Friday, May 22, 2015

पानाफुलांचा भक्षक

मध्यंतरी आमच्या सज्जातल्या बागेत एक रॉबिन पक्षी यायचा. त्याला पांढर~या जास्वंदाच्या पाकळ्या खायला खूप आवडायच्या. बरे एक फूल पूर्णपणे खाऊन झाल्यावर दुसरे खायला घेतले तर ठीक होते. पण हा पठ्ठ्या प्रत्येक फुलाचा थोडा थोडा भाग खायचा. शेवटी संध्याकाळी देवाला घालायला अखंड असे फूलच रहायचे नाही. जर एखादे फूल लोखंडी जाळीच्या (ग्रिलच्या) आतल्या बाजूला असले तर मात्र ते त्याच्या तावडीतून वाचायचे. एके दिवशी मी नेहमीपेक्षा करा लवकर देवाला फुले वाहिली. रॉबिन त्यानंतर हजर झाला, तेव्हा झाडावर एकही फूल शिल्लक नव्हते. त्याला त्या गोष्टीचा कोण राग आला. बराच वेळ तो इथे तिथे करत जोरजोराने त्याच्या भाषेत बडबड करत होता. शेवटी सूर्यास्त जवळ आला तेव्हा तो गेला. नंतर काही दिवस तो आला आणि मग यायचा बंदच झाला. बहुधा त्याने स्तलांतर केले असावे. काही दिवस फुले अखंड राहिली. मग परत पाकळ्यांचे मोठे मोठे तुकडे अद्रुश्य व्हायला लागले. रॉबिन परत आला वाटते असे आमच्या मनांत आले. पण तो पूर्वीसारखा फुले खाताना दिसायचा मात्र नाही. बोगनवेलीची कोवली पानेसुद्धा खाल्लेली दिसू लागली. पण पानांवर कीड काही कोठे दिसली नाही. अकस्मात एक दिवस झाडांना पाणी घालताना मला आश्चर्याचा धक्का बसला.
फुलाची पाकळी (लाल बाण) नेणारा भुंगा (काळा बाण).

बोगनवेलीची अर्धवट खाल्लेली पाने (काळा आणि लाल बाण)

एक मोठा भुंगा फुलाची एक मोठी पाकळी तोंडात धरून झाडाच्या पानांमधून उडत चालला होता. पाकळी आणि पानांना पडलेली भोके एकाच आकाराची होती. हा भुंगा फुले आणि पाने फस्त करत होता, आणि आम्ही बिच~या रॉबिनला दोष देत होतो. काही दिवसांनी भुंगा यायचा बंद झाला. त्यानंतर फुले आणि पाने अखंड राहू लागली. भुंगा वयापरत्वे मेला, त्याला कोणी खाल्ले, की त्यानेही स्थलांतर केले हे एका परमेश्वराला माहीत.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क