Sunday, August 2, 2015

कबूतराचे विक्राळ रूप

आमच्या घराजवळ सर्वात जास्त संख्येने असणारे पक्षी म्हणजे कावळे. त्यांच्यानंतर क्रम लागतो कबूतरांचा. आमच्या झाडांमुळे या पक्ष्यांना आमच्या घरी यायला फारच आवडते. झाडांच्या कुंड्यांमध्ये अंडी घालणे हे कबूतरे पसंद करतात, आणि त्यांचा पहारा चुकवून ती अंडी फस्त करणे हे कावळे पसंद करतात. एकदा एका कबूतराने आमच्या झाडाच्या कुंडीत दोन अंडी घातली. एरवी त्यांच्या जरा जरी जवळ फिरकले तर ती घाबरून पटकन उडून जातात. पण जर ती अंडी उबवायला बसली असतील तर नजरेला नजर देऊन अविचल बसून रहातात. कितीही जवळ गेले तरी उडून जात नाहीत. अतिशयच जवळ गेले तर ती आक्रमक होऊन अंगावर येतात. खालच्या चित्रांत त्या कबूतराने पंख थोडेसे विस्तारून आणि पिसे फुलवून आपण आकाराने किती मोठे आणि धोकादायक आहोत हे दाखवून मला घाबरविण्याचा प्रयत्न कसा केला आहे पहा.



त्याच्या आकाराला मी घाबरलो नाही आणि कॅमेरा त्याच्या दिशेने रोखला हे पाहून त्याने रुद्र रूप धारण करून माझ्यावर चोच कशी उगारली आहे हे खालील चित्रांत पहा. मातेचे आपल्या अपत्यांवरील प्रेम त्यांच्या संरक्षणासाठी त्यांना किती कणखर आणि धीट बनविते याचे हे उत्क्रुष्ट उदाहरण आहे.


फोटो काढून झाल्यावर मी त्या कबुतराला आणि त्याच्या अंड्यांना एकटे सोडून दूर गेलो आणि दूरच राहिलो हे मी प्राणी आणि पक्षीमित्रांच्या माहितीसाठी येथे नमूद करतो.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क