Saturday, August 22, 2015

चेहरा की डोके?

'बालादपि सुभाषितम् ग्राह्यम्' हे गुरुजींना माहित होते. आपल्या विद्यार्थ्यांकडून काही शिकायला मिळाले तर ते आवडीने शिकत असत. आज त्यांच्या ए्का विद्यार्थ्याने त्यांची रथ चालकांची गोष्ट ऐकली आणि त्यांना एक नवी गोष्ट सांगायला तो आला.
"गुरुजी, आपण हे करून पहाच" गोष्ट सांगून झाल्यावर तो म्हणाला. गुरुजींचे कुतूहल चाळवले होते. त्यांनी त्याच दिवशी ती गोष्ट खरी की खोटी हे पाहिले. मग ते घरी आले आणि त्यांनी काय घडले ते आपल्या पत्नीला सांगितले.
"अग, माझ्या एका विद्यार्थ्याने सांगितले ते खरे आहे का ते मी आज प्रयोग करून पाहिले. मोठी गंमत आली. मी सार्वजनिक रथांत चढलो आणि पाठच्या बाजूला बसलो. रथाचा वाहक आला. मी माझे तिकिट काढले. थोड्या वेळाले मी उठलो आणि रिकाम्या असलेल्या दुस~या आसनावर जाऊन बसलो. वाहक परत माझ्याकडे आला आणि माझ्याकडे त्याने तिकिटाचे पैसे मागितले. मी त्याला माझे तिकिट दाखविले. ते बघून तो निघून गेला. जवळचे एक आसन रिकामे झाल्यावर मी उठलो आणि त्या आसनावर जाऊन बसलो. वाहक परत एकदा माझ्याकडे आला आणि माझ्याकडे त्याने परत एकदा तिकिटाचे पैसे मागितले. मी त्याला माझे तिकिट दाखविले. ते बघून तो निघून गेला. दोन थांब्यांचे अंतर गेल्यावर रथाच्या पुढच्या भागांत एक आसन रिकामे झाले. मी उठून तेथे जाऊन बसलो. अग काय सांगू, वाहक परत एकदा माझ्याकडे आला आणि माझ्याकडे त्याने परत एकदा तिकिटाचे पैसे मागितले. मी त्याला माझे तिकिट दाखविले आणि विचारले, की त्याने माझ्याकडे चार वेळा तिकिटाचे पैसे मागितले. दर वेळी मी आसन बदलले की तो माझ्याकडे तिकिट काढावे म्हणून येणार काय? तेव्हा तो तोंड पाडून निघून गेला."
"कमाल आहे. तो माणसांचे चेहरे बघतो की फक्त डोकी मोजतो?" गुरुजींच्या पत्नीने विचारले. "आणि तुम्हीसुद्धा या वयाला हा काय पोरकटपणा केलांत?"
"अग, पोरकटपणांतही एक मजा असते" गुरुजी खुशीत म्हणाले. शालेय शिक्षण संपल्यावर त्यांनी कधी पोरकटपणा केलाच नव्हता. त्यांना त्यांचे बालपण आठवले आणि रोजच्या धकाधकीच्या जीवनाचा क्षणभर विसर पडला.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क