहे, आणि ते कदाचीत खरंही असेल. पण एकोणतीस वर्षांनंतर मनाला शांत वाटतं आहे. यापुढे तुमच्या भेटीचा ध्यास धरणार नाही. मी पुरेसं पुण्यकर्म गाठीला बांधलं तर पुढेमागे भेट होईल.



तोपर्यंत हे चार पाकळ्यांचं दुर्मिळ जास्वंदाच फूल तुमच्या चरणी अर्पण.
तुमचा शशांक

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क