Sunday, December 27, 2015

जुळे दैत्य

आटपाट नगरच्या राजवैद्यांना भेटायला त्यांची एक जुनी विद्यार्थिनी आली होती. पदव्युत्तर शिक्षण राजवैद्यांच्या विभागात पूर्ण करून ती आणखी शिकण्यासाठी म्हणून विदेशी गेली होती. आता मायदेशात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी ती परतली होती.
"छान. आता तुझ्या प्रगत ज्ञानाचा फायदा जनतेला होईल" राजवैद्य म्हणाले.
"आपला आशीर्वाद असावा म्हणून आले आहे" ती म्हणाली.
"तो तर माझ्या विद्यार्थ्यांना नेहमीच असतो" राजवैद्य म्हणाले. "तुझ्या बरोबरचे काही विद्यार्थी कधी कधी संपर्क करतात. तुला ते दोघे आठवतात का?" राजवैद्यांनी दोन नावे घेतली.
ती स्तब्ध झाली. चेहर्यावरचे स्मितहास्य लोपले. भ्रुकुटी वक्र झाली.
"काय झाले" राजवैद्य म्हणाले. "त्यांचे नाव घेतल्यावर काहीतरी बिनसलेले दिसते."
"कसं सांगू" ती म्हणाली.
"काय मनांत असेल ते मोकळेपणाने बोल" राजवैद्य म्हणाले. "आता व्रुद्धापकाळ आलाय. आजपर्यंत ऐकले नाही असे आता काही असेल असे वातत नाही."
"ते दोघे मला दोन आणि एक वर्ष ज्येष्ठ होते. दोघे एकत्र असत. त्यांना काहीजण जुळे म्हणत. जन्माने नसले तरी विचाराने आणि वर्तनाने ते जुळे असल्यासारखेच होते."
"माहित आहे. ते इथल्या काड्या तिथे लावणे असा उद्योगही करत असत आणि म्हणून त्यांना काही वैद्य फिस्ट्युला असेही म्हणत असे मी ऐकून होतो."
"त्यांनी मला अभ्यासासाठी आपली खूप मेहेनतीने केलेली टिपणे देऊ केली होती."
"हे तर चांगुलपणाचे क्रुत्य आहे" राजवैद्य म्हणाले.
ती थोडावेल स्तब्ध राहिली. शेवटी मनाचा धडा करून म्हणाली, "त्या मदतीच्या बदल्यात ते माझ्याकडे .... माझ्याकडे.... "
राजवैद्यांचे मन धास्तावले. मुलगी आता काय बोलणार याची त्यांना कल्पना आली आणि तसे नसु देरे देवा असा त्यांनी मनातल्या मनात देवाचा धावा केला.
"... माझ्याकडे स्त्रीसुखाची मागणी केली. मी नकार दिला. पण मनांत त्या घाणेरड्या गोष्टीचा सल राहून गेला आहे."
आता स्तब्ध व्हायची पाळी राजवैद्यांची होती.
"दैत्य!" ते शेवटी म्हणाले. "त्यांतला एक दुर्धर व्याधीमुळे पांगळा झाला आहे, तर दुसरा अजून मोकळा फिरतोय, पण परमेश्वर त्याला योग्य ती शिक्षा करेल. तू मनांतून ही गोष्ट काढून टाक आणि स्वतःचे आयुष्य चांगल्या रितीने जग."
राजवैद्यांना नमस्कार करून ती आपल्या मार्गाने गेली.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क