Sunday, May 24, 2015

आत्महत्येचे झाड

सेर्बेरा ओडोलम असे शास्त्रीय नाव असणारे एक झाड सामान्यपणे 'आत्महत्येचे झाड' या नावाने ओळखले जाते. मल्याळम मध्ये त्याला ओथलंगा असे म्हणतात. मध्यंतरी खेळाडूंच्या प्रशि्क्षणाच्या ठिकाणी काही मुलींनी या झाडाची फळे आणि बिया खाऊन आत्महत्या केली तेव्हा ते वर्तमानपत्रांतून आणि टीव्हीवरून लोकांसमोर आले. हे झाड केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येते. ते मुम्बईत आढळून येईल असे वाटले नव्हते. पण जेव्हा त्याचा फोटो वर्तमानपत्रांत पाहिला, तेव्हा लक्षात आले की कित्ये्क वर्षे आपल्या घरासमोर आहे ते झाड हेच होय. या झाडाला सहा सात फळांचे घड लागत. कच्ची असतांना ती फळे कै~यांसारखी दिसत. पिकले की ती लालभडक होत. शेवटी ती काळी पडत. सार्वजनिक जागेतल्या झाडांवर चढून त्यांची फळे बिनदिक्कतपणे चोरणारी पोरे आणि बाप्ये या फळांना हातही लावत नसत. पोपट आणि कावळे त्यांच्या जवळपासही फिरकत नसत. खाली असलेल्या फोटोत हिरवी फळे मध्याच्या थोडी वर दिसत आहेत, तर गेल्या वर्षीची काळ्या रंगाची फळे डावीकडील वरच्या कोप~यात दिसत आहेत.


"ती फळे इतकी कडक असतात की ती फक्त गरुडालाच खाता येतात" असे कामवाल्या बाईने आम्हाला सांगितले होते, जे मला खरे वाटले नव्हते. आता त्याच्या बियांमध्ये सेर्बेरिन नावाचे विष असते आणि त्याचे सेवन केले असता ह्रुदयावर डिजिटॅलिस सारखा परिणाम होऊन ह्रुदयाची स्पंदने बंद पडतात आणि माणूस मरतो हे समजले. पक्ष्यांना नैसर्गिकरित्या किती ज्ञान असते ते पाहून मन थक्क झाले. झाड १५ मीटर उंच असते आणि मला झाडावर चढण्याची सवय नाही म्हणून मी वाचलो. नाहीतर त्या फळांचा लाल भडक रंग बघून एक तरी फळ खाऊन बघावे असे मला कित्येक वर्षे वाटत आले होते.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क