Showing posts with label समाजशास्त्र. Show all posts
Showing posts with label समाजशास्त्र. Show all posts

Monday, December 21, 2015

उत्कर्षाची संधी

आटपाटनगरचे गुरुजी राजवैद्यांना भेटायला गेले तेव्हा एक रुबाबदार गृहस्थ राजवैद्यांबरोबर बोलत होते. गुरुजी तेथे पोहोचत होते तेव्हा ते निघालेच होते. ते गेल्यावर ते कोण होते असे गुरुजींनी कुतूहलाने विचारले.
"शेजारच्या रा्ज्यातले राजवैद्य होते" राजवैद्य म्हणाले. "मागच्या वेळी ते भेटले तेव्हा राजवैद्यांच्या जागेवर सेवाज्येष्ठतेनुसार त्यांची नेमणूक होऊनही प्रभारी राजवैद्य त्यांना ती जागा देत नव्हते. न्यायाधीशांसमोर खटला चालू होता."
"पण ते प्रभारी ती जागा सोडत का नव्हते?" गुरुजींनी विचारले.
"मोह."
"त्या पदावर वेतन जास्त मिळते का ?" गुरुजींनी विचारले.
"नाही हो" राजवैद्य म्हणाले. "मीही त्यांना तोच प्रश्न विचारला."
"मग काय म्हणाले ते?"
"ते म्हणाले की त्या पदावर असतांना सरकारी खर्चाने किमान दोन-तीन परदेश वार्‍या करायला मिळतात. त्यातून त्यांची दोन मुले अमेरिकेत आहेत. वारी झाली की मुलांना भेटूनही होईल आणि अमेरिका दर्शनही होईल."
"सरकार या कामासाठी राजवैद्यांना परदेशी पाठविते?" गुरुजींनी आश्चर्याने विचारले.
"नाही हो. सरकारी कामाच्या निमित्ताने जायचे आणि मजा करून यायचे." राजवैद्य म्हणाले.
"मग त्यांचे पुढे काय झाले?"
"ते खटला जिंकले. राजवैद्यांची जागा पदरी पडली. तीन वि्देश वार्‍या झाल्या. आता ते संतुष्ट आहेत."
"तुम्हाला अशा वार्‍या करायला मिळत नाहीत ते?" गुरुजींनी विचारले.
"आपल्या रुग्णालयांत तशी पद्धत नाही. आणि मला त्या गोष्टीचा मोहही नाही" राजवैद्य म्हणाले. "मी पारपत्रही (Passport) काढलेले नाही. पारपत्राशिवाय मी कसा परदेशी जाणार? मागे एकदा आमच्या विभागातल्या एका महिला वैद्याला तीन महिन्यांसाठी राजखर्चाने अमेरिकेला जाण्याचा योग आला. जाण्याच्या आदल्या दिवशी त्यांनी मला आपण उद्या प्रयाण करत आहोत असे सांगितले. आधी समजले तर मी ती संधी बळकावीन अशी त्यांना भिती वाटत होती असे त्या दुसर्‍या एका वैद्यांना म्हणाल्या, ते माझ्या कानावर आले. मला हाताखालच्या वैद्यांनी ओळखलेच नाही या एका गोष्टीचे दुःख अजून मनाला त्रास देते आहे."
"इतर विभागांत तसे झालेले त्यांनी पाहिले असेल" गुरुजी म्हणाले. "किंवा त्यांनी स्वतःवरून तुमची परीक्षा केली असेल. आपण ते मनाला लावून घेऊ नका."
"मनाला लागणार्‍या गोष्टी मला तुमच्यासारख्या सहज थांबविता येत नाहीत हो" राजवैद्य म्हणाले.

Tuesday, September 8, 2015

सामूहिक आजार

आटपाट नगरातली गोष्ट आहे.
"राजवैद्य, आपल्याला साथीचे आजार माहित आहेत. पण आपण सामूहिक आजारांबद्दल ऐकले आहे का?" गुरुजींनी विचारले.
"नाही बुवा" राजवैद्य म्हणाले. "हे आपले एखादे कोडे असावे असे वाटते."
"आमचे विद्याथी म्हणजे तरूण मुलगे आणि मुली असतात. तारुण्याची ताकद आणि उत्साह त्यांच्या अंगात सळसळत असतो. आजारपण म्हणजे काय ते त्यांना माहीतच नसावे असे त्यांच्याकडे बघून वाटते. गेल्या आठवड्यांत एके दिवशी त्यांना सामूहीक आजार झाला."
म्हणजे नक्की काय झाले?" राजवैद्यांनी विचारले
"सकाळच्या सत्रांत सर्व विद्यार्थी अनुपस्थित राहिले. मी ते येतील म्हणून वाट बघत होतो. शिकविण्याची तयारी केली होती. सर्व फुकट गेले. दुस~या दिवशी त्यांतले अर्धे जण आले. ब~याच कालावधीनंतर आणखी थोडे जण आले. काल आपण का आला नव्हता असे मी प्रत्येकाला विचारले. प्रत्येकाने आपली तब्येत ठीक नव्हती असे उत्तर दिले. चेह~यावरून तर त्यांच्यापैकी कोणीही आजारी किंवा नुकताच आजारांतून उठलेला वाटत नव्हता. एका दिवशी सर्वांना होणारा आणि दुस~या दिवशी बरा होणारा कोणता आजार असेल बरे?" गुरुजींनी विचारले.
राजवैद्य हंसले. "असा आजार नसतो गुरुजी" ते म्हणाले. "कोणाचा तरी वाढदिवस असेल किंवा दुस~या विषयाची परीक्षा असेल. आमचे प्रशिक्षणार्थी वैद्यही असे करतात."
"आपण विद्यार्थी होतो तेव्हा असे होत नव्हते" गुरुजी म्हणाले.
"काळ बदललाय गुरुजी. जे झालेय ते बरे की वाईट हा विचार सोडून द्या. झालेय ते बदलता येणार नाही याची खूणगाठ बांधूनच चला."

Saturday, September 5, 2015

शिक्षकदिन

"आज शिक्षकदिन. म्हणजे आपली गुरुपौर्णिमा असते ती नव्हे. हा पाश्चात्यांनी जगाला दिलेला शिक्षकदिन" आटपाटनगरीचे गुरुजी पत्नीला सांगत होते.
"आज तुमचा दिवस आहे तर तुम्ही असे खिन्न का?" पत्नीने विचारले.
"त्या एरवी दीन असणा~या शिक्षकांच्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी आज शिक्षक काळ्या फिती लावून काम करत होते" गुरुजी म्हणाले. "त्यांच्यावर ही पाळी आली म्हणून मन उदास झाले आहे. राजदरबारी त्यांची कोणीही दखलही घेत नाही आहे."
"तेव्हढेच, की आणखी काही?" पत्नीने विचारले.
"आमच्याकडील एका कडक स्वभावाच्या शिक्षकांच्या विद्यार्थ्यांनी त्यांना केक आणला, स्वतः बनविलेले शुभेच्छा पत्र दिले. एरवी कडक असणारे ते शिक्षक तेव्हा तोंड भरून हसत होते. विद्यार्थ्यांना आपण त्रास देऊ नये म्हणून त्यांनी असे केले आहे, आपल्यावरील प्रेमामुळे नाही हेही त्यांना समजले नाही. असे इतरही शिक्षक आणि विद्यार्थी आहेत. त्यामुळेही मन उदास आहे."
पत्नी गप्पच राहिली.
"ज्यांना प्रेमाने आणि कळ्कळीने शिकविले असे काही विद्यार्थी फेसबूक, ट्विटर आणि व्हॉट्सॅपवर आपल्या शिक्षकांविषयी काहीबाही लिहित आहेत असे ऐकले. त्यामुळेही मन उदास आहे."
पत्नीला गुरुजंची व्यथा समजली, पण तिच्याकडे त्यासाठी काही उतारा नव्हता.
"एक दिवस शिक्षकांचा म्हणून गाजवायचा आणि वर्षाचे उरलेले दिवस त्यांची अवहेलना करायची, या गोष्टीला आयुष्यभर पहात आलो. आता या दिवसाचा फोलपणा जाणवतोय म्हणून उदास वाटतेय" गुरुजी  म्हणाले.
"थोडा गरम गरम चहा घ्या. बरे वाटेल. मनाचा उदासपणा जाईल" पत्नी म्हणाली. "एक लक्षांत घ्या. ही सर्व माया आहे. तुम्ही भगवत्गीतेत सांगितल्याप्रमाणे सर्व परमेश्वराच्या चरणी अर्पण करा. सुख त्याचे, दुःखही त्याचे. मग मनाला असा त्रास होणार नाही."
एरवी पत्नीला चार गोष्टी शिकविणारे गुरुजी आज तिच्या मुखातून हे ऐकून क्षणभर संभ्रमित झाले, मग आनंदाने हसले आणि म्हणाले, तू म्हणतेस ते खरे आहे. हे मी विसरलो होतो. आठवण करून दिलीस त्याबद्दल आभारी आहे."

Sunday, July 5, 2015

ठसा

आटपाटनगरीतल्या अनेक माणसांना एक गमतीदार सवय होती. दिसलेल्या, ऐकू आलेल्या, किंवा वाचलेल्या प्रत्येक गोष्टीवर आपला स्वतःचा ठसा असलाच पाहिजे असा त्यांचा समज होता, आणि त्याप्रमाणे ते वर्तन करत असत.
माझे बाबा सहा फूट उंच आहेत, असे लहानपणी वर्गमित्राने अभिमानाने सांगितले, की ऐकणा~याचे बाबा सहा फूट एक इंच उंच हमखास निघायचे.
चेंडू्फळीच्या खेळात देशाच्या कप्तानाचा त्रिफळा उडालेला दूरदर्शनवर पाहिला, की गल्लीतही चेंडू्फळी खेळता न येणारा माणूस लगेच म्हणायचा, "फळी सरळ ठेवून खेळला असता तर असे झाले नसते".
देशाच्या पंतप्रधानांनी शेजारच्या देशाच्या पंतप्रधानांबरोबर हस्तांदोलन करतानाचे छायाचित्र वर्तमानपत्रात पाहिले, की माणूस लगेच उद्गारायचा, "अरे, आगीबरोबर खेळू नये, येव्हढेपण कळत नाही?"
"आज काय गंमत झाली माहिती आहे?" असे म्हणून कोणी एखादी गमतीदार घटना सांगायला सुरुवात केली की त्याचे वाक्य मध्येच तोडून "आमच्या कार्यालयात पण काय घडले सांगू?" असे म्हणून ऐकणारा आपली गंमत सांगायचा.
शहरातल्या रस्त्यांवर आपापले ठसे म्हणून नागरीक आवडीप्रमाणे थुंकत, पानाच्या पिचका~या मारत, लघुशंका करत, प्रातर्विधी करत, आणि कचरा टाकत.
सार्वजनिक बसने जाताना विद्यार्थी पु्ढच्या आसनाच्या पाठच्या बाजूवर स्वतःचे नाव चाकूच्या पात्याच्या टोकाने कोरत किंवा न पुसल्या जाणा~या रंगाने लिहित. हेच विद्यार्थी शाळेच्या बाकड्यावरही हाच प्रयोग करत. पुढे प्रेमात पडले की त्या मुलीचे नाव आपल्या नावाबरोबर अशाच पद्धतीने लिहित. पुढेमागे पैसे असले तर प्रसिद्ध स्थळांना भेट देऊन त्या राष्ट्रीय ठेव्यांच्या भिंतींवरही हाच प्रयोग करत. तेव्हढे पैसे गाठीला नसले, तर गावाबाहेर वनभोजनाला जाऊन तिथल्या झाडांच्या बुंध्यांवर आपापली नावे कोरत.
जेव्हा इंटरनेटचा शोध लागला तेव्हा या सवयीचा नवा अविष्कार बघायला मिळू लागला. फेसबूकच्या दुस~याच्या भिंतीवर जाऊन त्यांच्या लिखाणावर ते आपापले शेरे लिहू लागले. त्यांचे ट्वीट आपल्या नावावर पुनः ट्वीट करू लागले. एखाद्या विचारवंताच्या लेखाचे विडंबन करून आपल्या नावावर प्रसिद्ध करू लागले. प्रसिद्ध व्यक्तींच्या नावावर खोटी खाती उघडून नाहीनाही तो मजकूर त्यांच्या नावावर प्रसिद्ध करू लागले. थोड्याशा लोकांना हॅकिंग करता यायचे ते मोठमोठ्या संकेतस्थळांना विद्रूप करू लागले.
स्वतःच्या कर्तुत्वावर आपले स्वतःचे असे काही निर्माण करण्यापेक्षा इतरांच्या निर्मितीवर आपला अनैतिक ठसा मारणे अनेक पटीने सोपे असते, हे सत्य त्या काळी लोकांना कसे उमजले कोण जाणे.

Friday, July 3, 2015

ब्रुहन्नडा

रविवार असल्यामुळे आटपाट नगर सुस्त होते. दुपारची जेवणे उशीरा झाली. गुरुजींना राजवैद्यांकडे चहासाठी बोलावले होते. गुरुजी आणि त्यांची भार्या सायंकाळी पाच वाजता राजवैद्यांकडे पोहोचले. चहापान झाल्यावर दोघांच्या भार्या बागेतली नव्याने लावलेली फुलझाडे बघण्यासाठी रवाना झाल्या. राजवैद्य आणि गुरुजी गप्पा मारायला बसले.
"काय वैद्यराज, काय खबरबात?" गुरुजींनी विचारणा केली. राजवैद्यांकडे नेहमी काहीतरी नवीन ऐकायला मिळायचे.
"अहो, तुमचा विश्वास बसणार नाही. महाभारतात होती तशी ब्रुहन्नडा आमच्याकडे पण घडली."
"हं?" गुरुजी म्हणाले.
"हे बघा, आमच्या रुग्णालयांत महासेन नावाचा तरुण, हुशार, उमदा वैद्य महाराजांनी सहवैद्य या पदावर नियुक्त केला. काही महिने त्याने व्यवस्थित काम केले. मग त्याने रजेची मागणी केली."
"हं."
"पण त्याचे रजेचे कारण काही वेगळेच होते. त्याला वंगदेशात जाऊन स्वतःवर शल्यक्रिया करून घेऊन पुरुषाची स्त्री व्हायचे होते."
"असे करता येते?"
"कठीण असते, पण ते शक्य आहे."
"पण का?"
"त्याच्या मते तो एका पुरुषाच्या शरीरात अडकलेली एक स्त्री होता. परमेश्वराची ती चूक त्याला दुरुस्त करून हवी होती."
"परमेश्वराची चूक?" गुरुजींच्या काही लक्षांत येईना. "बरे पण त्याच्या आईवडिलांची या गोष्टीला सम्मती होती?"
"छे हो! पण आजकालची मुले आईवडिलांचे आणि मोठ्या माणसांचे ऐकतात कोठे?"
"पण वंगदेशांत का? आपल्याकडे देशोविदेशीचे रुग्ण येत असतात, आणि या मुलाला बाहेर जावे लागावे?"
"आपल्या मानसोपचारतज्ञांनी त्याला मानसिकद्रुष्ट्या स्त्री आहे असे प्रमाणित करण्यास नकार दिला. मग त्याने ते प्रमाणपत्र आणि शल्यक्रिया वंगदेशात करायचे ठरवले."
"...." गुरुजींना बोलण्यासारखे काही सुचले नाही.
"त्याने शल्यक्रियेपूर्वी स्त्री संप्रेरके घेतली होती. अहो काय सांगू, जेव्हा मला या सर्व गोष्टींची कल्पना नव्हती तेव्हा एका रुग्णाच्या उपचारांच्या वेळी त्याचा माझ्या हाताला स्पर्श झाला, आणि परस्त्रीचा स्पर्श झाल्यासारखा मी शहारलो."
राजवैद्यांचा चेहरा बघून त्यांच्या बोलण्यांत जराही अतिशयोक्ती नव्हती हे गुरुजींच्या लक्षांत आले.
"कालच तो शल्याक्रियेतून बरा होऊन कामावर रुजू झाला. आजपासून मला महासेन न म्हणता महानंदा म्हणायचे असे त्याने सांगितले आहे. त्याच्या पगारपत्रकावरही तेच नाव यावे असे तो म्हणतो, पण ते येवढ्यात होणे कठीण दिसते."
"पण तो आता स्त्रीसारखा दिसतो का?" गुरुजींनी विचारले.
"सलवार कमीज घालून आला होता. हातात एक बांगडी होती. गळ्यात एक माळ होती. कानांत डूल होते."
"आणि स्त्रीसुलभ वर्तन?" गुरुजींनी विचारले.
"मुली कानावरचे केस हाताने कानामागे करतात तसे तो मधूनमधून करत होता. आणि एका शिकाऊ वैद्याने कामांत काही चूक केली, तेव्हा तो चिडून म्हणाला, 'नीट काम कर, नाहीतर मी तुला कसे नाचवून ठेवते बघ."
"आता पुढे काय होणार?"
"तो नोकरी सोडून कोठेतरी जाणार आहे. पण इतर समस्या आहेतच. कलिंगातून एका ग्रुहस्थाची तक्रार आली आहे. या वैद्याने त्या ग्रुहस्थाच्या मुलाला आपल्याबरोबर रहाण्यासाठी सळो की पळो करून टाकले आहे. पत्रे पाठवणे, संदेश पाठवणे, दूरध्वनी करत राहाणे... तो आमच्या रुग्णालयांत असेच वर्तन करतो का ते त्या ग्रुहस्थाने माहिती अधिकाराच्या कायद्यांतर्गत विचारले आहे."
गुरुजींनी कपाळाला हात लावला.

Thursday, June 25, 2015

उलटतपासणी

आटपाट नगरीच्या राजाने गुरुजींवर एक महत्वाचे काम सोपवले होते. राजाच्या एका रुग्णालयामध्ये शिक्षण घेणा~या काही विद्यार्थिनींनी तेथील काही पुरुषांविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या तक्रारी केल्या होती. त्या गोष्टीची प्राथमिक चौकशी करण्याचे काम राजाने त्या रुग्णालयामधील व्यक्तींवर सोपविले होते. पण आपला विश्वासू माणूस त्या वेळी हजर असावा असे राजाला वाटत होते. म्हणून त्याने ही जबाबदारी गुरुजींवर सोपविली होती. गुरुजींना तेथे निरीक्षक म्हणून उपस्थित रहायचे होते.
आरोपींमध्ये काही विद्यार्थी होते, तसेच काही वैद्यही होते. चौकशीचे काम तेथील दोन वरिष्ठ वैद्य आणि एक प्रशासक स्त्री मिळून करत होते. प्रशासक बाई न्यायशास्त्रांतही निपूण होत्या. चौकशी पद्धतशीरपणे चालू होती. होता होता एका विध्यार्थ्याची चौकशी सुरू झाली. त्याच्यावरचे आरोप तर फारच गंभीर होते.
"तो कामावर येतो तेव्हा त्याच्या तोंडाला सिगारेट आणि दारूचा वास येतो" पीडीत विद्यार्थिनीने चौकशी समितीला सांगितले. "त्यामुळे त्याच्याबरोबर काम करायची भिती वाटते. त्याने मला एकदा सनी लिओनीचा फोटो पाठवला."
"तुझ्या चलत दूरध्वनी यंत्रावर तो फोटो असेल ना?" बाईंनी विचारले.
"ते यंत्र मोडले" असे ती मुलगी म्हणाली.
"हरकत नाही. तुला दूरध्वनी सेवा पुरवणा~या सेवादात्याच्या सर्वरवर त्याची नोंद असेल" वरिष्ठ वैद्य म्हणाले.
गुरुजींना सिगारेट आणि दारू या शब्दांचा अर्थ समजला, पण ते सनी लिओनी काय ते समजले नाही. निरीक्षक असल्यामुळे आणि अज्ञान प्रकट करायची लाज वाटल्यामुळे ते गप्प राहिले. जेव्हा हा आरोपी विद्यार्थी चौकशीला सामोरे जाण्यासाठी आला, तेव्हा त्याला प्रशासक बाईंनी विचारले,
"तू सिगारेट ओढून कामावर येतोस असा तुझ्यावर आरोप आहे" प्रशासक बाई म्हणाल्या.
"मी? छे!" तो निष्पाप चेह~याने म्हणाला.
"तू दारू पिऊन कामावर येतोस असाही तुझ्यावर आरोप आहे" प्रशासक बाई म्हणाल्या.
"मी आणि दारू?" तो म्हणाला, "कदापी नाही."
"तुझे हात आत्ताही थरथरतायत" प्रशासक बाई म्हणाल्या.
त्याचे हात थरथरत होते हे गुरुजींनी तो येऊन स्थानापन्न झाला तेव्हाच पाहिले होते. हात थरथरण्याचे एक कारण दारू पिणे असते हे त्यांना राजवैद्यांनी सांगितले होते ते त्यांना आठवले होते. त्याचे डोळे लाल आहेत का हे पण त्यांनी पाहून ठेवले होते.
"पण मी दारू पीत नाही" तो म्हणाला.
"तू त्या विद्यार्थिनीला सनी लिओनीचा फोटो पाठविलास असा आरोप आहे" प्रशासक बाई म्हणाल्या. हे म्हणतांना त्यांचा चेहेरा शरमेने काळवंडलेला आहे असे गुरुजींच्या लक्षांत आले. ते गप्पच राहिले. प्रश्न विचारण्याची ती वेळ नव्हती.
आरोपीने अचंभित चेहरा करून म्हटले, "कोणी, मी? छे छे. मी नाही."
सामान्यपणे निष्पाप माणसाचा असतो त्यापेक्षा खूपच जास्त प्रमाणात याचा चेहरा निष्पाप दिसतोय, असे गुरुजींच्या मनांत आले. तो बहुतेक निष्पाप असण्याचे बेमालूम नाटक करत असावा असे त्यांना वाटले. प्रशासक बाई तर हाडाच्या वकील होत्या. त्यांना तो संशय गुरुजींच्या आधीच आला होता.
"सनी लिओनी कोण?" त्यांनी त्या आरोपीला विचारले.
"सनी लिओनी?" त्याने अतिनिष्पाप चेह~याने विचारले. "माहित नाही."
"ठीक आहे, तू जाऊ शकतोस" असे बाई विचित्र चेहेरा करून म्हणाल्या.
"हे सनी लिओनी प्रकरण काय आहे?" असे तो आरोपी गेल्यावर गुरुजींनी विचारले. बाई गप्पच राहिल्या. पण वरिष्ठ वैद्यांनी उत्तर दिले,
"गुरुजी, कॅनडा नावाच्या विदेशातून या मूळ भारतीय वंशाच्या लिओनी नावाच्या बाई भारतवर्षांत चलतचित्रपटांत काम करण्यासाठी आलेल्या आहेत. पूर्वी त्या मोठ्या माणसांसाठी असणा~या चित्रपटांत (ज्याला आजकाल सेक्स मुव्ही असे म्हणतात) काम करत असत. गेल्या वर्षी त्यांना भारतवर्षांतील चित्रपटांत काम करणारी सर्वात मादक नटी म्हणून जनतेने मला वाटते एसेमेस आणि इंटरनेटवरील कौलातून निवडून दिले होते. तुम्ही इंटरनेट वापरत नसाल, पण वर्तमानपत्रपण वाचत नाही असे दिसते."
"अं.." गुरुजी पुटपुटले. हा विषय त्यांना तितकासा योग्य वाटला नव्हता, आणि एक स्त्रीच्या समोर त्यावर बोलणे तर त्यांना फारच अवघड वाटत होते. तो आरोपी धादांत खोटे बोलत होता याचा सर्वांत मोठा पुरावा म्हणजे सनी लिओनी कोण हे त्याला माहित नव्हते असे तो म्हणाला, आणि ते प्रशासक बाईंनी उलटतपासणीत अचूक पकडले हे मात्र त्यांच्या ध्यानांत आले.

Thursday, June 11, 2015

शेजा~यांची बोगनवेल

काही कामानिमित्त आमच्या मजल्यावरच्यांच्या घरी जाण्याचा योग आला. काम पार पडल्यावर आमच्या सज्जातल्या बागेबद्दल बोलणं सुरू झालं.
"आमच्या सज्जातून तुमच्या बोगनवेली इतक्या छान दिसतात म्हणून सांगू" शेजारी म्हणाले.
"बघू तरी" असं म्हणून मी त्यांच्या सज्जाबाहेर डोकवलो.


गुलाबी, पांढरी आणि अबोली रंगांची बोगनवेलीची आमची फुले आमच्या घरांतून दिसतात त्याहून जास्त सुंदर दिसत होती. सोबतच्या फोटोत आमच्या शेजारांच्या सज्जाखाली लावलेले ग्रिल दिसते आहे, ज्यामुळे  बोगनवेली संपूर्णपणे दिसत नाहीयेत. नुसत्या डोळ्यांनी बघताना नजर झाडांवर स्थिरावलेली असल्यामुळे गज द्रुष्टीस जाणवत नव्हते आणि फुलांचे सौंदर्य जास्तच खुलून दिसत होते.
"तुमची फुले बघून आम्ही बाजारांत मिळतील त्या सर्व रंगांच्या बोगबवेली आणून लावल्या आहेत" शेजारी म्हणाले. छोट्याशा हरित क्रांतीची ही सुरुवात तर नव्हे?

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क