Tuesday, July 21, 2015

रथाचा सारथी आणि इंटरनेटचा प्रवासी

गुरुजींचा सातासमुद्रापारच्या विदेशांत वास्तव्यास असणारा एक जुना विद्यार्थी आटपाटनगरांतील आप्तेष्टांना भेटण्यासाठी आला होता. गुरुजींबद्दल त्याला अतीव आदर आणि आपुलकी होती. त्यामुळे तो आल्यादिवशीच त्यांच्या घरी पोहोचला. गुरुपत्नीने दिलेले गूळ-पाणी सेवन केल्यावर गुरुशिष्यांच्या गप्पा रंगल्या. त्याच्या विदेशाबद्दलच्या गोष्टी ऐकून गुरुजींना लवकरच आपल्या देशांत काय घडणार याची कल्पना आली.
"हे इंटरनेटचे मायाजाल खूप उपयुक्त आहे, तसेच धोकादायकही आहे" तो म्हणाला. "नवनवी माहिती मिळवणे, त्वरेने इतरांबरोबर संपर्क साधणे वगैरे त्याचे खूप उपयोग आहेत. पण तेथे कोणीही मनाला आवडेल ते लिहू शकतो. त्यामुळे कधीकधी चुकीच्या, कधी असत्य, तर कधीकधी अतिशय गलिच्छ प्रकारच्या गोष्टी तेथे सापडतात. आपल्यावर कोणाचा अंकुश नाही अशी मानसिकता असल्यामुळे, आणि इंटरनेटवर सर्वजण समान आहेत असा समज असल्यामुळे नको तेव्हढ्या धिटाईने तेथे लिखाण होत असते."
"असं?" गुरुजी चक्रावून म्हणाले.
"हो ना. मोठमोठ्या हुशार आणि कर्त्रुत्ववान माणसांच्या पंक्तीत हे विशेष योग्यता नसणारे लोक, कधी उघडपणे तर कधी अनामकितेच्या पाठी लपून जाऊन बसत असतात. आपण काही त्रिकाल सत्य सांगतो आहोत अशा अविर्भावात ते काहीही लिहित असतात."
"म्हणजे आपल्या रथाच्या सारथ्यांसारखेच झाले म्हणायचे" गुरुजी म्हणाले. "मनसबदारांचे स्वतः सारथ्य केलेले रथ आणि भाड्याचे रथ किंवा मालवाहू गाड्या यांचे सारथी त्याच रस्त्यांवर रथ हाकत असतात. हातात रथाच्या घोड्यांचा लगाम असला की सगळे सारथी सारखेच असे त्यांना वाटते - भले ते विद्वान असोत की अशिक्षित, कर्त्रुत्ववान असोत की कर्त्रुत्वहीन. त्यांचे बोलणे आणि वागणे सारखेच अरेरावीचे आणि उर्मटपणाचे असते."
"खरे आहे" तो जुना विद्यार्थी म्हणाला. गुरुजी स्वतः रथ बाळगत नाहीत याचे हेही एक कारण असावे असे त्याच्या मनांत आले. "विदेशांतही ते असेच आहे. रथांच्या चालकांचे एकवेळ सोडा. पण लिहिलेली प्रत्येक गोष्ट खरी मानणा~या जनतेला इंटरनेटवर सहज फसायला होते. ज्याला नीरक्षीरविवेक आहे तोच तेथे तगून जातो."
नीरक्षीरविवेक किती कमी माणसांना असतो याची गुरुजींना कल्पना होती. त्यांनी खेदाने मान हलवली.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क