Thursday, August 20, 2015

रथ चालकांचे मानसशास्त्र

गुरुजी घरी आले आणि हात पाय धुवून जरा स्वस्थ बसले.
"काय हो, दमलात का?" त्यांच्या पत्नीने विचारले.
"दमण्यासारखे फारसे काम केलेले नाही." गुरुजी म्हणाले. "पण माणसांचे वर्तन पाहून मनाला मात्र त्रास होतो हे खरे."
"आज कोणी काय केले?" त्यांच्या पत्नीने विचारले. ज्या गोष्टींत इतर माणसांना काही अयोग्य वाटत नाही त्यांच्यामुळे आपल्या पतीला मनाला त्रास होतो हे तिला माहीत होते.
"आजचीच गोष्ट आहे असे नाही. रोजचीच आहे. सामान्य जनतेसाठी महाराजांनी भाड्याचे रथ ठेवले आहेत. या रथांचे काही चालक विचित्र वागतात. एका रथाचा चालक रथ रथांच्या थांब्यावर थांबवत नाही. तो नेहमी रथ थांब्याच्या बराच पुढे नेऊन थांबवतो. मग थांब्यावरची सगळी माणसे रथ पकडण्यासाठी जिवाच्या आकांताने धावतात. व्रुद्ध, गर्भवती स्त्रिया, कडेवर लहान मूल असण~या स्त्रिया यांना याचा खूप त्रास होतो."
"अहो, त्याला रथ चालवण्याचा पुरेसा अनुभव नसेल. थांबवताना त्याची चूक होत असेल" गुरुजींची पत्नी म्हणाली.
"योग्य ठिकाणी रथ थांबवता येतो याची खात्री केल्याशिवाय कोणालाही रथ चालवण्याचा परवाना मिळत नाही" गुरुजी म्हणाले. "आपल्यापेक्षा सुखवस्तू असणा~या लोकांना त्रास दिला की त्याचे मनांतले दुःख हलके होत असणार. म्हणून तो असा वागत असणार. निळ्या कपड्यांतला निरिक्षक थांब्यावर असला की त्या चालकाचा रथ थांब्यावर अचूक थांबतो हे माझ्या लक्षांत आले आहे."
'अशा गोष्टींकडे लक्षच दिले नाही तर काय बिघडेल?' असे म्हणायची त्यांच्या पत्नीला इच्छा झाली, पण त्यांचे मन दुखावू नये म्हणून ती मूक राहिली.
"दुसरा एक चालक आहे, तो सर्व माणसे रथांत चढण्यापूर्वीच रथ चालू करतो. मग माणसे धडपडतात. काही जण पडतात. एक दिवस कोणीतरी रथाच्या चाकाखाली सापडून मरेल अशी मला भीती वाटते आहे."
"त्याच्या रथांत तुम्ही कधी चढू नका हो" गुरुजींची पत्नी म्हणाली. "एक रथ गेला तर पुढच्या रथाने जाता येईल. आपला जीव मोलाचा, त्याच्यापुढे जरासा उशीर झाला तर काही बिघडत नाही."
"हो तर" गुरुजी म्हणाले. "हा चालक माणसे रथांतून उतरण्यास विलंब करत असतील तर त्यांच्यावर मोठ्या आवाजांत ओरडतो. आजारी माणसे, व्रुद्ध, अपंग, अशा कोणालाही सोडत नाही. अशी माणसे काय जाणून बुजून हळूहळू उतरतात काय?"
"असतात काही माणसे विचित्र" गुरुजींची पत्नी म्हणाली.
"तिसरा चालक जिथे एखादी तरुण स्त्री उभी असेल तिथे रथ थांबवतो. ती थांब्याच्या अलिकडे असेल तर अलिकडे, पलिकडे असेल तर पलिकडे. रांगेत उभ्या असणा~या माणसांनी रथांत प्रथम चढावे यापेक्षा त्याला आवडलेल्या स्त्रीने प्रथम चढावे असे त्याला वाटते असे दिसते."
"शी!" गुरुजींची पत्नी म्हणाली.
"अशी माणसे रोज दिसतात म्हणून मनाला थकवा आलाय" गुरुजी म्हणाले.
गुरुजींना त्रास होतो याचे त्यांच्या पत्नीला वाईट वाट्ले खरे, पण आपला पती अशा विचित्र माणसांसारखा नाही ही गोष्ट जाणवून तिला आनंदही झाला.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क