Sunday, August 16, 2015

सावळागोंधळ

आटपाटनगरच्या राजाच्या रुग्णालयांत कनिष्ठ वैद्यांच्या नियुक्त्या करावयाच्या होत्या. वर्तमानपत्रांतून जाहिराती झळकल्या आणि इच्छुकांनी उमेदवारी अर्ज प्रचंड संख्येने भरले. सुमारे पंधरा दिवस उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचे काम चालू होते. राजवैद्य मुलाखती घेऊन अगदी थकून गेले होते. पण काम महत्वाचे होते. रुग्णालय चालविण्यासाठी वैद्यांची खूपच कमतरता जाणवत होती. त्यामुळे कुरकुर न करता राजवैद्यांनी सगळ्या मुलाखती पार पाडल्या होत्या. शेवटी निवडलेल्या वैद्यांच्या हातांत नियुक्तीपत्रे पडली आणि ते कामावर रुजू झाले. राजवैद्य आणि नवनियुक्त वैद्य असे सगळेच आनंदी झाले.
पण आटपाटनगरच्या सगळ्या गोष्टी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण होत नसत.
"राजवैद्य महाराज, अनर्थ घडला" एक नवनियुक्त वैद्य धापा टाकत आले आणि घाबरलेल्या स्वरांत म्हणाले.
"घाबरू नका. येथे बसा आणि काय झाले ते मला सांगा" राजवैद्य म्हणाले.
"राजवैद्य, आम्ही आमच्या आघीच्या नोक~या सोडून या वैद्यांच्या पदांवर रुजू झालो. आज दोन दिवस झाले. आज कार्यालयातून आम्हाला बोलावणे आले आणि त्यांनी आमची नियुक्तीपत्रे परत मागून घेतली."
"असे आजपर्यंत कधी झाले नाही" राजवैद्य म्हणाले. "त्यांनी काही कारण दिले का?"
"आजपर्यंत नियुक्तीनंतर फुरसतीने नवनियुक्त वैद्यांना कोतवालाकडून निष्कलंक असण्याचे प्रमाण्पत्र आणावे लागत असे. आता ते म्हणतात की आधी प्रमाणपत्र आणा आणि मगच तुम्हाला नियुक्त करण्यात येईल."
"पण याचा विचार त्यांनी आधीच केला नव्हता का?" राजवैद्यांनी विचारले.
"नसावा. त्यांना प्रमुख सचिवांनी नियमाप्रमाणे नियुक्त्या करायला सांगितले होते. तिकडे त्यांनी दुर्लक्ष केले. आता प्रमुख सचिव रागावलेत."
"पण आता तुमची स्थिती 'ना घर का ना घाट का' अशी झाली आहे त्याचे काय? नवी नोकरी मिळाली म्हणून जुनी सोडली आणि नवी नोकरी मिळून झाल्यावर दोन दिवसांत गेली" राजवैद्य म्हणाले.
"आता आम्ही काय करावे ते काही सुचत नाही" नवनियुक्त वैद्य म्हणाले.
"महाराजांना भेटून बघा" राजवैद्यांनी सुचवले.
"तसे केले तर पुढे सचिव किंवा संचालक त्रास देतील अशी भिती वाटते" नवनियुक्त वैद्य म्हणाले.
"तुम्ही पूर्वी राजाच्या सेवेतच कनिष्ठ पदावर होता ना? तुमचे नियुक्तीपत्र काढून घेतले त्याची कार्यालयातील लिपिकाकडून सकारण पोचपावती घ्या आणि मग ती दाखवून त्या जुन्या पदावर परत रुजू व्हा. कोतवालाचे प्रमाणपत्र महिन्याभराने मिळाले की मग या पदावर तुमची नेमणूक होईल."
नवनियुक्त वैद्य राजवैद्यांचे आभार मानून गेले. राजवैद्य सुन्नपणे बसून राहिले. त्यांचे सहकारी वैद्य बाजूला बसून सारे संभाषण ऐकत होते.
"राजवैद्य, आपण असे गप्प का?" त्यांनी विचारले.
"कारभार ढिसाळपणे होतो आहे याची चिंता तर आहेच. पण सर्वच नवनियुक्त वैद्य पूर्वी महाराजांच्या सेवेत नव्हते. काहीजण परप्रांतांतून नोक~या सोडून आले होते. त्यांना आता जुन्या नोक~या परत मिळायच्या नाहीत. त्यांचे काय हा विचार मनाला छळतो आहे."

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क