Wednesday, May 6, 2015

Toddler With A Greenback

मी जराशा घाईत होतो. बाह्यरुग्णविभागात नेहमीपेक्षा जास्त रुग्ण आले होते, आणि त्यांना तपासताना वेळ गेला होता. विभागाचे कार्यालय बंद होण्यापूर्वी काही कागदपत्रांवर सह्या करून ते जावक करणे गरजेहे होते, नाहीतर काही कामे उगाचच अडून पडली असती. रुग्णांच्या कक्षांमधून जात होता. रुग्णांचे नातेवाईक कक्षांबाहेर उभे होते, बाकड्यांवर किंवा जमिनीवर बसलेले होते, किंवा इथेतिथे फिरत होते. रस्त्यांत एक या मंडळींसाठी चहा-कॉफीचा स्टॉल होता, जिथे थोडी गर्दी होती. त्यामुळे तेथून जातांना माझा वेग इच्छा नव्हती तरीही मंदावला. तेव्हढ्यात एक नुकतेच चालायला लागलेले वर्षाच्या आंतले मूल दुडदुड चालत माझ्या रस्त्यांत आले. त्याच्या हातांत शंभर रुपयांची एक नोट होती. ती दोन्ही हातांत पकडून ते मूल त्या चहा-कॉफीवाल्याकडे निघाले होते. बहुतेक त्याला तिथली बिस्किटे हवी होती. ती विकत घ्यावी लागतात हे त्याला कोणीतरी शिकविलेले असावे. मूल गरीबाचे दिसत होते.
"अरे, हे बाळ कोणाचे आहे?" मी जरा मोठ्या स्वरांत विचारले. "त्याच्या हातांत पैसे आहेत. ते कोठेतरी पडतील किंवा कोणीतरी ते काढून घेईल."
"ते माझे आहे" असे म्हणून जमिनीवर बसलेला एक किरकोळ अंगयष्टीचा माणूस उठला. त्याने जाऊन त्या मुलाचा हात धरला आणि त्याला आपल्या बसायच्या जागी नेले. मुलाला ते आवडले नाही. हात खेचून आणि अंग मागे टाकून त्याने आपला निषेध व्यक्त केला.
"आईच्या औषधाचे पैसे आहेत ते बाळा" तो माणूस म्हणाला. बाळाला ते बहुधा ते कळले नसावे. पण आईचे नाव ऐकून त्याला आईची आठवण आली असावी. पैसे विसरून ते आईला नजरेने शोधू लागले. आई जवळच्या कक्षांत रुग्णशय्येवर आहे हे कळण्याचे त्याचे वय नव्हते. शंभर रुपये मोडून बाळाला बिस्किटे-चॉकलेटे घेण्याची त्याच्या बडिलांची ऐपत दिसत नव्हती. त्याच्या आईचा आजार बरे करणे डॉक्टरांच्या हातात होते, पण त्यांची गरिबी दूर करणे रुग्णालयांतल्या कोणाच्याच हातांत नव्हते. रस्त्यांत आलेले मुळ दूर झाले होते, रस्ता मोकळा होता, काम शिल्लक होते, पण मन थकले होते आ्णि पावले जड झाली होती. नजरेसमोरून ते निष्पाप मूल आणि त्याचे मनाला जाणवणारे भविष्या हटत नव्हते.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क