Wednesday, December 23, 2015

बिन उतार्‍याचे विष

आटपाट नगरचे गुरुजी आणि राजवैद्य शेजारी. संध्याकाळी घटकाभर चार शब्द बोलायचे. अशाच एका संध्याकाळी दोघे बोलत बसले होते.
"गुरुजी, कलियुग आहे हे माहीत आहे. मी तरुण होतो तेव्हाही कलियुगच होते. पण तेव्हा इतकी वाईट परिस्थिती नव्हती हो. आजकाल माणसाच्या नीतीमत्तेवरचा विश्वास उडालाय हो. कोणीही भेटले तरी त्याच्यात चांगुलपणा असेल अशी खात्री देववत नाही."
गुरुजी गप्पच राहिले. त्यांचे अनुभव वेगळ्या चौकटीतले असले तरी अनुमान तेच होते.
"एकवीस वर्षांची मुलगी. लग्न होऊन सात महिने झाले. कूस उजवली म्हणून घरी आणि माहेरी आनंद असायला हवा होता. तिला कोठे ठेवू आणि कोठे नको असे तिच्या पतीला वाटायला हवे होते. गर्भपात करून घ्यायला म्हणून ती पोर आली हो आज. एकटीच आली." पुढे बोलवेना म्हणून राजवैद्य थांबले.
"नवर्‍याला येव्हढ्यात मूल नको वगैरे काही कारण होते का?" गुरुजी म्हणाले. कारण यापेक्षा फार वेगळे असावे असे राजवैद्यांच्या बोलण्यावरून जाणवत होते, पण जिभेवर ते शब्द आणायला गुरुजी कचरत होते. तसे नसेल आणि केवळ बोलल्यामुळे तसे होईल अशी अवास्तव भिती त्यांना वाटत होती.
"नाही हो. सासरच्यांना मूल हवे होते. त्यांना सूनच नको होती."
"का? ती गर्भवती झाली ती काय नको असताना झाली?" गुरुजी म्हणाले.
"ती गोष्ट वेगळी. त्यांना लग्नांत घेतला त्याहून जास्त हुंडा नंतर हवा झाला. त्यावरून तिचा छळ होत होता. तिच्या माहेरची परिस्थिती त्यांच्या वाढत्या मागण्या पुर्‍या करण्यासारखी नव्हती. शेवटी गोष्ट घटस्फोटापर्यंत जाऊन ठेपली."
"पण त्यांना ते मूल हवे होते ना?" गुरुजी म्हणाले.
"ते तर त्यांना अजूनही हवे आहे. आज घटस्फोट घेऊ. तिची प्रसूती झाली की ते मूल घेऊन जाऊ असे ते म्हणताहेत."
"हं?" गुरुजी म्हणाले.
"पैसेवाले आहेत. ही घाण घरातून गेली की मुलाचे दुसरे लग्न करू म्हणतायत." राजवैद्य म्हणाले. "सोन्यासारखी पोर आहे हो. वडीलही नाहीयेत तिला. आता कोण बघणार बिचारीला? रडत होती बिचारी. आंतडे पिळवटून आले."
"कोतवालाकडे तक्रार केली तर कदाचित मार्ग सापडेल" गुरुजी म्हणाले.
"आणि उद्या तिच्यावर घासलेट ओतून तिला पेटवून दिले तर? किंवा गळा दाबला तर?"
गुरुजी शहारले. त्यांच्याकडे याचे उत्तर नव्हते.
"तरुणपणी अशा गोष्टी ऐकायला मिळत नव्हत्या. आजकाल अशा बर्‍याच गोष्टी होतायत हो. देशाचे काय होणार अशी भिती वाटायला लागली आहे. अशा नरधमांना देव काही शिक्षा करत नाही याचीही भिती वाटते आहे."
"तुम्ही मनाला त्रास करून घेऊ नका राजवैद्य" गुरुजी म्हणाले. "माणसावर संस्कार विद्यार्थीदशेत घडवायचे असतात. तेथे आम्ही शिक्षक कमी पडत असणार. चूक आमची आहे."
"नाही गुरुजी. आपण सर्व प्रयत्न करता हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही केलेले संस्कार माणसे लोभापोटी विसरतात. त्यांच्या आईवडिलांच्या विचारांचा पगडा जास्त ठरतो. सगळेजण मिळून त्या एकट्या अबलेची ससेहोलपट करण्यात वीरश्री मानतात. या विषाला उतारा नाहीये हो."
(Key words: Dowry Harassment)

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क