Saturday, December 5, 2015

आणखी एक नाटक ((नौटंकी))

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयात वैद्य काम करत, प्रशिक्षणार्थी वैद्य शिक्षण घेत, आणि उपलब्ध खाटांहून बर्‍याच जास्त संख्येने रुग्ण कक्षांमध्ये दाखल झालेले असत. अशा वातावरणात नाटक वगैरे गोष्टींना वेळ आणि स्थान मिळण्याची शक्यता जवळजवळ नाही म्हणण्याएवढी होती. पण परमेश्वराची लीला अगाध असते. राजवैद्यांना आलेला हा अनुभव हे त्या सर्वशक्तीमान परमेश्वराच्या अगाध लीलेचे एक उदाहरण.
रुग्णालयात एक कनिष्ठ वैद्य रुजू झाला. आपले काम व्यवस्थित करायचा. कोठे कोठे जरा कमी पडायचा, पण शिकविल्यावर शिकायचा. वागायला बोलायला चांगला होता. पुढे तो बराच वरपर्यंत चढत जाईल अशी राजवैद्यांची धारणा झाली होती. काही इतर वरिष्ठ वैद्य त्यांच्याबरोबर सहमत नव्हते. पण आपले मत बरोबर आहे अशी राजवैद्यांना खात्री होती.
पुढे या वैद्याचे दोनाचे चार हात झाले. आता तो  मार्गाला लागला असे राजवैद्य समजले. पण त्याचा मार्ग वेगळाच होता. वैद्य दर आठवड्याला शनिवारी रजा घ्यायला लागला. याचे सर्वांनाच आश्चर्य वाटायला लागले. शनिवारी अर्धा दिवस काम असायचे. एका दिवसाची नैमित्तिक रजा घेऊन अर्ध्या दिवसाची रजा फुकट घालविणारा रुग्णालयाच्या इतिहासातला हा पहिलाच वैद्य होता.
"अरे, तू असे करून स्वतःचे नुकसान का करून घेतोस?" असे त्याला कोणी तरी विचारले.
"माझी प्रिय पत्नी आजारी असते. तिच्यावर उपचार करणारे वैद्य फक्त शनिवारी उपलब्ध असतात" तो वैद्य म्हणाला. "मी तिला एकटीला सोडू शकत नाही. तिचे काही बरेवाईट झाले तर मी तिच्याविना जगू शकणार नाही." असे म्हणताना त्या वैद्याच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वहात होते. ते अश्रू बघून स्वतः एक वैद्य असणार्‍या आणि एरवी धडधाकट दिसणार्‍या त्याच्या पत्नीला तिच्यावर उपचार करणार्‍या वैद्यांकडे जाण्यासाठी पती बरोबर का लागतो ह विचारायचे कोणाला सुचलेच नाही.
वर्षाला पंधरा नैमित्तिक रजा असत. त्या पंधरा शनिवारांत संपल्या. मग हा वैद्य नियमांविरुद्ध एकेका दिवसाची अर्जित रजा घ्यायला लागला. त्यासाठी त्याने रुग्णालयाच्या प्रमुखांना तीच गोष्ट सांगून त्यांची परवानगी काढली. पुढे पुढे तो महिन्याभराच्या रजा घ्यायला लागला. पत्नीच्या उपचारांसाठी रजा घेतो म्हटल्यावर रजा नाकारणेही शक्य नव्हते. पण एक दिवस निवासी वैद्य संपावर गेले. रुग्णांना आपत्कालीन सेवा देण्यासाठी सर्व वैद्यांच्या रजा रद्द झाल्या. या वैद्यालाही कामावर यावयाचे फर्मान आले. आता त्याने नोकरी सोडण्याची महिन्याची पूर्वसूचना दिली, आणि संपकाळात कामावर येतो असे कबूल केले. पण पठ्ठ्या कामावर आलाच नाही.
"तो कामावर येत नाही. आता संपकाळात रुग्णसेवेसाठी वैद्य कमी पडताहेत" राजवैद्य म्हणाले.
"तो कसला कामावर येतोय?" एक जाणते वैद्य म्हणाले. "गेली दोन वर्षे तो शिकाऊ वैद्यांच्या खाजगी शिकवण्या चोरून करतोय. खूप कमावतोय. म्हणून तर तो दर शनिआरी रजा घेत असे."
"काय सांगताय? आणि त्याच्या पत्नीचे आजारपण आणि त्याचे उपचार?" राजवैद्यांनी विचारले.
"ते एक नाटक हो. आपल्यासारख्या प्रगत राज्यात फक्त शनिवारीच उपचार करणारे वैद्य असतात काय?"
राजवैद्यांना कसेतरी वाटायला लागले. प्रिय व्यक्तीच्या आजारपणाबद्दल किंवा मृत्यूबद्दल उगाच खोटे बोलू नये, परमेश्वर बघत असतो अशी त्यांची धारणा होती. धनाच्या लालसेपायी हा वैद्य हे काय करून बसला असे त्यांच्या मनांत आले. तो अप्रतिम नकला करायचा ते त्यांना आठवले, आणि त्याने घळाघळा रडून दाखविले होते ते कसे त्याचेही कोडे सुटले. असा विश्वासघात करणार्‍या एकामुळे सर्वच मा्णसांवरचा विश्वास उडतो आणि त्यांचे नुकसान होते हेही त्यांना जाणवले. पण जे होते ते तसेच होते आणि त्याला इलाज नव्हता. त्यांना रुग्णालय प्रमुखांनी भर सभेत घळाघळा रडून दाखविले होते ती गोष्टही आठविली. कोणीही यावे आणि आपल्याला फसवून जावे अशा वयाला आपण पोहोचलो की काय अशी शंकाही आली.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क