Sunday, November 29, 2015

कुत्र्याची उपमा

आटपाट नगरच्या राजाने आपल्या रुग्णालयांचा प्रमुख कार्यकारी अधिकारी म्हणून प्रथेप्रमाणे  दरबारातील सर्वात वयोव्रुद्ध व्यक्तीला नेमले होते. या नेमणूकीत ज्ञान किंवा कार्यक्षमता यापेक्षा जास्त सेवाकाळ पदरी असणे आणि राज्यांतील राजाकारण्यांच्या मर्जीत असणे ह्या गोष्टी जास्त महत्वाच्या असत. त्यामुळे कूपनलिका खोदणारी (ज्याला आंग्लभाषेत one who drills a borewell असे म्हणतात) व्यक्ती या पदावर विराजमान झाली होती. जरी तिचा वैद्यकशास्त्राशी काडीचाही संबंध नव्हता आणि त्याचे कणभरही ज्ञान नव्हते तरी ही व्यक्ती आपण म्हणजे कोण अशा अविर्भावात वागत असे, आणि अतिशय कुशल व ज्ञानी अशा व्यक्तींवर मोठमोठ्या आवाजांत ओरडून त्यांचा पाणउतारा करत असे. शिक्षणकाळात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळविण्याची पात्रता नसल्यामुळे तिला कूपनलिका खोदणे हे काम अंगिकारावे लागले होते. आता प्रथितयश वैद्यांचा पाणउतारा करून ती स्वतःचे श्रेष्ठत्व स्वतःला आणि इतरांना सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असे रुग्णालयांतले लोक न्हणत असत.
त्या दिवशी राजवैद्य रुग्णालयाच्या मार्गिकेतून जात असतांना खालील संंभाषण त्यांच्या कानांवर पडले.
"मी माझ्या बदलीसाठी रुग्णालयाप्रमुखाच्या कार्यालयांत गेले होते. प्रमुख तर कोणत्यातरी पूजेसाठी की उद्घाटनासाठी गेले होते. मग मी त्यांच्या स्वीय सहायकाना भेटले. ते म्हणाले की त्यांच्या हातात काहीच नव्हते. ते प्रमुखांबरोबर आपण होऊन काही बोलायलाही जात नसत कारण ते कुत्रासारखे वागायचे."
"वाईट माणसे कुत्र्याला वागवतात तसे की कुत्रा वागतो तसे?"
"कुत्रा भुंकतो आणि अंगावर येतो तसे".
"अरे अरे. विनाकारण श्वानवंशाची बदनामी केली ना?"
राजवैद्य चपापले. प्रमुखांबद्दल कर्मचारी असे उघडपणे बोलतात तर, आपण बोलतो त्या विषयाचा गंधही नसताना हेच प्रमुख एकदा राजवैद्यांसारख्या ज्ञानी व्यक्तीच्या अंगावरही असेच भुंकले होते ते त्यांना आठवले. त्यानंतर त्यांनीही प्रमुखांना टाळणेच पसंत केले होते.मूर्खाच्या नादी न लागण्यात शहाणपणा असतो हे त्यांना माहीत होते.
"प्रमुख असे वागतात म्हणून सर्व जण कंटाळले आहेत" संभाषण पुढे चालू होते. "त्यांचा सेवानिव्रुत्तीचा दिवस कधी येतो त्याची प्रतीक्षा करत आहेत. कधी कधी तर वाटते की ते काहीतरी होऊन पटकन मरून गेले तर बरे."
राजवैद्यांना हेही नवे होते. कोणाच्या सेवानिवॄत्तीची किंवा मरणाची लोक वाट बघतात हे त्या व्यक्तीला अगदी लांछनास्पद आहे असे त्यांच्या मनात आले. ते दोघे जण त्यानंतर आपल्या मार्गाने गेले, त्यामुळे पुढील संभाषण राजवैद्यांना ऐकू आले नाही. येव्हढ्या लोकांचे शिव्याशाप स्वतःतील कमतरतेमुळे घेण्यापेक्षा मरून जाणे वरे असे त्यांच्या मनांत आले. 

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क