Showing posts with label मॅनेजमेंट. Show all posts
Showing posts with label मॅनेजमेंट. Show all posts

Wednesday, November 11, 2015

क्रुतीशीलता

"गुरुजी, नवे वारे वाहू लागले आहेत हो" आटपाटनगरच्या राजाच्या रुग्णालयांतील राजवैद्यांनी जाहीर केले. "आमचे जुने ठोकताळे आता बहुधा मागे पडणार."
गुरुजी राजवैद्यांना चांगले ओळखत होते. ते जरा तिरकस बोलत आहेत हे त्यांच्या लगेच लक्षांत आले.
"ते कसे काय?" गुरुजींनी विचारले.
"पूर्वीसारखे र्वैद्यकशास्त्र आले की झाले असे हल्ली उरले नाही. नव्या दमाचे वैद्य आणि जुन्या दमाचे पण केस काळे केलेले वैद्य व्यवस्थापन वगैरेच्या कार्यशाळा करून येतात. क्रुतीशीलता (ज्याला management मध्ये proactivity असे म्हणतात) वगैरे मुळे रुग्णांवर उपचार अधिक कुशलतेने करता येतात असे ते म्हणतात."
"म्हणजे काय ते नीटसे कळले नाही" गुरुजी म्हणाले.
"गुरुजी, क्रुतीशीलता म्हणजे पुढे काय होणार याचा विचार करून आधीच योग्य ती पावले उचलणे. अतिशय योग्य अशी संकल्पना आहे ती. आता आमच्या क्रुतीशील वैद्यांनी काय केले ते पहा. आमच्या एका रुग्णाला आंतडे अडकण्याचा विकार झाला होता. ती दोन महिन्यांची गर्भार पण होती. शल्यक्रिया करून तिचे आंतडे सोडवावे अशी विनंती आम्ही शल्यक्रिया करणाऱ्या वैद्यांना केली. पण त्यांनी कार्यवाहीत विलंब केला. तिला जंतूसंसर्ग झाला. रक्तांत दोष निर्माण झाला आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबली (ज्याला disseminated intravascular coagulation किंवा DIC असे म्हणतात). पोटात गर्भाचा म्रुत्यू झाला तरीही हा विकार होऊ शकतो. पण तिला तो विकार आधी झाला आणि नंतर तिच्या गर्भाचा म्रुत्यू झाला. कालांतराने तिची शल्यक्रिया झाली पण ती दगावली. माताम्रुत्यू अन्वेषणाच्या वेळी शल्यक्रिया करणऱ्या वैद्यांनी असा मुद्दा माडला की गर्भाच्या म्रुत्यूमुळे तिला तो रक्ताचा विकार झाला. आणि त्यामुळे ती दगावली."
"यांत क्रुतीशीलता कोठे आली? उलट निष्क्रियता दिसून आली" गुरुजी म्हणाले.
"गर्भ म्रुत झाल्यावर पांच आठवड्यांनी हा रक्ताचा विकार होतो. या रुग्णामध्ये आता गर्भ मरेल अशी परिस्थिती आली आणि शल्यक्रिया करणारे वैद्य क्रुतीशील असल्यामुळे हा रक्ताचा विकार आधीच झाला. निदान असे त्यांच्या म्हणण्यावरून वाटते. हे क्रुतीशीलतेचे उदाहरण असावे" राजवैद्य म्हणाले. "मी भरल्या बैठकीत तसे सर्वांसमोर म्हणालो देखील."
"मग ते काय म्हणाले?"
"काही नाही. गप्प बसले."
(Keywords: proactivity in medicine)

Saturday, September 12, 2015

सातवा वेतन आयोग

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयात मानसिक हल्लकल्लोळ झाला. कोणा एका वरिष्ठ वैद्याच्या व्हॉ्ट्सॅपवर नवा संदेश आला. तो सातव्या वेतन आयोगाबद्दल होता. सरकारी कर्मचा~यांचे वेतन ठरविण्यासाठी सरकार वेतन आयोग नेमत असे. आतापर्यंत असे सहा वेतन आयोग होऊन गेले होते. आता सातव्या वेतन आयोगाचे काम चालू होते. वरिष्ठ  वैद्यांनी त्याचे स्वतः वाचन करून झाल्यावर परत इतरांसाठी सामूहीक वाचनही केले.
"आपला पगार वाढवून मिळण्यासाठी आता सातवा वेतन आयोग येणार आहे. आता आहे त्यापेक्षा वेतन तर जास्त मिळेल. त्यामध्ये वैद्यांच्या सेवानिव्रुत्तीच्या वयाची अट समाविष्ट आहे. ज्या दिवशी आयोगाच्या अटी लागू होतील त्या दिवशी ज्यांचे वय ५० असेल ते सर्व वैद्य सेवानिव्रुत्त होतील."
फक्त तरुण वैद्य सोडले तर सर्वच वैद्यांचे वय ५० च्या वर होते.
"असे झाले तर सर्व वरिष्ठ आणि मधल्या फळीतले वैद्य सेवानिव्रुत्त होतील" एक वैद्य म्हणाले. "मग राजाचे रुग्णालय चालविणार कोण?"
"जर वरिष्ठ वैद्य नसतील तर रुग्णालयाची आणि त्याला जोडलेल्या महाविद्यालयाची मान्यता रद्द होईल" दुसरे एक वैद्य म्हणाले. "मग तरुण वैद्यांची नोकरीही जाईल."
"आजकाल माणसाचे आयुर्मान ८० पर्यंत वाढले आहे. जर मी सेवानिव्रुत्त झालो तर उरलेली ३० वर्षे मी काय करायचे?" तिसरे एक वैद्य म्हणाले.
"बायकोचे डोके खायचे" एक कनिष्ठ वैद्य पुटपुटले. "आमच्या मागची कटकट त्या बिचारीच्या मागे लागेल."
हा सर्व हल्लागुल्ला चालू होता तेव्हढ्यात दुस~या विभागाचे एक वैद्य आले. त्यांच्या व्हॉ्ट्सॅपवर एक वेगळाच संदेश आला होता. तो त्यांनी वाचून दाखविला.
"सातव्या वेतन आयोगानुसार जेव्हा तो लागू होईल तेव्हा ज्यांचे वय ६० असेल किंवा ज्यांची सेवा ३३ वर्षे झाली असेल ते सर्व सेवानिव्रुत्त होतील."
दहा वर्षे वाढवून मिळतील असे दिसले तरीही वैद्यांचे समाधान होईना.
"आयुर्विज्ञान परिषद म्हणते की वैद्यांचे सेवानिव्रुत्तीचे वय ७५ करा. महाराजांच्या नियमाप्रमाणे आपले सेवानिव्रित्तीचे वय ६२ आहे. ते वाढवायचे की कमी करावयाचे?" ६२ वे वर्ष पूर्ण व्हावयास थोडेसे महिने उरलेले एक वैद्य म्हणाले.
"अजून ४ वर्षांचा सेवाकाळ शिल्लक आहे म्हणूना मी मोठे ग्रुहकर्ज घेतले आहे. आता मी सेवानिव्रुत्त झालो तर मी ते कर्ज फेडणर कसे?" दुस~या एका वैद्यांनी विचारले.
राजवैद्यांकडून पूर्वनियोजीत सभेसाठी बोलावणे येईपर्यंत हे सर्व संभाषण उलट सुलट चालूच राहिले. इतका वेळ गप्प असण~या एक वैद्यांना दुस~या वैद्यांनी विचारले, "आपले मत आपण मांडले नाही?".
"आयोगाचा कार्यकाळ अजून चार महिने आहे. तो संपेल तेव्हा काय ठरले ते समजेल. तोपर्यंत कासावीस होण्याचा काहीही फायदा नाही. म्हणून मी गप्प आहे."

Sunday, August 16, 2015

सावळागोंधळ

आटपाटनगरच्या राजाच्या रुग्णालयांत कनिष्ठ वैद्यांच्या नियुक्त्या करावयाच्या होत्या. वर्तमानपत्रांतून जाहिराती झळकल्या आणि इच्छुकांनी उमेदवारी अर्ज प्रचंड संख्येने भरले. सुमारे पंधरा दिवस उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे काम चालू होते. राजवैद्य मुलाखती घेऊन अगदी थकून गेले होते. पण काम महत्वाचे होते. रुग्णालय चालविण्यासाठी वैद्यांची खूपच कमतरता जाणवत होती. त्यामुळे कुरकुर न करता राजवैद्यांनी सगळ्या मुलाखती पार पाडल्या होत्या. शेवटी निवडलेल्या वैद्यांच्या हातांत नियुक्तीपत्रे पडली आणि ते कामावर रुजू झाले. राजवैद्य आणि नवनियुक्त वैद्य असे सगळेच आनंदी झाले.
पण आटपाटनगरच्या सगळ्या गोष्टी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण होत नसत.
"राजवैद्य महाराज, अनर्थ घडला" एक नवनियुक्त वैद्य धापा टाकत आले आणि घाबरलेल्या स्वरांत म्हणाले.
"घाबरू नका. येथे बसा आणि काय झाले ते मला सांगा" राजवैद्य म्हणाले.
"राजवैद्य, आम्ही आमच्या आघीच्या नोक~या सोडून या वैद्यांच्या पदांवर रुजू झालो. आज दोन दिवस झाले. आज कार्यालयातून आम्हाला बोलावणे आले आणि त्यांनी आमची नियुक्तीपत्रे परत मागून घेतली."
"असे आजपर्यंत कधी झाले नाही" राजवैद्य म्हणाले. "त्यांनी काही कारण दिले का?"
"आजपर्यंत नियुक्तीनंतर फुरसतीने नवनियुक्त वैद्यांना कोतवालाकडून निष्कलंक असण्याचे प्रमाण्पत्र आणावे लागत असे. आता ते म्हणतात की आधी प्रमाणपत्र आणा आणि मगच तुम्हाला नियुक्त करण्यात येईल."
"पण याचा विचार त्यांनी आधीच केला नव्हता का?" राजवैद्यांनी विचारले.
"नसावा. त्यांना प्रमुख सचिवांनी नियमाप्रमाणे नियुक्त्या करायला सांगितले होते. तिकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आता प्रमुख सचिव रागावलेत."
"पण आता तुमची स्थिती 'ना घर का ना घाट का' अशी झाली आहे त्याचे काय? नवी नोकरी मिळाली म्हणून जुनी सोडली आणि नवी नोकरी मिळून झाल्यावर दोन दिवसांत गेली" राजवैद्य म्हणाले.
"आता आम्ही काय करावे ते काही सुचत नाही" नवनियुक्त वैद्य म्हणाले.
"महाराजांना भेटून बघा" राजवैद्यांनी सुचवले.
"तसे केले तर पुढे सचिव किंवा संचालक त्रास देतील अशी भिती वाटते" नवनियुक्त वैद्य म्हणाले.
"तुम्ही पूर्वी राजाच्या सेवेतच कनिष्ठ पदावर होता ना? तुमचे नियुक्तीपत्र काढून घेतले त्याची कार्यालयातील लिपिकाकडून सकारण पोचपावती घ्या आणि मग ती दाखवून त्या जुन्या पदावर परत रुजू व्हा. कोतवालाचे प्रमाणपत्र महिन्याभराने मिळाले की मग या पदावर तुमची नेमणूक होईल."
नवनियुक्त वैद्य राजवैद्यांचे आभार मानून गेले. राजवैद्य सुन्नपणे बसून राहिले. त्यांचे सहकारी वैद्य बाजूला बसून सारे संभाषण ऐकत होते.
"राजवैद्य, आपण असे गप्प का?" त्यांनी विचारले.
"कारभार ढिसाळपणे होतो आहे याची चिंता तर आहेच. पण सर्वच नवनियुक्त वैद्य पूर्वी महाराजांच्या सेवेत नव्हते. काहीजण परप्रांतांतून नोक~या सोडून आले होते. त्यांना आता जुन्या नोक~या परत मिळायच्या नाहीत. त्यांचे काय हा विचार मनाला छळतो आहे."

Monday, August 10, 2015

कालचक्रातून काढा वेळ


कालचक्र तर फिरतच रहाणार
कामाचा रगाडा तर कायमचाच आहे,
तरी पण


मोग~याचा सुगंध हुंगण्यासाठी मधून मधून थोडासा वेळ अवश्य काढा. नाहीतर आयुष्य नीरस होऊन जाईल.
(टीपः आमच्या घरी फुललेली फुले आहेत, म्हणून मोगरा दाखविला आहे. हुंगण्यासाठी मोगराच हवा असे नाही. आपल्या आवडीचे कोणतेही फूल चालेल.)

Monday, July 27, 2015

शल्यक्रिया करणार कोण?

आटपाटनगरचे राजवैद्य आणि गुरुजी दुपारच्या चहाच्या वेळी एकत्र भेटले.
"गुरुजी, या आठवड्यांत एक रुग्ण उपचारांसाठी आली होती. मी तिला तपासून शल्यक्रिया करून घेण्याचा सल्ला दिला. तिने शल्यक्रियेची संपूर्ण माहिती विचारून घेतली. मग म्हणाली 'माझी शल्यक्रिया आपणच करणार ना?'" राजवैद्य म्हणाले.
"मग आपण होय म्हटलेत?" गुरुजींनी विचारले.
"छे हो! होय कसे म्हणायचे? दिवसाला मोठ्या सहा आणि छोट्या दहा शल्यक्रिया होतात. प्रत्येक रुग्णाची शल्यक्रिया मीच केली तर त्या श्रमांमुळे मी मरून जाईन. आमच्याकडे मी सोडून बरेच वैद्य आहेत, जे शल्यक्रिया मोठ्या कौशल्याने करतात. प्रशिक्षणार्थी वैद्यही आहेत, जे आमच्या मदतीने सल्यक्रिया करतात आणि शिकतात. त्या सर्वांनी काय करायचे? बरे, हा काही आमचा खाजगी व्यवसाय नाही, की पैसे घेतले म्हणजे शल्यक्रिया आम्हीच केली पाहिजे. येथे सर्वांना निःशुल्क उपचार करून मिळतात. महाराजांचा नियमच आहे की असे आश्वासन कोणत्याही रुग्णाला द्यायचे नाही."
"मग आपण काय म्हटलेत?" गुरुजींनी विचारले.
'मी म्हटले की जर मी मोकळा असलो तर मी शल्यक्रिया करेन. जर तिच्यापेक्षा अधिक दुर्धर व्या्धी असलेला रुग्ण असला, तर त्याला माझी जास्त गरज असल्यामुळे मी त्याची शल्यक्रिया करेन. पण तिच्या शल्यक्रियेसाठी एक कुशल  वैद्य उपलब्ध असेल हे पहाण्याची जबाबदारी माझी."
"छान. मग तिचे समाधान झाले असेल" गुरुजी म्हणाले.
"छे हो! तिचे आपले एकच पालुपद, माझी शल्यक्रिया आपणच करा. ऐ्केच ना" राजवैद्य म्हणाले.
"मग आपण काय केलेत?" गुरुजींनी विचारले.
"मी म्ह्टले, बाई ग, तुझी व्याधी इतरांपेक्षा जास्त दुर्धर असावी अशी तुझी इच्छा आहे का? तसे निघाले, तरच मी तुझी शल्यक्रिया करू शकेन. मग ती शांतपणे निगून गेली. आज तिची शल्यक्रिया एका प्रशिक्षणार्थी वैद्याने माझ्या मदतीने यशस्वीपणे पार पाडली. ती आता आनंदात आहे."
"छान" गुरुजी म्हणाले.

Wednesday, July 1, 2015

विश्राम, विरंगुळा आणि व्यवसाय एका खिडकीत

महानगरपालिकेच्या नियमांप्रमाणे आजकाल इमारतीपुढील काही जागा मोकळी सोडावी लागते. आमच्या समोरच्या नव्याने बांधलेल्या इमारतीच्या तळमजल्याचे रस्त्यालगतचे गाळे दुकानांसाठी आहेत. प्रत्येक दुकानाच्या समोरच्या मोकळ्या जागेत त्या त्या दुकानाच्या साठी चौथरे बांधलेले आहेत. दुकानदारांनी त्यांच्यावर आपापल्या आवडीप्रमाणे फरशा बसवून घेतलेल्या आहेत. रात्री दुकाने बंद झाली की बहुधा दुकानदारांच्या परवानगीने माणसे तेथे झोपतात. त्यांना निवारा मिळतो, आणि दुकानांचे संरक्षण होते. त्यांतल्याच एका दुकानाची ही गोष्ट.


दुकान रददी आणि भंगार मालाचे आहे. त्यांतलीच काही वर्तमानपत्रे अंगाखाली अंथरून एक माणूस हल्ली तेथे रात्री झोपतो. चादर पावसाने भिजते. वर्तमानपत्रही भिजते, पण ते टाकून देता येते. चादर धुवावी लागते. त्यामुळे या काळात तो वर्तमानपत्रेच वापरतो. सकाळी उठला की अंगाखालची वर्तमानपत्रे काढून वाचतो. तासाभराने त्याची गि~हाइके आली की धोपटी उघडून सामान बाहेर काढतो आणि त्यांच्या दाढ्या करून देतो. तोपर्यंत भंगारवाला दुकान उघडायला येतो. मग हा न्हावी सामान धोपटीत भरतो आणि मार्गाला लागतो. रात्रीची विश्रांती, सकाळचा (बरोबर चहाचा कप नसला तरी) विरंगुळा, आणि नंतर व्यवसाय एकाच ठिकाणी करण्यात त्याने वापरलेली चतुराई ही सरकारच्या 'एक खिडकी योजनांच्या तोडीची वाटते. प्रिन्स चार्ल्सच्या नजरेला तो पडला, तर डबेवाल्यांचे त्यांनी केले तसे कौतुक ते याचेही करतील, आणि उद्या आय आय एम किंवा दुस~या एखाद्या मॅनेजमेंट स्कूलमध्ये त्याला व्याख्यान द्यायलाही बोलावतील.

Tuesday, June 9, 2015

कलियुगाची नांदी

आटपाट नगरीच्या राजाच्या रुग्णालयाची दुरुस्ती करण्याची वेळ आली तेव्हा छताचा मुलामा रुग्णांच्या आणि वैद्य, परिचारिका, आणि सेवकांच्या डोक्यावर पडू लागला होता. स्वच्छताग्रुहांमध्ये वरच्या मजल्याच्या तत्सम जागेतून पाणी किंवा सद्रुश द्रव गळू लागला होता, आणि रुग्णालयाची इमारतच लौकरच कोसळेल अशी भिती सर्वांना वाटू लागली होती. इमारत राजेशाही होती. राजाने तिच्या दुरुस्तीसाठी आपल्या अभियांत्रिकी विभागाला पाचाराण न करता ते काम एका विलक्षण चतुर स्थापत्यशास्त्रज्ञावर सोपविले. त्याने कामाचा आराखडा बनविला आणि कामासाठी निविदा मागविल्या. बाजारभावापेक्षा एक त्रितीयांश कमी दराने निविदा भरणा~या ठेकेदाराला काम देण्यात आले. त्याने योग्य त्या व्यक्तींना उचित अशा भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान केला, आणि मग कामास सुरुवात केली. भेटवस्तू दे्ण्यात अमाप पैसा खर्च झाला होता. निविदा कंबरडे मोडेल अशा कमी दराची होती. खर्च वजा जाता थोडा तरी फायदा होणे अपेक्षित होते. त्यामुळे केवळ परिस्थितीपुढे मान तुकवून त्याने अशातशा प्रकारचे साहित्य वापरून जमेल तसे काम उरकले. चकचकीत दिसणा~या रुग्णालयांत परत रुग्णसेवा सुरू झाली. एका महिन्यांत छताचा मुलामा परत पडावयास सुरुवात झाली. भिंतीच्या फरशा निखळून खाली पडू लागल्या. स्वच्छताग्रुहांत वरच्या मजल्यावरच्या तत्सम जागेतून परत द्रव गळू लागला. वैद्यांनी आणि परिचारिकांनी तक्रारी केल्या, त्यांना केराची टोपली दाखविण्यात आली.
"हे असे का?" वैद्यराजांनी विचारले.
"योग्य त्या ठिकाणी भेट म्हणून पेट्या आणि खोके दिले की मग असे होते" असे त्यांना एका माहितगाराने सांगितले.
"म्हणजे काय ते मला समजले नाही" वैद्यराज म्हणाले.
"येणा~या कलियुगाची ही नांदी आहे वैद्यराज" माहितगार म्हणाला.
"निदान स्वच्छताग्रुहांत तरी पाणी गळू नये" वैद्यराज म्हणाले. "बिचा~या रुग्णांना ती एक गोष्ट तरी निर्विघ्नपणे करता यावी."
वैद्यराजांच्या समाधानासाठी म्हणून त्या चतुर स्थापत्यशास्त्रज्ञाला पाचारण करण्यात आले. त्याने वैद्यराजांचे म्हणणे नीट ऐकून घेतले.
"त्याचे काय आहे वैद्यराज" स्थापत्यशास्त्रज्ञ म्हणाला, "स्वच्छताग्रुहांच्या जमिनींत क्षार जास्त प्रमाणात आहेत. ते क्षार पाणी शोषून घेता आणि त्यामुळे गळती होते."
"पण जमीन फुटली म्हणून तुम्ही संपूर्ण स्लॅबच बदलली हो्ती ना?" वैद्यराजांनी विचारले. "मग क्षार आले कोठून?"
"अहो, आपल्याला मी काय सांगायचे? मनुष्याच्या मूत्रामध्ये क्षार ब~याच जास्त प्रमाणात असतात. ते गळतीबरोबर जमिनीत जातात." असे म्हणून स्थापत्यशास्त्रज्ञ वैद्यराजांचा बिरोप घेऊन निघून गेला.
नवी स्लॅब घातल्यावर जमीन पाणी झिरपणार नाही अशी बनवतात, तर मग क्षार जमिनींत गेले कसे असे वैद्यराजांना विचारायचे होते, पण तोपर्यंत स्थापत्यशास्त्रज्ञ आपल्या रथांत बसून राजाच्या स्थापत्य विभागाच्या अमात्यांच्या महालात पोचला होता.
"वैद्यराज, आपली मुद्रा अशी व्यथीत का?" असे त्यांना कोणितरी विचारले.
"कलियुगाची नांदी झाली हो" असे वैद्यराज विषण्णपणे म्हणाले.

Friday, June 5, 2015

आग्यावेताळ

गुरुजींच्या महाविद्यालयात एक दुसरे गुरुजी होते. त्यांचे वय गुरुजींच्या वयापेक्षा जास्त असले तरी ते गुरुजींना सेवेत कनिष्ठ होते, कारण सेवाज्येष्ठता ही शिक्षण, अंगभूत गुण, कार्य वगैरे अनेक गोष्टींवर अवलंबून असे. हे दुसरे गुरुजी अतिशय खाष्ट होते. बारीक बारीक गोष्टींवरून ते हाताखालच्यांना आणि त्यांच्या विद्यार्थ्यांना धारेवर धरत असत आणि अगदी नको जीव करून टाकत असत. गुरुजी त्यांचे वरिष्ठ असूनही ते त्यांच्या मेंदूलाही आपल्या वर्तनाने मुंग्या आणत असत. सर्वांनी त्यांचे नांव आग्यावेताळ गुरुजी असे ठेवले होते.
राजाकडे शिक्षणसंस्थांचे नियम मोठे कडक होते. मनांत आलेल्याला शिक्षक म्हणून नेमता येत नसे. त्यामुळे शिक्षकांचा तसा तुटवडा जाणवत असे. वरिष्ठ शिक्षक सेवानिव्रुत्त झाले की जर त्याच दर्जाचे नवीन शिक्षक मिळाले नाहीत तर विद्यालयाची मा्न्यता जाण्याचा धोका असे. अशी परिस्थिती आली की राजा शिक्षकांच्या सेवानिव्रुत्तीचे वय वाढवत असे. म्हणजे आजचे मरण उद्यावर ढकलण्याची गोष्ट म्हणा ना. पण राजाच्या अंगी इतर अनेक गुण असले तरी दूरद्रु्ष्टीचा अभाव होता. त्यामुळे योग्य वेळी नवीन शिक्षकांच्या नेमणुका करण्याऐवजी तो तहान लागली की विहिर खणायला घेत असे. अशा विहिरी्तून पाणी थो्डेच मिळते. मग राजा शिक्षक मिळत नाहीत म्हणून सेवनिव्रुत्त होणा~या शिक्षकांचे सेवानिव्रुत्तीचे वय वाढवीत असे. त्यामुळे ते शिक्षक खूश झाले तरी कनिष्ट शिक्षक नाराज होत असत. कारण त्यांना बढती मिळणे तेव्हढ्या वर्षांनी पुढे ढकलले जात असे. राजाने आतापर्यंत सेवानिव्रुत्तीचे वय ५८ वरून ६० आणि नंतर ६० वरून ६२ करून झाले होते. आता राजा ते ६३ करण्याच्या विचारात होत, आणि नंतर ते ६५ करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन होता.
जेव्हा हा ६३ चा प्रस्ताव येऊ घातला तेव्हा गुरुजींनी कपाळाला हात लावला, कारण आता आग्यावेताळ गुरुजी आणखी एक वर्ष आपल्याला त्रास देणार हे त्यांच्या लक्षात आले. या विषयावर सर्व कनिष्ठ शिक्षकांनी संपावर जाण्याचा जाहीर इशारा दिला. पण आग्यावेताळ गुरुजींच्या हाताखाली काम करणा~या तीन शिक्षकांनी तर कमालच केली. ही गोष्ट गुरुजींना विभागांत काम करणा~या एका व्यक्तीकडून समजली.
"गुरुजी, ते तीन शिक्षक म्हणत होते की जर का राजाने सेवानिव्रुत्तीचे वय आणखी एक वर्षाने वाढविले, तर ते तिघेही राजीनामा देऊन नोकरी सोडून जातील. ते अगदी कंटाळलेत या आग्यावेताळ गुरुजींना. आग्यावेताळ गुरुजी सेवानिव्रुत्त झाल्यावर जर राजाने ते वय ६३ केले तर त्यांची हरकत नाहीये."
"अहो, मला त्यांचे दुःख समजतय हो. मी स्वतः आग्यावेताळ गुरुजींना वरिष्ठ असूनही इतका कंटाळलोय, की कधी कधी मुदतपूर्व सेवानिव्रुत्ती घेऊन येथून बाहेर पडावे असे मला वाटते."
"मग?"
"मी सेवानिव्रुत्त झालो तर आग्यावेताळ प्रमुख् शिक्षक होतील आणि सगळ्यांना रोज छळतील म्हणून मी येथे टिकून राहिलोय."

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क