Monday, August 24, 2015

तसे काही नाही ना?

"राजवैद्य, मला एक कठीण प्रश्न पडला आहे" त्यांचा एक पदव्युत्तर विद्यार्थी म्हणाला. "काही काही रुग्ण मला एक प्रश्न विचारतात, ज्याचा अर्थ मला समजत नाही".
"कोणता प्रश्न?"  राजवैद्यांनी विचारले.
"तसे काही नाही ना?, असे ते विचारतात" विद्यार्थी म्हणाला.
"तसे म्हणजे कसे ते त्यांच्या आघीच्या संभाषणावरून समजायला हवे" राजवैद्य म्हणाले.
"तेच तर! रुग्णाची संपूर्ण तपासणी करून त्याचे निदान आणि उपचार यांची संपूर्ण माहिती दिली की ते हा प्रश्न विचारतात."
"ते निदान कोणते असते?" राजवैद्यांनी विचारले.
"एकच निदान असते असे नाही. कधी ते गर्भाशयाचे फायब्रॉइड असते, तर कधी स्त्री बीज न बनल्यामुळे असणारे वंध्यत्व असते, तर कधी मूत्राशयाचा जंतूसंसर्ग असे असते ."
"दर वेळी त्या प्रश्नाचा अर्थ वेगवेगळा असतो" राजवैद्य हंसून म्हणाले. "जेव्हा निदान गर्भाशयाचे फायब्रॉइड असे असते, तेव्हा त्यांना विचारायचे असते की गर्भाशयाचा कर्करोग तर नाही? जेव्हा ते स्त्री बीज न बनल्यामुळे असणारे वंध्यत्व असे असते, तेव्हा त्यांना विचारायचे असते की यापुढे त्या स्त्रीला गर्भधारणा कधीही होणार नाही असे तर नाही? जेव्हा ते मूत्राशयाचा जंतूसंसर्ग असे असते, तेव्हा त्यांना विचारायचे असते की हल्ली सर्वत्र भिती पसरली आहे तो एड्स हा विकार तर नाही?"
"पण त्यांना तसे स्पष्ट विचारायला काय होते?" विद्यार्थ्याने विचारले.
"त्याचा उच्चार केला तर तोच आजार निघेल अशी अगम्य भिती त्यांच्या मनांत असते. तसे असू नये हे खरे, पण माणसाचे मन ते, त्याला नियम लागू असलेच पाहिजेत असे नाही" राजवैद्य म्हणाले.
"पण त्यांना काय विचारायचे आहे ते मी समजावे कसे?" विद्यार्थ्याने विचारले.
"ते अनुभवाने जमेल" राजवैद्य म्हणाले. "पण नाही समजले तर त्यांना त्यांच्या प्रश्नाचा अर्थ स्पष्टच विचारावा हे बरे."
विद्यार्थी आनंदी झाला आणि आपल्या अर्धवट सोडलेल्या कामाला गेला.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क