Monday, July 27, 2015

शल्यक्रिया करणार कोण?

आटपाटनगरचे राजवैद्य आणि गुरुजी दुपारच्या चहाच्या वेळी एकत्र भेटले.
"गुरुजी, या आठवड्यांत एक रुग्ण उपचारांसाठी आली होती. मी तिला तपासून शल्यक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला. तिने शल्यक्रियेची संपूर्ण माहिती विचारून घेतली. मग म्हणाली 'माझी शल्यक्रिया आपणच करणार ना?'" राजवैद्य म्हणाले.
"मग आपण होय म्हटलेत?" गुरुजींनी विचारले.
"छे हो! होय कसे म्हणायचे? दिवसाला मोठ्या सहा आणि छोट्या दहा शल्यक्रिया होतात. प्रत्येक रुग्णाची शल्यक्रिया मीच केली तर त्या श्रमांमुळे मी मरून जाईन. आमच्याकडे मी सोडून बरेच वैद्य आहेत, जे शल्यक्रिया मोठ्या कौशल्याने करतात. प्रशिक्षणार्थी वैद्यही आहेत, जे आमच्या मदतीने सल्यक्रिया करतात आणि शिकतात. त्या सर्वांनी काय करायचे? बरे, हा काही आमचा खाजगी व्यवसाय नाही, की पैसे घेतले म्हणजे शल्यक्रिया आम्हीच केली पाहिजे. येथे सर्वांना निःशुल्क उपचार करून मिळतात. महाराजांचा नियमच आहे की असे आश्वासन कोणत्याही रुग्णाला द्यायचे नाही."
"मग आपण काय म्हटलेत?" गुरुजींनी विचारले.
'मी म्हटले की जर मी मोकळा असलो तर मी शल्यक्रिया करेन. जर तिच्यापेक्षा अधिक दुर्धर व्या्धी असलेला रुग्ण असला, तर त्याला माझी जास्त गरज असल्यामुळे मी त्याची शल्यक्रिया करेन. पण तिच्या शल्यक्रियेसाठी एक कुशल  वैद्य उपलब्ध असेल हे पहाण्याची जबाबदारी माझी."
"छान. मग तिचे समाधान झाले असेल" गुरुजी म्हणाले.
"छे हो! तिचे आपले एकच पालुपद, माझी शल्यक्रिया आपणच करा. ऐ्केच ना" राजवैद्य म्हणाले.
"मग आपण काय केलेत?" गुरुजींनी विचारले.
"मी म्ह्टले, बाई ग, तुझी व्याधी इतरांपेक्षा जास्त दुर्धर असावी अशी तुझी इच्छा आहे का? तसे निघाले, तरच मी तुझी शल्यक्रिया करू शकेन. मग ती शांतपणे निगून गेली. आज तिची शल्यक्रिया एका प्रशिक्षणार्थी वैद्याने माझ्या मदतीने यशस्वीपणे पार पाडली. ती आता आनंदात आहे."
"छान" गुरुजी म्हणाले.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क