Tuesday, August 18, 2015

ते करायला हवेच का?

राजवैद्य खेदाने डोके हलवत असताना गुरुजी तेथे पोहोचले.
"राजवैद्य, काय झाले म्हणून डोके हलवत आहात?" गुरुजींनी विचारले.
"अहो, काही काही रुग्ण असे काय प्रश्न विचारतात की काय उत्तर द्यावे ते समजत नाही. आत्ताच एक स्त्री आली होती. स्वतःला काय लक्षणे आहेत हे तिने सांगितल्यावर मी म्हटले, ठीक आहे, आपण तपासणी करूया. तर तिने मला विचारले की तपासून घ्यायला पाहिजेच काय?"
"अहो, तिला संकोच वाटला असेल" गुरुजी म्हणाले.
"ते बरोबर आहे हो. पण तपासल्याशिवाय तिला काय विकार आहे हे कसे कळणार? ते मी तिला समजावून सांगितले, तर तिने परत विचारले की तपासून घ्यायला पाहिजेच काय?"
"कमाल आहे" गुरुजी म्हणाले. "मग आपण काय सांगितलेत?"
"मी म्हटले, तपासून घेतले पाहिजे अशी काही जबरदस्ती नाही. पण आपल्या आजारासाठी उपचार करून घेण्यासाठी आपण येथे स्वेच्छेने आला आहात. तपासून घेणे हे त्या क्रियेचा पुढचा भाग आहे. तो पार पडला नाही तर मला आपले उपचार करता येणार नाहीत. मग तिने तपासून घेतले. ते बरेच झाले. तिला गंभीर विकार होता. आता त्याचे उपचार सुरू झालेत. ती तशीच निघून गेली असती तर तिचे पुढे काय झाले असते त्याची कल्पना करवत नाही."
"तरी नशीब उपचार केलेच पाहिजेत का असे म्हणाली नाही" गुरुजी म्हणाले.
"अहो, तसे म्हणणा~या स्त्रियाही भेटतात. वाळूक झाले तर शस्त्रक्रियेशिवाय बरे होत नाही. तसे सांगितले की त्या विचारतात, शस्त्रक्रिया केलीच पाहिजे का?"
"मग आपण काय उत्तर देता?"
"मी म्हणतो, शस्त्रक्रिया केलीच पाहिजे असे काही नाही. आपण शस्त्रक्रियेशिवाय राहू शकता. पण ते वाळूक तुमच्या शरीरांत राहील आणि कालांतराने मोठे मोठे होत जाईल. मग त्या शस्त्रक्रिया करून घेतात."
"घाबरत असतील हो त्या" गुरुजी म्हणाले.
"ते खरे आहे. म्हणून तर आम्हाला समजुतीने घ्यावे लागते. रुग्णाचे मन सांभाळून औषधे आणि शस्त्रक्रिया यांचा वापर करावा लागतो" राजवैद्य म्हणाले.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क