Friday, July 3, 2015

ब्रुहन्नडा

रविवार असल्यामुळे आटपाट नगर सुस्त होते. दुपारची जेवणे उशीरा झाली. गुरुजींना राजवैद्यांकडे चहासाठी बोलावले होते. गुरुजी आणि त्यांची भार्या सायंकाळी पाच वाजता राजवैद्यांकडे पोहोचले. चहापान झाल्यावर दोघांच्या भार्या बागेतली नव्याने लावलेली फुलझाडे बघण्यासाठी रवाना झाल्या. राजवैद्य आणि गुरुजी गप्पा मारायला बसले.
"काय वैद्यराज, काय खबरबात?" गुरुजींनी विचारणा केली. राजवैद्यांकडे नेहमी काहीतरी नवीन ऐकायला मिळायचे.
"अहो, तुमचा विश्वास बसणार नाही. महाभारतात होती तशी ब्रुहन्नडा आमच्याकडे पण घडली."
"हं?" गुरुजी म्हणाले.
"हे बघा, आमच्या रुग्णालयांत महासेन नावाचा तरुण, हुशार, उमदा वैद्य महाराजांनी सहवैद्य या पदावर नियुक्त केला. काही महिने त्याने व्यवस्थित काम केले. मग त्याने रजेची मागणी केली."
"हं."
"पण त्याचे रजेचे कारण काही वेगळेच होते. त्याला वंगदेशात जाऊन स्वतःवर शल्यक्रिया करून घेऊन पुरुषाची स्त्री व्हायचे होते."
"असे करता येते?"
"कठीण असते, पण ते शक्य आहे."
"पण का?"
"त्याच्या मते तो एका पुरुषाच्या शरीरात अडकलेली एक स्त्री होता. परमेश्वराची ती चूक त्याला दुरुस्त करून हवी होती."
"परमेश्वराची चूक?" गुरुजींच्या काही लक्षांत येईना. "बरे पण त्याच्या आईवडिलांची या गोष्टीला सम्मती होती?"
"छे हो! पण आजकालची मुले आईवडिलांचे आणि मोठ्या माणसांचे ऐकतात कोठे?"
"पण वंगदेशांत का? आपल्याकडे देशोविदेशीचे रुग्ण येत असतात, आणि या मुलाला बाहेर जावे लागावे?"
"आपल्या मानसोपचारतज्ञांनी त्याला मानसिकद्रुष्ट्या स्त्री आहे असे प्रमाणित करण्यास नकार दिला. मग त्याने ते प्रमाणपत्र आणि शल्यक्रिया वंगदेशात करायचे ठरवले."
"...." गुरुजींना बोलण्यासारखे काही सुचले नाही.
"त्याने शल्यक्रियेपूर्वी स्त्री संप्रेरके घेतली होती. अहो काय सांगू, जेव्हा मला या सर्व गोष्टींची कल्पना नव्हती तेव्हा एका रुग्णाच्या उपचारांच्या वेळी त्याचा माझ्या हाताला स्पर्श झाला, आणि परस्त्रीचा स्पर्श झाल्यासारखा मी शहारलो."
राजवैद्यांचा चेहरा बघून त्यांच्या बोलण्यांत जराही अतिशयोक्ती नव्हती हे गुरुजींच्या लक्षांत आले.
"कालच तो शल्याक्रियेतून बरा होऊन कामावर रुजू झाला. आजपासून मला महासेन न म्हणता महानंदा म्हणायचे असे त्याने सांगितले आहे. त्याच्या पगारपत्रकावरही तेच नाव यावे असे तो म्हणतो, पण ते येवढ्यात होणे कठीण दिसते."
"पण तो आता स्त्रीसारखा दिसतो का?" गुरुजींनी विचारले.
"सलवार कमीज घालून आला होता. हातात एक बांगडी होती. गळ्यात एक माळ होती. कानांत डूल होते."
"आणि स्त्रीसुलभ वर्तन?" गुरुजींनी विचारले.
"मुली कानावरचे केस हाताने कानामागे करतात तसे तो मधूनमधून करत होता. आणि एका शिकाऊ वैद्याने कामांत काही चूक केली, तेव्हा तो चिडून म्हणाला, 'नीट काम कर, नाहीतर मी तुला कसे नाचवून ठेवते बघ."
"आता पुढे काय होणार?"
"तो नोकरी सोडून कोठेतरी जाणार आहे. पण इतर समस्या आहेतच. कलिंगातून एका ग्रुहस्थाची तक्रार आली आहे. या वैद्याने त्या ग्रुहस्थाच्या मुलाला आपल्याबरोबर रहाण्यासाठी सळो की पळो करून टाकले आहे. पत्रे पाठवणे, संदेश पाठवणे, दूरध्वनी करत राहाणे... तो आमच्या रुग्णालयांत असेच वर्तन करतो का ते त्या ग्रुहस्थाने माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत विचारले आहे."
गुरुजींनी कपाळाला हात लावला.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क