Monday, May 18, 2015

अब्रूवर घाला

फार फार वर्षांपूर्वी आट पाट नगर होते. नगराचा राजा मोठा द्रष्टा होता. नगरवासी माणसे ही आपली लेकरेच आहेत आणि त्यांच्या हिताचे रक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे असे त्याचे ठाम मत होते. त्यांच्या भल्यासाठी त्याने अनेक गोष्टी केल्या. त्यांतील एक म्हणजे त्यांच्यासाठी एक सुसज्ज रुग्णालय बांधणे. हे रुग्णालय त्याने इतके सुरेख बनविले, की तिथे उपचार करून घेण्यासाठी देशोदेशीचे रुग्ण येऊ लागले.
दुर्दैवाने येणारे सगळेच रुग्ण सुसंस्क्रुत नसत. बरेच जण शाळेत गेलेले नसत. गेलेच तर त्या शाळेत सामाजिक वर्तन वगैरे शिकवत नसत. शिकवले असले तरी त्या वेळी टपोरीगिरी करणे, मस्ती करणे, गप्पा मारणे इत्यादी गोष्टींत काल व्यतीत केल्यामुळे त्यांच्या सामाजिक वर्तनात बरीच त्रुटी राहून जात असे. घरातला कचरा बिनदिक्कतपणे रस्त्यावर टाकणे, रस्ताने जाताना नाकातोंडावर रुमाल न धरता शिंकणे आणि खोकणे आणि खाकरा रस्त्यावरच थुंकणे, नाक रस्त्यावरच शिंकरणे आणि हात दिव्याच्या खांबाला पुसणे, तांबुलपत्र चर्वण करून त्याच्या पिंका कोनाड्यांत आणि रुग्णालयाच्या भिंतींवर मारणे अशा प्रकारचे वर्तन ते नित्यनियमाने करत असत, आणि त्यांत काही वावगे आहे असे त्यांना अजिबात वाटत नसे. या घाणीमुळे आपल्या आप्तेष्टांचे आजार बळावतात याची त्यांना जाणीव नसे. अरे, असे करू नका असे कोणी म्हटले तर 'अरे ला कारे' करणे हा त्यांचा धर्म झाला होता. काही जण तर शिवी्गाळी आणि मारहाणी करायचे. रुग्णालयात नेमलेल्या सुरक्षारक्षकांनाही ते जुमानत नसत.
एके दिवशी दोन स्त्रिया आपल्या आप्ताला भेटण्यासाठी रुग्णालयात आल्या. त्यांनी बरोबर आणलेल्या खाद्यपदार्थांचे वेष्टन जमिनीवर टाकले. सुरक्षारक्षकांनी त्यांना असे करताना पाहिले व हटकले. गुन्हा कबूल करण्याऐवजी त्या दोघी उलट भांडायला लागल्या. आपण असे काही केलेच नाही असे त्या म्हणाल्या. सुरक्षारक्षकांनी आपली क्षमा मागावी, अन्यथा आपण कोतवालाकडे जाऊन सुरक्षारक्षकांनी आपला विनयभंग केला अशी तक्रार करू आणि त्यांना तुरुंगात डांबू अशी त्यांना धमकी दिली. स्त्रियांच्या अब्रूवर कोणी घाला घालू नये म्हणून राजाने केलेल्या कायद्याचा गैरवापर करणे हाही आपला हक्कच आहे असे त्यांना वाटत असावे. सुरक्षारक्षक सटपटले. त्यांनी रुग्णालयाच्या मुख्याला बोलावले. मुख्य हुशार होता. समजुतीने बोलून काही फायदा होत नाही हे पाहून त्याने बंदचक्रमुद्रण (ज्याला हल्ली क्लोज्ड सर्किट टीव्ही असे म्हणतात) सर्वांसमोर त्या दोघींना दाखविले. सत्य बाहेर आले. दोघींची वाचा बसली. अवाक्षर न काढता दोघी वळल्या आणि निघून गेल्या.
"दंड न करता त्यांना जाऊ द्यायला नको होते" असे सुरक्षारक्षक म्हणाले.
"तुरुंगात जाण्यापासून वाचलात त्याचा आनंद माना. बंदचक्रमुद्रण नसते तर तेही झाले असते. महाराजांनी रुग्णालय बनवले ती मोठी चूक केली असे आता वाटते आहे."
"माझा संबंध नसताना बोलतो म्हणून माफ करा" हा सर्व प्रकार बघणारा एक साधूपुरुष म्हणाला. "आपण म्हणता ते मला योग्य वाटत नाही. अशा प्रकारची तामस विचार आणि वर्तणूक असणारी माणसे असतात म्हणून सत्कर्म करणे सोडून द्यायचे नसते. ज्यांच्यासाठी सत्कर्म करावयाचे त्यांची लायकी आहे की नाही यावर सत्कर्म करावयाचे की नाही हे अवलंबून नसते. सत्कर्म करणे हा आपला धर्म आहे म्हणून ते करावयाचे असते."
"साधू महाराज!" असे म्हणून सुरक्षारक्षक आणि मुख्य यांनी साधूपुरुषाला दंडवत घातला.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क