आटपाट नगरचे राजवैद्य गुरुजींना एक जुनी आठवण सांगत होते.
ती दोघे आमच्याच बरोबर शिकत होती. वर्गातली इतर मुले अभ्यासात बुडलेली होती तेव्हा तो आणि ती प्रेमात आकंठ बुडालेली होती. खरे तर ते अभ्यासाचे वय होते. त्या परीक्षेत मिळविलेल्या गुणांवर त्यांचे भवितव्य अवलंबून होते. त्याला इंजिनियर व्हायचे होते. तिला कोण व्हायचे होते देव जाणे. मी तिला तसे ओळखत नव्हतो. आम्हा सर्वांना येवढेच माहीत होते की तिला त्याच्याबरोबर सर्व आयुष्य घालवायचे होते. जोडीने संसार करावयाचा होता. आम्ही महविद्यालयाच्या वर्गांत बसायचो तेव्हा ती दोघे समोरच्या उपहारग्रुहात एकमेकांच्या डोळ्यांत बघत बसलेली असत. आम्ही जेव्हा वाचनालयात अभ्यास करत बसायचो तेव्हा ती दोघे महविद्यालयच्या कट्ट्यावर हातांत हात गुंफून बसलेली असायची. त्यांचे प्रेम त्यांच्या घरच्यांना माहीत होते की नाही कोण जाणे, पण महाविद्यालयांत ते माहीत नव्हते अशी व्यक्ती शोधूनही सापडली नसती हे नक्की. तिचे घर माझ्या घराच्या जवळ होते. त्याचे कोठे तरी दूर होते. मला ती दोघे माझ्या घराजवळ कधी कधी दिसायची. मला पाहून तो हसायचा..
"बायकोला घरी सोडायला आलो" तो म्हणायचा. "पण आडबाजूने आलोय. सासरेबुवांनी बघितले तर राडा होईल."
म्हणजे तिच्या घरी तरी ते माहीत नसावे. पण आपले लग्न होणार हे त्या दोघांना पक्के माहीत असावे. पुढे मी वैद्यकीय शिक्षणाच्या मार्गाने गेलो. तो अभियांत्रिकीच्या शिक्षणाला लागला. ती काय शिकत होती ते समजले नाही. पण आमच्या दृष्टीने ते फारसे महत्वाचे नव्हते. त्यांचे ते पौंगंडावस्थेतले प्रेम पुढे सफळ होणार होते हेच आम्हा सर्वांना आनंददायी वाटत होते.
मध्यंतरी बराच काळ लोटला. आम्ही इतर जण शिक्षण संपवून आपापल्या व्यवसायांत शिरलो. तिच्या घरासमोरून जातांना कधी कधी त्यांचे प्रेम आठवायचे. ती कधीच दिसली नाही, त्या अर्थी ती दोघे लग्न करून आनंदात असणार असे मी समजून चालत असे. एक दिवस एक जुना वर्गमित्र भेटला.
"अरे, तू ऐकलस का? आपला तो कोतवालीत बंद होता. आता बाहेर आलाय." तो आपल्या कथेच्या नायकाबद्दल बोलत होता.
"अरे? हे काय सांगतोयस तू?" मी म्हटले. "काय झाले? ती कोलमडून पडली असेल ना?"
"ती? नाही. तिला हे माहीतही नसेल."
"म्हणजे काय? आपला नवरा कोतवालीत बंद झाला ते तिला माहीत कसे नसेल?"
"तो तिचा नवरा नाहीये काही."
"नाही?" मी सर्द झालो. "असे कसे झाले?"
"परमेश्वराची कृपा. त्याने तिला फसवले. ती सुटली म्हण ना."
"पण ती दोघे किती प्रेमात होती. का फसवले त्याने?"
"आम्ही त्याला विचारले. तो म्हणाला की तिला पटवून दाखवेन अशी त्याने मित्रांबरोबर पैज लावली होती. म्हणून तो तिला फिरवत होता."
"पैजेसाठी दोने तीन वर्षे त्याने प्रेमाचे नाटक केले?"
"होय. त्याने तिला तसे सांगितले तेव्हा ती कोलमडली. जीव देणार होती. घरच्यांनी कशीबशी तिला सावरली. काही वर्षांनंतर तिचे दुसर्या एका मुलाबरोबर लग्न लावून दिले. आता ती दुसर्या शहरांत रहाते आहे."
"मग तो कोतवालीत बंद कसा झाला?"
"त्याने दुसर्या एका मुलीबरोबर लग्न केले. एक मूलही झाले. मग ती दोघे विभक्त झाली. मुलाला आईकडून गुपचूप काढून घेऊन तो गावाला गेला. तिने कोतवालीत मुलाला पळविले म्हणून तक्रार केली आणि कोतवालाने त्याला अटक केली."
"अं..." मला गरगरायला झाले. त्या एका माणसामुळे किती वादळे झाली बघा.