Saturday, July 11, 2015

परमेश्वराचा न्याय

आटपाटनगरचे राजवैद्य खुशीत होते. राजाच्या दुस~या दोन रुग्णालयांतील राजवैद्यांवरोबर नव्या सहाय्यक वैद्यांच्या नियुक्तीसाठी मुलाखती घेण्याचा कार्यक्रम पार पाडून ते आपल्या रुग्णालयांत परतले होते.
"राजवैद्य, आज खुशीत दिसताय. काही विशेष?" गुरुजींनी विचारले.
"गुरुजी, परमेश्वरावर माझा नितांत विश्वास आहे. पण त्याचा न्याय बहुतेक वेळा याच जन्मांत पहायला मिळत नाही. आज मात्र माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले."
"असे काय झाले तरी काय?" गुरुजींना रहावेना.
"अहो, मध्यंतरी दक्षिणेच्या रुग्णालयांतील राजवैद्यांनी संचालकांचे कान भरून आमचे एक सहाय्यक वैद्य स्वतःच्या रुग्णालयासाठी पळविले, तर उत्तरेच्या रुग्णालयांतील राजवैद्यांनी संचालकांचे कान भरून आमचे दोन सहाय्यक वैद्य स्वतःच्या रुग्णालयासाठी पळविले. आमच्याकडून वेतन घेऊन इतरांचे काम करविण्याची ही जुनी खोड आहे. आम्ही जंगजंग पछाडले, पण काही उपयोग झाला नाही. उलत आम्हाला त्यांनी खिजवून दाखविले. दक्षिणेच्या रुग्णालयांतील राजवैद्य आणि त्यांचे निकटचे सहकारी यांनी अधिकाराच्या जोरावर एका वरिष्ठ वैद्यांना अगदी सळो की पळो करून टाकले होते. कंटाळून त्यांनी राजाच्या चवथ्या रुग्णालयांत कायम स्वरूपी बदली मागून घेतली."
"बरे, मग?" गुरुजींनी विचारले.
"हल्लीच दक्षिणेच्या रुग्णालयाचे वैद्यकीय महासंघाने परीक्षण केले. त्यांत उत्तीर्ण होण्यासाठी म्हणून तर आमचे सहाय्यक वैद्य त्यांनी पळवले होते. एका वरिष्ठ वैद्याची कमतरता आहे या कारणास्तव त्यांच्या रुग्णालयाची मान्यता रद्द होईल असा खलिता त्यांना आला आहे. त्याचे उत्तर त्यांनी दिले, तर परत तशाच मसुद्याचा खलिता परत आला आहे. ते राजवैद्य स्वतःच्या डोक्याचे केस उपटत बसले होते. मुलाखतींच्या कामकाजांतही त्यांचे लक्ष नव्हते. त्यांनी आम्हाला त्रास दिला आणि स्वतःच्या वरिष्ठ वैद्यांचा छळ केला, त्याची चांगली शिक्षा परमेश्वराने त्यांना दिली. बदली करून घेतांना पुढे त्याचा असा परिणाम होईल याची कल्पना त्या वरिष्ठ वैद्यांना होती असणार. उत्तरेच्या राजवैद्यांनाही धक्का बसला आहे. या दोन्ही राजवैद्यांनी प्रत्येकी दोनदोन सहाय्यक वैद्यांची नवी पदे स्वतःसाठी निर्माण करण्यासाठी पत्रव्यवहार केला होता.दक्षिणेच्यांना दोन पदे कागदोपत्री तरी मिळाली, पण उत्तरेच्यांना तीही मिळाली नाहीत. असे का म्हणून तेही निषेध व्यक्त करीत होते."
"त्यांचे नेहमीचे कुरघोडीचे राजकारण या वेळी चालले नाही वाटते" गुरुजी म्हणाले.
"अहो, आमच्यासारख्या सभ्य आणि सरळमार्गी वैद्यांवर कुरघोडी करणे आणि परमेश्वरावर कुरघोडी करणे सारखेच असते काय?" राजवैद्य सानंद म्हणाले.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क