Thursday, December 31, 2015

दुष्टकर्म्याची कारणमीमांसा

आटपाट नगरच्या राजवैद्यांना राजाने विचारले, "राजवैद्य, आमच्या असे अनुभवास आले आहे की काही काही कुकर्मे वारंवार त्याच प्रकारची कुकर्मे करून सज्जनांना पीडा देत असतात. समुपदेशन, प्रबोधन, शिक्षा यापैकी कशाचाच त्यांच्यावर परिणाम होत नाही. कुत्र्याचे शेपूट नळीत घातलेले असेपर्यंत सरळ रहाते, नंतर ते परत वाकडे ते वाकडेच. हे असे का?"
"महाराज, हा एक मानसिक विकार आहे" राजवैद्य म्हणाले. "या प्रकारच्या माणसांना मानसोपचारतज्ज्ञ सोश्योपॅथ (Sociopath) असे म्हणतात. भविष्यात मुन्नाभाई त्याला केमिकल लोचा असे म्हणेल."
"आपण म्हणता ते नीटसे समजले नाही" राजा म्हणाला.
"हे चित्र पाहिले तर सर्व समजेल" असे म्हणून राजवैद्यांनी मानसशास्त्र शिकविण्यासाठी बनविलेल्या पुस्तकांतील एक चित्र राजाला दाखविले."


"मनांत असणारा सैतान आणि तो कीडा यांच्या संयुक्त विद्यमाने अशा माणसांकडून असे वर्तन घडत असते" राजवैद्य म्हणाले.
राजाला ते चित्र पाहून त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.

Tuesday, December 29, 2015

इन्फ्रारे्ड मी

रात्रीच्या अंधारात पहाण्यासाठी सैनिक आणि गुप्तहेर इन्फ्रारेड दुर्बीण वापरता असे मी कादंबर्‍यांत वाचले होते आणि इंग्रजी सिनेमांत पाहिलेही होते. हल्लीच इन्फ्ररेड कॅमेर्‍यावर मला फोटो काढून मिळाला. त्याने मी इतका प्रभावीत झालो, की तो येथे टाकल्याशिवाय मला चैन पडेना. म्हणजे मी त्यांत जास्त देखणा वगैरे दिसतोय अशातली गोष्ट नाही. पण काहीतरी वेगळे म्हणून तो नक्कीच गमतीदार वाटतोय.
इन्फ्रारे्ड मी

Sunday, December 27, 2015

जुळे दैत्य

आटपाट नगरच्या राजवैद्यांना भेटायला त्यांची एक जुनी विद्यार्थिनी आली होती. पदव्युत्तर शिक्षण राजवैद्यांच्या विभागात पूर्ण करून ती आणखी शिकण्यासाठी म्हणून विदेशी गेली होती. आता मायदेशात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी ती परतली होती.
"छान. आता तुझ्या प्रगत ज्ञानाचा फायदा जनतेला होईल" राजवैद्य म्हणाले.
"आपला आशीर्वाद असावा म्हणून आले आहे" ती म्हणाली.
"तो तर माझ्या विद्यार्थ्यांना नेहमीच असतो" राजवैद्य म्हणाले. "तुझ्या बरोबरचे काही विद्यार्थी कधी कधी संपर्क करतात. तुला ते दोघे आठवतात का?" राजवैद्यांनी दोन नावे घेतली.
ती स्तब्ध झाली. चेहर्यावरचे स्मितहास्य लोपले. भ्रुकुटी वक्र झाली.
"काय झाले" राजवैद्य म्हणाले. "त्यांचे नाव घेतल्यावर काहीतरी बिनसलेले दिसते."
"कसं सांगू" ती म्हणाली.
"काय मनांत असेल ते मोकळेपणाने बोल" राजवैद्य म्हणाले. "आता व्रुद्धापकाळ आलाय. आजपर्यंत ऐकले नाही असे आता काही असेल असे वातत नाही."
"ते दोघे मला दोन आणि एक वर्ष ज्येष्ठ होते. दोघे एकत्र असत. त्यांना काहीजण जुळे म्हणत. जन्माने नसले तरी विचाराने आणि वर्तनाने ते जुळे असल्यासारखेच होते."
"माहित आहे. ते इथल्या काड्या तिथे लावणे असा उद्योगही करत असत आणि म्हणून त्यांना काही वैद्य फिस्ट्युला असेही म्हणत असे मी ऐकून होतो."
"त्यांनी मला अभ्यासासाठी आपली खूप मेहेनतीने केलेली टिपणे देऊ केली होती."
"हे तर चांगुलपणाचे क्रुत्य आहे" राजवैद्य म्हणाले.
ती थोडावेल स्तब्ध राहिली. शेवटी मनाचा धडा करून म्हणाली, "त्या मदतीच्या बदल्यात ते माझ्याकडे .... माझ्याकडे.... "
राजवैद्यांचे मन धास्तावले. मुलगी आता काय बोलणार याची त्यांना कल्पना आली आणि तसे नसु देरे देवा असा त्यांनी मनातल्या मनात देवाचा धावा केला.
"... माझ्याकडे स्त्रीसुखाची मागणी केली. मी नकार दिला. पण मनांत त्या घाणेरड्या गोष्टीचा सल राहून गेला आहे."
आता स्तब्ध व्हायची पाळी राजवैद्यांची होती.
"दैत्य!" ते शेवटी म्हणाले. "त्यांतला एक दुर्धर व्याधीमुळे पांगळा झाला आहे, तर दुसरा अजून मोकळा फिरतोय, पण परमेश्वर त्याला योग्य ती शिक्षा करेल. तू मनांतून ही गोष्ट काढून टाक आणि स्वतःचे आयुष्य चांगल्या रितीने जग."
राजवैद्यांना नमस्कार करून ती आपल्या मार्गाने गेली.

Friday, December 25, 2015

ख्रिस्तमसच्या शुभेच्छा (Merry Christmas)


मेरी ख्रिसमस


Merry Christmas


শুভ বড়দিন


क्रिसमस की बधाई


મેરી ક્રિસમસ



ਮੇਰੀ ਕਰਿਸਮਸ

மெர்ரி கிறிஸ்துமஸ்


క్రిస్మస్ శుభాకాంక్షలు


ಮೆರ್ರಿ ಕ್ರಿಸ್ಮಸ್


സന്തോഷകരമായ ക്രിസ്മസ്


joyeux Noël



Fröhliche Weihnachten

Feliz Navidad


счастливого Рождества



Geseënde Kersfees

Wednesday, December 23, 2015

बिन उतार्‍याचे विष

आटपाट नगरचे गुरुजी आणि राजवैद्य शेजारी. संध्याकाळी घटकाभर चार शब्द बोलायचे. अशाच एका संध्याकाळी दोघे बोलत बसले होते.
"गुरुजी, कलियुग आहे हे माहीत आहे. मी तरुण होतो तेव्हाही कलियुगच होते. पण तेव्हा इतकी वाईट परिस्थिती नव्हती हो. आजकाल माणसाच्या नीतीमत्तेवरचा विश्वास उडालाय हो. कोणीही भेटले तरी त्याच्यात चांगुलपणा असेल अशी खात्री देववत नाही."
गुरुजी गप्पच राहिले. त्यांचे अनुभव वेगळ्या चौकटीतले असले तरी अनुमान तेच होते.
"एकवीस वर्षांची मुलगी. लग्न होऊन सात महिने झाले. कूस उजवली म्हणून घरी आणि माहेरी आनंद असायला हवा होता. तिला कोठे ठेवू आणि कोठे नको असे तिच्या पतीला वाटायला हवे होते. गर्भपात करून घ्यायला म्हणून ती पोर आली हो आज. एकटीच आली." पुढे बोलवेना म्हणून राजवैद्य थांबले.
"नवर्‍याला येव्हढ्यात मूल नको वगैरे काही कारण होते का?" गुरुजी म्हणाले. कारण यापेक्षा फार वेगळे असावे असे राजवैद्यांच्या बोलण्यावरून जाणवत होते, पण जिभेवर ते शब्द आणायला गुरुजी कचरत होते. तसे नसेल आणि केवळ बोलल्यामुळे तसे होईल अशी अवास्तव भिती त्यांना वाटत होती.
"नाही हो. सासरच्यांना मूल हवे होते. त्यांना सूनच नको होती."
"का? ती गर्भवती झाली ती काय नको असताना झाली?" गुरुजी म्हणाले.
"ती गोष्ट वेगळी. त्यांना लग्नांत घेतला त्याहून जास्त हुंडा नंतर हवा झाला. त्यावरून तिचा छळ होत होता. तिच्या माहेरची परिस्थिती त्यांच्या वाढत्या मागण्या पुर्‍या करण्यासारखी नव्हती. शेवटी गोष्ट घटस्फोटापर्यंत जाऊन ठेपली."
"पण त्यांना ते मूल हवे होते ना?" गुरुजी म्हणाले.
"ते तर त्यांना अजूनही हवे आहे. आज घटस्फोट घेऊ. तिची प्रसूती झाली की ते मूल घेऊन जाऊ असे ते म्हणताहेत."
"हं?" गुरुजी म्हणाले.
"पैसेवाले आहेत. ही घाण घरातून गेली की मुलाचे दुसरे लग्न करू म्हणतायत." राजवैद्य म्हणाले. "सोन्यासारखी पोर आहे हो. वडीलही नाहीयेत तिला. आता कोण बघणार बिचारीला? रडत होती बिचारी. आंतडे पिळवटून आले."
"कोतवालाकडे तक्रार केली तर कदाचित मार्ग सापडेल" गुरुजी म्हणाले.
"आणि उद्या तिच्यावर घासलेट ओतून तिला पेटवून दिले तर? किंवा गळा दाबला तर?"
गुरुजी शहारले. त्यांच्याकडे याचे उत्तर नव्हते.
"तरुणपणी अशा गोष्टी ऐकायला मिळत नव्हत्या. आजकाल अशा बर्‍याच गोष्टी होतायत हो. देशाचे काय होणार अशी भिती वाटायला लागली आहे. अशा नरधमांना देव काही शिक्षा करत नाही याचीही भिती वाटते आहे."
"तुम्ही मनाला त्रास करून घेऊ नका राजवैद्य" गुरुजी म्हणाले. "माणसावर संस्कार विद्यार्थीदशेत घडवायचे असतात. तेथे आम्ही शिक्षक कमी पडत असणार. चूक आमची आहे."
"नाही गुरुजी. आपण सर्व प्रयत्न करता हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही केलेले संस्कार माणसे लोभापोटी विसरतात. त्यांच्या आईवडिलांच्या विचारांचा पगडा जास्त ठरतो. सगळेजण मिळून त्या एकट्या अबलेची ससेहोलपट करण्यात वीरश्री मानतात. या विषाला उतारा नाहीये हो."
(Key words: Dowry Harassment)

Monday, December 21, 2015

उत्कर्षाची संधी

आटपाटनगरचे गुरुजी राजवैद्यांना भेटायला गेले तेव्हा एक रुबाबदार गृहस्थ राजवैद्यांबरोबर बोलत होते. गुरुजी तेथे पोहोचत होते तेव्हा ते निघालेच होते. ते गेल्यावर ते कोण होते असे गुरुजींनी कुतूहलाने विचारले.
"शेजारच्या रा्ज्यातले राजवैद्य होते" राजवैद्य म्हणाले. "मागच्या वेळी ते भेटले तेव्हा राजवैद्यांच्या जागेवर सेवाज्येष्ठतेनुसार त्यांची नेमणूक होऊनही प्रभारी राजवैद्य त्यांना ती जागा देत नव्हते. न्यायाधीशांसमोर खटला चालू होता."
"पण ते प्रभारी ती जागा सोडत का नव्हते?" गुरुजींनी विचारले.
"मोह."
"त्या पदावर वेतन जास्त मिळते का ?" गुरुजींनी विचारले.
"नाही हो" राजवैद्य म्हणाले. "मीही त्यांना तोच प्रश्न विचारला."
"मग काय म्हणाले ते?"
"ते म्हणाले की त्या पदावर असतांना सरकारी खर्चाने किमान दोन-तीन परदेश वार्‍या करायला मिळतात. त्यातून त्यांची दोन मुले अमेरिकेत आहेत. वारी झाली की मुलांना भेटूनही होईल आणि अमेरिका दर्शनही होईल."
"सरकार या कामासाठी राजवैद्यांना परदेशी पाठविते?" गुरुजींनी आश्चर्याने विचारले.
"नाही हो. सरकारी कामाच्या निमित्ताने जायचे आणि मजा करून यायचे." राजवैद्य म्हणाले.
"मग त्यांचे पुढे काय झाले?"
"ते खटला जिंकले. राजवैद्यांची जागा पदरी पडली. तीन वि्देश वार्‍या झाल्या. आता ते संतुष्ट आहेत."
"तुम्हाला अशा वार्‍या करायला मिळत नाहीत ते?" गुरुजींनी विचारले.
"आपल्या रुग्णालयांत तशी पद्धत नाही. आणि मला त्या गोष्टीचा मोहही नाही" राजवैद्य म्हणाले. "मी पारपत्रही (Passport) काढलेले नाही. पारपत्राशिवाय मी कसा परदेशी जाणार? मागे एकदा आमच्या विभागातल्या एका महिला वैद्याला तीन महिन्यांसाठी राजखर्चाने अमेरिकेला जाण्याचा योग आला. जाण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी मला आपण उद्या प्रयाण करत आहोत असे सांगितले. आधी समजले तर मी ती संधी बळकावीन अशी त्यांना भिती वाटत होती असे त्या दुसर्‍या एका वैद्यांना म्हणाल्या, ते माझ्या कानावर आले. मला हाताखालच्या वैद्यांनी ओळखलेच नाही या एका गोष्टीचे दुःख अजून मनाला त्रास देते आहे."
"इतर विभागांत तसे झालेले त्यांनी पाहिले असेल" गुरुजी म्हणाले. "किंवा त्यांनी स्वतःवरून तुमची परीक्षा केली असेल. आपण ते मनाला लावून घेऊ नका."
"मनाला लागणार्‍या गोष्टी मला तुमच्यासारख्या सहज थांबविता येत नाहीत हो" राजवैद्य म्हणाले.

Saturday, December 19, 2015

विद्यार्थ्यांसाठी १० आज्ञा (कमांडमेंटस)

आटपाट नगरचे गुरुजी नुकतेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांना व्याख्यान देऊन आले होते.
"गुरुजी, आपण असे त्रासलेले का बरे दिसताय?" राजवैद्यांनी विचारले.
"अहो राजवैद्य, काय सांगू? अगदी कहर झाला. शिक्षण राहिले बाजूला. विद्यार्थ्यांच्या वर्तणूकीने अगदी मनस्ताप झाला आहे." असे म्हणून गुरुजींनी त्या व्याख्यानात आलेले विद्यार्थ्यांचे अनुभव राजवैद्यांना सांगितले. ते ऐकून राजवैद्य हसले.
"गुरुजी, ही नवी पिढी आता अशीच वागणार. त्यांना समज द्यायची असेल, तर तुमच्या शिकविण्याच्या वेळी मी देतो त्या दहा सूचना त्यांना स्लाई्ड्स म्हणून दाखवा.
गुरुजींना ही कल्पना फारच आवडली. त्यांनी त्वरेने तशा स्लाई्ड्स बनवून घेतल्या. त्या अशा होत्या.

त्या विद्यार्थ्यांना कितपत आवडल्या आणि मानवल्या कोण जाणे.


SlidesH

Friday, December 18, 2015

दिवसाढवळ्या भेटीला आलेले वटवाघूळ

दिवसाढवळ्या भेटीला आलेल्या वटवाघूळाचा इंटरनेटवरचा हा पहिलाच फोटो आहे आणि कदाचित तो शेवटचाही असेल.


This is the first photo of a bat visiting during broad daylight. It could perhaps be the last one too. It is not in any cage - it is outside a compost cage.

Thursday, December 17, 2015

दीन कर्दनकाळ

 राजवैद्य आणि गुरुजी दरबारी मंडळींच्या वागण्याबद्दल बोलत होते.
"गुरुजी, राजाच्या दरबारातली मंडळी कशी वागतात बघा. प्रधान सचिव दम देतात तेव्हा प्रधान संचालक शेपूट आतमध्ये घालून असतात. आणि आमच्या रुग्णालयतल्या कोणाही बरोबर बोलतात, तेव्हा कर्दनकाळासारखे वागतात."
"माझ्या लक्षांत नाही आले" गुरुजी म्हणाले.
मग राजवैद्यांनी गुरुजींना चित्रावर माऊस धरून दाखविले.
"माऊस चित्रावर धरण्यापूर्वी प्रधान सचिवांबरोबरचे वागणे दिसते आहे, तर माऊस चित्रावर धरल्यावर आमच्या रुग्णालयतल्या म्हणजे त्यांच्या हाताखाल्च्यांबरोबरचे वर्तन दिसते आहे."

ते पाहिले आणि गुरुजी काय समजायचे ते समजले. तुमच्याया लक्षांत आले नसेल तर तुम्हीही चित्रावर माऊस धरा आणि बघा.


When awake
While dream

Tuesday, December 15, 2015

बागेतला पाहुणा

आमच्या सज्जातल्या छोटेखानी बागेबद्दल मी भरभरून लिहित असतो. आज आमच्या बागेतल्या फुलांतला मध पिण्यासाठी येणारा छोटासा पाहुणा मी आपल्याला दाखविणार आहे.


दोन इंच लांबीच्या या फूलचुख्याची शेपूट अर्धा इंच लांब असते. काही जणांचे पोट पांढरे शु्भ्र असते, तर काही जणांचे पिवळे असते. बाकीचे अंग आणि डोके करडे-काळे असते. सगळ्यांची चोच जवळ जवळ पाऊण इंच लांब आणि बारीक असते. हा पक्षी अगदी लाजाळू किंवा भित्रा असतो. फोटो काढण्यासाठी तो एका जागी क्षणभर टिकत नाही.कॅमेरा उचलला किंवा माणसाला आपल्याकडे नुसते बघताना पाहिले तरीही तो पटकन उडून जातो. तो उडतोही अगदी वार्‍याच्या वेगाने. त्याचा फोटो काढणे किती कठीण असते ते वर दाखविलेल्या चार फोटोंवरून सहज लक्षांत यावे. एकाही फोटोत तो पूर्णपणे दिसत नाही आहे. जास्वंद, बोगनवेल अशा कोणत्याही फुलावर तो बसतो, आपली चोच आंत खुपसतो, आणि आंतला मध पितो. त्याच्या येव्हढ्याशा वजनाने ते छोटेसे फूल गदागदा हलते. चिमणीचा आवाज 'चिव चिव' असा असतो. हा फूलचुखा पक्षी दर वेळी 'च्यू च्यू च्यू' असे तीनदा ओरडतो.
(Key words: Honey eater bird)

Sunday, December 13, 2015

सुरक्षित सूर्यस्नान

सूर्यस्नानामुळे ड जीवनसत्व मिळते. अर्थात ते मिळवताना शरीराचे संरक्षण करणे महत्वाचे असते. ऊन फारसे कडक नसताना असे सूर्यस्नान चालण्यासारखे असते.




ऊन कडक झाले तर डोक्यावर टोपी घातली तर डोके तापत नाही, आणि जर डोक्यावर फारसे केस नसतील तर टॅनिंगमुळे तेथील त्वचा काळी पडत नाही.


जर टोपी नसेल तर रुमाल बांधला तरी चालते. त्याने संरक्षण तर मिळतेच, पण घामही पुसला जातो. टोपी धुण्यापेक्षा रुमाल धुणे सोपे असते. रुमाल छान बांधला तर मध्यपूर्वेतील श्रीमंत माणसासारखे रुबाबदारही दिसता येते.


(Key words: Tanning Protection Hat, Hat substitute)

Friday, December 11, 2015

माशाचे श्वसन

Nemo Wagging Tail
पाण्यात पोहोणारे मासे पाहून तणावमुक्ती होते असे म्हणतात. घरात मासे पाळावे असेही त्यासाठी सुचवले जाते. प्रत्येकाला ते जमेलच असे नाही. त्याला पाण्यात श्वासोच्छ्वास करणारा हा मासा हा पर्याय ठरू शकेल.

Wednesday, December 9, 2015

प्रेमाची वेगळीच गोष्ट

आटपाट नगरचे राजवैद्य गुरुजींना एक जुनी आठवण सांगत होते.

ती दोघे आमच्याच बरोबर शिकत होती. वर्गातली इतर मुले अभ्यासात बुडलेली होती तेव्हा तो आणि ती प्रेमात आकंठ बुडालेली होती. खरे तर ते अभ्यासाचे वय होते. त्या परीक्षेत मिळविलेल्या गुणांवर त्यांचे भवितव्य अवलंबून होते. त्याला इंजिनियर व्हायचे होते. तिला कोण व्हायचे होते देव जाणे. मी तिला तसे ओळखत नव्हतो. आम्हा सर्वांना येवढेच माहीत होते की तिला त्याच्याबरोबर सर्व आयुष्य घालवायचे होते. जोडीने संसार करावयाचा होता. आम्ही महविद्यालयाच्या वर्गांत बसायचो तेव्हा ती दोघे समोरच्या उपहारग्रुहात एकमेकांच्या डोळ्यांत बघत बसलेली असत. आम्ही जेव्हा वाचनालयात अभ्यास करत बसायचो तेव्हा ती दोघे महविद्यालयच्या कट्ट्यावर हातांत हात गुंफून बसलेली असायची.  त्यांचे प्रेम त्यांच्या घरच्यांना माहीत होते की नाही कोण जाणे, पण महाविद्यालयांत ते माहीत नव्हते अशी व्यक्ती शोधूनही सापडली नसती हे नक्की. तिचे घर माझ्या घराच्या जवळ होते. त्याचे कोठे तरी दूर होते. मला ती दोघे माझ्या घराजवळ कधी कधी दिसायची. मला पाहून तो हसायचा..
"बायकोला घरी सोडायला आलो" तो म्हणायचा. "पण आडबाजूने आलोय. सासरेबुवांनी बघितले तर राडा होईल."
म्हणजे तिच्या घरी तरी ते माहीत नसावे. पण आपले लग्न होणार हे त्या दोघांना पक्के माहीत असावे. पुढे मी वैद्यकीय शिक्षणाच्या मार्गाने गेलो. तो अभियांत्रिकीच्या शिक्षणाला लागला. ती काय शिकत होती ते समजले नाही. पण आमच्या दृष्टीने ते फारसे महत्वाचे नव्हते. त्यांचे ते पौंगंडावस्थेतले प्रेम पुढे सफळ होणार होते हेच आम्हा सर्वांना आनंददायी वाटत होते.
मध्यंतरी बराच काळ लोटला. आम्ही इतर जण शिक्षण संपवून आपापल्या व्यवसायांत शिरलो. तिच्या घरासमोरून जातांना कधी कधी त्यांचे प्रेम आठवायचे. ती कधीच दिसली नाही, त्या अर्थी ती दोघे लग्न करून आनंदात असणार असे मी समजून चालत असे. एक दिवस एक जुना वर्गमित्र भेटला.
"अरे, तू ऐकलस का? आपला तो कोतवालीत बंद होता. आता बाहेर आलाय." तो आपल्या कथेच्या नायकाबद्दल बोलत होता.
"अरे? हे काय सांगतोयस तू?" मी म्हटले. "काय झाले? ती कोलमडून पडली असेल ना?"
"ती? नाही. तिला हे माहीतही नसेल."
"म्हणजे काय? आपला नवरा कोतवालीत बंद झाला ते तिला माहीत कसे नसेल?"
"तो तिचा नवरा नाहीये काही."
"नाही?" मी सर्द झालो. "असे कसे झाले?"
"परमेश्वराची कृपा. त्याने तिला फसवले. ती सुटली म्हण ना."
"पण ती दोघे किती प्रेमात होती. का फसवले त्याने?"
"आम्ही त्याला विचारले. तो म्हणाला की तिला पटवून दाखवेन अशी त्याने मित्रांबरोबर पैज लावली होती. म्हणून तो तिला फिरवत होता."
"पैजेसाठी दोने तीन वर्षे त्याने प्रेमाचे नाटक केले?"
"होय. त्याने तिला तसे सांगितले तेव्हा ती कोलमडली. जीव देणार होती. घरच्यांनी कशीबशी तिला सावरली. काही वर्षांनंतर तिचे दुसर्‍या एका मुलाबरोबर लग्न लावून दिले. आता ती दुसर्‍या शहरांत रहाते आहे."
"मग तो कोतवालीत बंद कसा झाला?"
"त्याने दुसर्‍या एका मुलीबरोबर लग्न केले. एक मूलही झाले. मग ती दोघे विभक्त झाली. मुलाला आईकडून गुपचूप काढून घेऊन तो गावाला गेला. तिने कोतवालीत मुलाला पळविले म्हणून तक्रार केली आणि कोतवालाने त्याला अटक केली."
"अं..." मला गरगरायला झाले. त्या एका माणसामुळे किती वादळे झाली बघा.

Monday, December 7, 2015

स्वप्ने बघण्याची डिजिटल पद्धत

 स्वप्ने कोणाला नसतात?

आजच्या डिजिटल युगात तर स्वप्ने कंप्युटर, टॅब्लेट, स्मार्ट फोन यावर बघणे अगदीच सोपे झाले आहे. मनांत इमले रचणे आता इतिहासजमा झाले. विश्वास बसत नाही?

या चित्रावर माऊस धरा आणि बघा.


When awake
While dream

Saturday, December 5, 2015

आणखी एक नाटक ((नौटंकी))

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयात वैद्य काम करत, प्रशिक्षणार्थी वैद्य शिक्षण घेत, आणि उपलब्ध खाटांहून बर्‍याच जास्त संख्येने रुग्ण कक्षांमध्ये दाखल झालेले असत. अशा वातावरणात नाटक वगैरे गोष्टींना वेळ आणि स्थान मिळण्याची शक्यता जवळजवळ नाही म्हणण्याएवढी होती. पण परमेश्वराची लीला अगाध असते. राजवैद्यांना आलेला हा अनुभव हे त्या सर्वशक्तीमान परमेश्वराच्या अगाध लीलेचे एक उदाहरण.
रुग्णालयात एक कनिष्ठ वैद्य रुजू झाला. आपले काम व्यवस्थित करायचा. कोठे कोठे जरा कमी पडायचा, पण शिकविल्यावर शिकायचा. वागायला बोलायला चांगला होता. पुढे तो बराच वरपर्यंत चढत जाईल अशी राजवैद्यांची धारणा झाली होती. काही इतर वरिष्ठ वैद्य त्यांच्याबरोबर सहमत नव्हते. पण आपले मत बरोबर आहे अशी राजवैद्यांना खात्री होती.
पुढे या वैद्याचे दोनाचे चार हात झाले. आता तो  मार्गाला लागला असे राजवैद्य समजले. पण त्याचा मार्ग वेगळाच होता. वैद्य दर आठवड्याला शनिवारी रजा घ्यायला लागला. याचे सर्वांनाच आश्चर्य वाटायला लागले. शनिवारी अर्धा दिवस काम असायचे. एका दिवसाची नैमित्तिक रजा घेऊन अर्ध्या दिवसाची रजा फुकट घालविणारा रुग्णालयाच्या इतिहासातला हा पहिलाच वैद्य होता.
"अरे, तू असे करून स्वतःचे नुकसान का करून घेतोस?" असे त्याला कोणी तरी विचारले.
"माझी प्रिय पत्नी आजारी असते. तिच्यावर उपचार करणारे वैद्य फक्त शनिवारी उपलब्ध असतात" तो वैद्य म्हणाला. "मी तिला एकटीला सोडू शकत नाही. तिचे काही बरेवाईट झाले तर मी तिच्याविना जगू शकणार नाही." असे म्हणताना त्या वैद्याच्या डोळ्यांतून घळाघळा अश्रू वहात होते. ते अश्रू बघून स्वतः एक वैद्य असणार्‍या आणि एरवी धडधाकट दिसणार्‍या त्याच्या पत्नीला तिच्यावर उपचार करणार्‍या वैद्यांकडे जाण्यासाठी पती बरोबर का लागतो ह विचारायचे कोणाला सुचलेच नाही.
वर्षाला पंधरा नैमित्तिक रजा असत. त्या पंधरा शनिवारांत संपल्या. मग हा वैद्य नियमांविरुद्ध एकेका दिवसाची अर्जित रजा घ्यायला लागला. त्यासाठी त्याने रुग्णालयाच्या प्रमुखांना तीच गोष्ट सांगून त्यांची परवानगी काढली. पुढे पुढे तो महिन्याभराच्या रजा घ्यायला लागला. पत्नीच्या उपचारांसाठी रजा घेतो म्हटल्यावर रजा नाकारणेही शक्य नव्हते. पण एक दिवस निवासी वैद्य संपावर गेले. रुग्णांना आपत्कालीन सेवा देण्यासाठी सर्व वैद्यांच्या रजा रद्द झाल्या. या वैद्यालाही कामावर यावयाचे फर्मान आले. आता त्याने नोकरी सोडण्याची महिन्याची पूर्वसूचना दिली, आणि संपकाळात कामावर येतो असे कबूल केले. पण पठ्ठ्या कामावर आलाच नाही.
"तो कामावर येत नाही. आता संपकाळात रुग्णसेवेसाठी वैद्य कमी पडताहेत" राजवैद्य म्हणाले.
"तो कसला कामावर येतोय?" एक जाणते वैद्य म्हणाले. "गेली दोन वर्षे तो शिकाऊ वैद्यांच्या खाजगी शिकवण्या चोरून करतोय. खूप कमावतोय. म्हणून तर तो दर शनिआरी रजा घेत असे."
"काय सांगताय? आणि त्याच्या पत्नीचे आजारपण आणि त्याचे उपचार?" राजवैद्यांनी विचारले.
"ते एक नाटक हो. आपल्यासारख्या प्रगत राज्यात फक्त शनिवारीच उपचार करणारे वैद्य असतात काय?"
राजवैद्यांना कसेतरी वाटायला लागले. प्रिय व्यक्तीच्या आजारपणाबद्दल किंवा मृत्यूबद्दल उगाच खोटे बोलू नये, परमेश्वर बघत असतो अशी त्यांची धारणा होती. धनाच्या लालसेपायी हा वैद्य हे काय करून बसला असे त्यांच्या मनांत आले. तो अप्रतिम नकला करायचा ते त्यांना आठवले, आणि त्याने घळाघळा रडून दाखविले होते ते कसे त्याचेही कोडे सुटले. असा विश्वासघात करणार्‍या एकामुळे सर्वच मा्णसांवरचा विश्वास उडतो आणि त्यांचे नुकसान होते हेही त्यांना जाणवले. पण जे होते ते तसेच होते आणि त्याला इलाज नव्हता. त्यांना रुग्णालय प्रमुखांनी भर सभेत घळाघळा रडून दाखविले होते ती गोष्टही आठविली. कोणीही यावे आणि आपल्याला फसवून जावे अशा वयाला आपण पोहोचलो की काय अशी शंकाही आली.

Thursday, December 3, 2015

रुग्णालयातले नाटक (नौटंकी)

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयाच्या प्रमुखांनी सर्व प्रमुख वैद्यांची तातडीची सभा बोलाविली. बहुतेक वेळा सभेचा विषय सांगण्यात येत नसे, कारण सभेची पूर्वतयारी करणे आवश्यक असते असे प्रशासनातील कोणालाच वाटत नसावे. या सभेचाही विषय कोणास सांगण्यात आला नव्हता. तरीही हातातली कामे सोडून सर्व प्रमुख वैद्य सभेला हजर झाले. रुग्णालय प्रमुखांचा चेहरा गंभीर दिसत होता. कोणीअकस्मात वैकुंठवासी झाले की काय असे काही जणांच्या मनांत आले.
"आज मी आपणा सर्वांना सभेला बोलावले आहे, त्याचे कारण गंभीर आहे" रुग्णालय प्रमुख म्हणाले. सर्वांनी आपापले चेहरे जमतील तेव्हढे गंभीर केले. रुग्णालय प्रमुखांजवळ बसलेल्यांचे चेहरे आधीपासूनच गंभीर होते. "कोणा एका विक्रुत मनोव्रुत्तीच्या दुष्टाने आपल्याला माझ्याबद्दल एक घाणेरडे पत्र पाठविले आहे, त्याबद्दल मी ही सभा बोलाविली आहे."
चार पाच जण सोडून इतर सर्वांचे चेहरे गोंधळलेले झाले.
"मला पत्र मिळालेले नाही" असे बरेच जण म्हणाले.
"काही विशिष्ट वैद्यांनाच ते पत्र मिळाले आहे" असे एका माहितगाराने सांगितले. आता सर्वांचे चेहरे उत्सुक झाले. पत्रांत असे आहे तरी काय असे त्यांच्या चेहर्‍यांवर दिसत होते.
"माझ्यावर घाणेरडे आरोप केलेले आहेत" रुग्णालय प्रमुख म्हणाले. माझ्या नियुक्तीसाठी मी खोटी प्रमाणपत्रे दिली असे म्हटले आहे. माझी प्रमाणपत्रे खरी आहेत. मी ती कोणालाही दाखवायला तयार आहे."
कोणीही प्रमाणपत्रे बघण्यास मागितली नाहीत. सनसनाटी गोष्ट पुढे असणार याची सर्वांना कल्पना होती.
"आपल्या रुग्णालयांतील काही वरिष्ठ वैद्य स्य्रिया आणि मी यांच्यात घाणेरडे संबंध आहेत असेही पत्रांत म्हटले आहे" रुग्णालय प्रमुख म्हणाले. "इतक्या पवित्र शिक्षक आणि वैद्य भगिनींबद्दल असे म्हणणे इतके किळसवाणे आहे म्हणून सांगू."
काही चेहर्‍यांवर अनभिज्ञता दिसली, तर काही चेहर्‍यांवर बेरकी हास्य उमटले. ते जर रुग्णालय प्रमुखांना दिसले असले तर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
"ज्या माणसाने - माणूस कसला, सैतानच तो - हे हीन कृत्य केले आहे, तो कोण आहे ते मला ठाऊक आहे. त्याने असे कृत्य पूर्वीही केले आहे. पण ते जाऊ द्या. आता मी कंटाळलो आहे. नोकरी सोडू्न जावे असे मला आता वाटू लागले आहे. माझ्या पत्नीला ...."
सर्वांनी कान टवकारले. त्यांच्या पत्नीलाही हे पत्र पोहोचले की काय?
"माझ्या पत्नीला दुर्धर आजार झाला होता, तेव्हा माझ्या लक्षांत आले की मी माझ्या सर्वांत जवळच्या व्यक्तीला पुरेसा वेळ दिलेला नाही. आता नोकरी सोडून तिला माझा सर्व वेळ द्यावा असे मला वाटते आहे" असे म्हणून ते स्तब्ध झाले. त्यांच्या डोळ्यांतून घळघळा अश्रू वाहू लागले. ते पाहून उपस्थित स्तिमित झाले. पण एक प्रमुख वैद्य मात्र शांत होते.
"नाटक करतायत ते" असे ते शेजारी बसलेल्या राजवैद्यांना हळूच म्हणाले. "या आधी मी होतो त्या रुग्णालयांझी त्यांनी असेच रडून दाखविले होते. शाळा आणि महविद्यालयांत असतांना ते नाटकांत अप्रतिम काम करत असत आणि ग्लिसरीनशिवाय रडून दाखवत असत."
राजवैद्य सर्द झाले. आपल्याला हाच अनुभव काही काळाने एका कनिष्ठ वैद्याकडून येणार आहे असे त्यांना तेव्हा वाटायचे काही कारण नव्हते. पण ते आपण नंतर बघू.
(Key words: Drama in Hospital)

Tuesday, December 1, 2015

अभ्यास कशासाठी?

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयातील काही वैद्यांची मुलेही वैद्य होण्यासाठी शिक्षण घेत होती.
"राजवैद्य, आम्हा शिक्षकांची मुले काही शिक्षक होऊ पहात नाहीत" गुरुजी म्हणाले. "वैद्यांची मुले मात्र वैद्य होऊ इच्छितात हे कसे?"
"गुरुजी, वैद्यांच्या मुलांना आई-वडिलांचा खूप पैसे कमाविण्याचा उद्योग पुढे चालवायचा असतो. तसे शिक्षकी पेशाचे आहे का?"
"नाही. आपण म्हणता ते खरे" गुरुजी म्हणाले. "मला वाटले, चांगले वैद्य होऊन समाजाची सेवा करावयाची असे त्यांचे स्वप्न असेल."
"स्वप्न असेलही, पण इ्च्छा मात्र दिसत नाही" राजवैद्य म्हणाले. "आमच्या एका वैद्यांची सुपुत्री आमच्याकडेच शिक्षण घेत आहे. तिचा परिक्षेचा अभ्यास आधी वैद्य करतात आणि मग तिच्याकडून करवून घेतात. ती त्यांना काय म्हणाली माहीत आहे? ती म्हणाली, हे तृतीय वर्षाचे शिक्षक नीट परीक्षा घेत नाहीत म्हणून मी वर्षभर अभ्यास केला नाही. ते पुस्तकांत बघून प्रश्नांची उत्तरे लिहू देतात. आता त्यामुळे माझे नुकसान झाले ना?"
'असे?" गुरुजी म्हणाले.
"तर काय. मीही अचंभित झालो. संपूर्ण ज्ञान मिळवून चांगला वैद्य होण्यासाठी अभ्यास करायचा असतो की परीक्षेत चांगले गुण मिळवियासाठी करावयाचा असतो? ज्या वैद्य होण्यासाठी शिकणार्‍या विद्यार्थ्याला हे समजत नाही तो उद्या वैद्य म्हणून काय करणार, हा मोठा चिंतेत टाकणारा प्रश्न आहे बघा."

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क