Wednesday, July 1, 2015

विश्राम, विरंगुळा आणि व्यवसाय एका खिडकीत

महानगरपालिकेच्या नियमांप्रमाणे आजकाल इमारतीपुढील काही जागा मोकळी सोडावी लागते. आमच्या समोरच्या नव्याने बांधलेल्या इमारतीच्या तळमजल्याचे रस्त्यालगतचे गाळे दुकानांसाठी आहेत. प्रत्येक दुकानाच्या समोरच्या मोकळ्या जागेत त्या त्या दुकानाच्या साठी चौथरे बांधलेले आहेत. दुकानदारांनी त्यांच्यावर आपापल्या आवडीप्रमाणे फरशा बसवून घेतलेल्या आहेत. रात्री दुकाने बंद झाली की बहुधा दुकानदारांच्या परवानगीने माणसे तेथे झोपतात. त्यांना निवारा मिळतो, आणि दुकानांचे संरक्षण होते. त्यांतल्याच एका दुकानाची ही गोष्ट.


दुकान रददी आणि भंगार मालाचे आहे. त्यांतलीच काही वर्तमानपत्रे अंगाखाली अंथरून एक माणूस हल्ली तेथे रात्री झोपतो. चादर पावसाने भिजते. वर्तमानपत्रही भिजते, पण ते टाकून देता येते. चादर धुवावी लागते. त्यामुळे या काळात तो वर्तमानपत्रेच वापरतो. सकाळी उठला की अंगाखालची वर्तमानपत्रे काढून वाचतो. तासाभराने त्याची गि~हाइके आली की धोपटी उघडून सामान बाहेर काढतो आणि त्यांच्या दाढ्या करून देतो. तोपर्यंत भंगारवाला दुकान उघडायला येतो. मग हा न्हावी सामान धोपटीत भरतो आणि मार्गाला लागतो. रात्रीची विश्रांती, सकाळचा (बरोबर चहाचा कप नसला तरी) विरंगुळा, आणि नंतर व्यवसाय एकाच ठिकाणी करण्यात त्याने वापरलेली चतुराई ही सरकारच्या 'एक खिडकी योजनांच्या तोडीची वाटते. प्रिन्स चार्ल्सच्या नजरेला तो पडला, तर डबेवाल्यांचे त्यांनी केले तसे कौतुक ते याचेही करतील, आणि उद्या आय आय एम किंवा दुस~या एखाद्या मॅनेजमेंट स्कूलमध्ये त्याला व्याख्यान द्यायलाही बोलावतील.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क