Tuesday, December 1, 2015

अभ्यास कशासाठी?

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयातील काही वैद्यांची मुलेही वैद्य होण्यासाठी शिक्षण घेत होती.
"राजवैद्य, आम्हा शिक्षकांची मुले काही शिक्षक होऊ पहात नाहीत" गुरुजी म्हणाले. "वैद्यांची मुले मात्र वैद्य होऊ इच्छितात हे कसे?"
"गुरुजी, वैद्यांच्या मुलांना आई-वडिलांचा खूप पैसे कमाविण्याचा उद्योग पुढे चालवायचा असतो. तसे शिक्षकी पेशाचे आहे का?"
"नाही. आपण म्हणता ते खरे" गुरुजी म्हणाले. "मला वाटले, चांगले वैद्य होऊन समाजाची सेवा करावयाची असे त्यांचे स्वप्न असेल."
"स्वप्न असेलही, पण इ्च्छा मात्र दिसत नाही" राजवैद्य म्हणाले. "आमच्या एका वैद्यांची सुपुत्री आमच्याकडेच शिक्षण घेत आहे. तिचा परिक्षेचा अभ्यास आधी वैद्य करतात आणि मग तिच्याकडून करवून घेतात. ती त्यांना काय म्हणाली माहीत आहे? ती म्हणाली, हे तृतीय वर्षाचे शिक्षक नीट परीक्षा घेत नाहीत म्हणून मी वर्षभर अभ्यास केला नाही. ते पुस्तकांत बघून प्रश्नांची उत्तरे लिहू देतात. आता त्यामुळे माझे नुकसान झाले ना?"
'असे?" गुरुजी म्हणाले.
"तर काय. मीही अचंभित झालो. संपूर्ण ज्ञान मिळवून चांगला वैद्य होण्यासाठी अभ्यास करायचा असतो की परीक्षेत चांगले गुण मिळवियासाठी करावयाचा असतो? ज्या वैद्य होण्यासाठी शिकणार्‍या विद्यार्थ्याला हे समजत नाही तो उद्या वैद्य म्हणून काय करणार, हा मोठा चिंतेत टाकणारा प्रश्न आहे बघा."

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क