आपत्कालीन उपचारांसाठी रुग्णालयातील नवा विभाग सुरू झाला तेव्हा तिथे सगळी मोकळी जागा होती. एखाद्या प्रगत राष्ट्रातील प्रगत रुग्णालयासारखे ते दिसत होते. ते प्रगत होते यात काही शंकाच नाही. या रुग्णालयाच्या आवारात आपण असतो तेव्हा आपण एखाद्या प्रगत राष्ट्रात असतो, असे मी आमच्या निवासी डॉक्टरांना नेहमीच सांगत असतो. हळूहळू हा विभाग भरत गेला. अतिदक्षता विभागात खाटा उपलब्ध नसल्या की आमचे अत्यवस्थ रुग्ण या आपत्कालीन विभागाच्या अतिदक्षता विभागात ठेवावे लागतात. गेल्या काही दिवसांत असे बरेच रुग्ण आले. त्यांना पहाण्यासाठी खूप वेळा तेथे जावे लागले. दाटीवाटीने मांडलेल्या खाटा, दोन खाटांच्या मध्ये ठेवलेल्या रुग्णांना इतरत्र नेण्यासाठी असणा~या ट्रॉल्या आणि त्यांच्यावर ठेवलेले रुग्ण, तश्याच स्थितीत त्यांना लावलेले वेंटिलेटर, त्यांचे असंख्य नातेवाईक, या गर्दीत तुलनेने अगदी अल्प असणारी डॉक्टरांची आणि परिचरिकांची संख्या बघून धक्का बसला. गेल्या काही वर्षांत लोकसंख्या इतकी वाढली आहे, की गरीबांची संख्या इतकी वाढली आहे आणि त्यामुळे इतके रुग्ण येथे आले आहेत हे लक्षात येईना. एका टेबलाजवळ दोन तरुण डॉक्टर बसून येणा~या रुग्णांना बघत होते. अतिशय गंभीर आजार असणा~या इतक्या रुग्णांना ते कसे उपचार करणार हे मला कळत नसले तरी ते इतके दिवस हे काम कुशलतेने करत आहेत, त्या अर्थी सारे काही ठीक असणार असे धरून चालायला हरकत नव्हती. जागा, डॉक्टर आणि परिचारिका यांची संख्या खूपच वाढविली पाहिजे हे प्रशासनाला कळत नसावे, कळत असले तर वळत नसावे, त्यांच्याकडे आवश्यक निधी नसावा, आणि असलाच तर त्याचा विनियोग इतरत्र करण्याचे ब्रुमनपाने ठरवले असावे. काही असो, ही गरज पूर्ण होणार नाही हे नक्की. इतक्या कठीण परिस्थितीत कुशलतेने रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करणा~या त्या तरुण पिढीच्या डोक्टरांना आणि परिचारिकांना सलाम.
आयुष्यात अनेक प्रकारची माणसे भेटली आणि अनेक प्रकारचे प्रसंग घडले. काही चांगले, काही वाईट. त्यांतल्या लक्षात रहातील अशा व्यक्ती आणि घटना येथे मांडल्या आहेत. समोर येणा~या अडचणींतून मार्ग काढतांना बरंच काही शिकायला मिळालं. तेही लिहिलं आहे. त्यांतून माझा स्वतःचा मोठेपणा दाखविण्याचा हेतू बिलकूल नाही. इंटरनेटवर असलेली माहिती जगाच्या पाठीवर असणा~या कोणालाही घेता येते म्हणून हा सगळा प्रपंच. त्यांतले बरे वाटेल ते घ्या. जर त्यातून कोणाचा फायदा झाला तर हा सगळा खटाटोप सार्थकी लागला असे मला वाटेल.