Monday, December 21, 2015

उत्कर्षाची संधी

आटपाटनगरचे गुरुजी राजवैद्यांना भेटायला गेले तेव्हा एक रुबाबदार गृहस्थ राजवैद्यांबरोबर बोलत होते. गुरुजी तेथे पोहोचत होते तेव्हा ते निघालेच होते. ते गेल्यावर ते कोण होते असे गुरुजींनी कुतूहलाने विचारले.
"शेजारच्या रा्ज्यातले राजवैद्य होते" राजवैद्य म्हणाले. "मागच्या वेळी ते भेटले तेव्हा राजवैद्यांच्या जागेवर सेवाज्येष्ठतेनुसार त्यांची नेमणूक होऊनही प्रभारी राजवैद्य त्यांना ती जागा देत नव्हते. न्यायाधीशांसमोर खटला चालू होता."
"पण ते प्रभारी ती जागा सोडत का नव्हते?" गुरुजींनी विचारले.
"मोह."
"त्या पदावर वेतन जास्त मिळते का ?" गुरुजींनी विचारले.
"नाही हो" राजवैद्य म्हणाले. "मीही त्यांना तोच प्रश्न विचारला."
"मग काय म्हणाले ते?"
"ते म्हणाले की त्या पदावर असतांना सरकारी खर्चाने किमान दोन-तीन परदेश वार्‍या करायला मिळतात. त्यातून त्यांची दोन मुले अमेरिकेत आहेत. वारी झाली की मुलांना भेटूनही होईल आणि अमेरिका दर्शनही होईल."
"सरकार या कामासाठी राजवैद्यांना परदेशी पाठविते?" गुरुजींनी आश्चर्याने विचारले.
"नाही हो. सरकारी कामाच्या निमित्ताने जायचे आणि मजा करून यायचे." राजवैद्य म्हणाले.
"मग त्यांचे पुढे काय झाले?"
"ते खटला जिंकले. राजवैद्यांची जागा पदरी पडली. तीन वि्देश वार्‍या झाल्या. आता ते संतुष्ट आहेत."
"तुम्हाला अशा वार्‍या करायला मिळत नाहीत ते?" गुरुजींनी विचारले.
"आपल्या रुग्णालयांत तशी पद्धत नाही. आणि मला त्या गोष्टीचा मोहही नाही" राजवैद्य म्हणाले. "मी पारपत्रही (Passport) काढलेले नाही. पारपत्राशिवाय मी कसा परदेशी जाणार? मागे एकदा आमच्या विभागातल्या एका महिला वैद्याला तीन महिन्यांसाठी राजखर्चाने अमेरिकेला जाण्याचा योग आला. जाण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी मला आपण उद्या प्रयाण करत आहोत असे सांगितले. आधी समजले तर मी ती संधी बळकावीन अशी त्यांना भिती वाटत होती असे त्या दुसर्‍या एका वैद्यांना म्हणाल्या, ते माझ्या कानावर आले. मला हाताखालच्या वैद्यांनी ओळखलेच नाही या एका गोष्टीचे दुःख अजून मनाला त्रास देते आहे."
"इतर विभागांत तसे झालेले त्यांनी पाहिले असेल" गुरुजी म्हणाले. "किंवा त्यांनी स्वतःवरून तुमची परीक्षा केली असेल. आपण ते मनाला लावून घेऊ नका."
"मनाला लागणार्‍या गोष्टी मला तुमच्यासारख्या सहज थांबविता येत नाहीत हो" राजवैद्य म्हणाले.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क