Friday, August 28, 2015

हुशार उंदीर

आटपाटनगरात उंदीर होते. त्यांत काय मोठेसे असे कोणीही म्हणेल, कारण गाव तेथे उंदीर हे सर्वज्ञात आहे. पण आटपाटनगरांतले उंदीर हुशार होत चालले होते. उदाहरणार्थ गुरुजींच्या घरी एक उंदीर यायला लागला होता. तो शाकाहारी असावा. कारण गुरुजींच्या पत्नीच्या सज्जातल्या बागेतल्या झाडांची पाने आणि फुले तो खात असे. झाडांच्या मुळांत घातलेल्या भाजीपाल्याचे देठ आणि पाने तो खात असे. देवाचे निर्माल्यही तो खात असे. झाडांच्या मुळांतली माती तो कारण नसताना खणून टाकत असे.गुरुजींच्या पत्नी अगदी कंटाळून गेली होती.
"अहो, त्या उंदराला पिंज~यांत पकडा आणि कोठेतरी दूर सोडून या हो" असे तिने गुरुजींना म्हटले. त्याप्रमाणे गुरुजींनी पिंजरा लावला. ब्राम्हण असल्यामुळे त्यांच्या घरी मासे नसत. पण उंदराला आवडतील म्हणून त्यांनी कोळ्णीकडून माशाचे तुकडे आणून पिज~यांत लावले. दुस~या दिवशी पहातात तर काय, उंदराने पिंज~याचे दार बंद केलेले होते, आणि तो कोठेच नव्हता.
"अहो, तो शाकाहारी दिसतो. त्याला हे भजे लावा" असे पत्नीने म्हटल्यावर गुरुजींनी पिज~यांत भजे लावले. या वेळी उंदराने पिंज~याला स्पर्शही केला नाही. भाजे होते तसे राहिले. पिंज~याचे दार सताड उघडेच राहिले. असे लागोपाठ तीन दिवस झाले.
"उंदीर चिकटणारा पुठ्ठा आणा आणि त्या झाडांमध्ये ठेवा हो" असे पत्नीने म्हटल्यावर गुरुजींनी पुठ्ठा आणला आणि उंदराच्या आवडीच्या झाडाजवळ ठेवला. उंदराने तो उलटा करून ठेवला आणि नेहमीचे सगळे पराक्रम केलेच.
"त्याला औषध घालून मारायला पाहिजे आता" असे ठरवून गुरुजींनी ते औषध आणून ते झाडांच्या मुळांजवळ ठेवले. लागोपाठ तीन दिवस उंदराने सगळे औषध फस्त केले, पण मरून पडणे सोडाच, त्याची ताकद कमी होण्याचेही काही लक्षण दिसेना. मग गुरुजीनी पिठाच्या गोळ्यांत साखर आणि झोपेचे औषध घालून उंदरासाठी ठेवले. ते खाऊन उंदीर बहुतेक नशेत गेला असाव, कारण त्याच्या नेहमीच्या पद्धतशीर विध्वंसापेक्षा वेगळाच विध्वंस त्याने केला. मग गुरुजींनी झोपेच्या औषधाची मात्रा दुप्पट केली. उंदराने तेही फस्त केले, पण सकाळी झाडांच्या मुळांत झोपलेला काही तो सापडला नाही. तिस~या दिवशी मात्र उंदराने त्या औषधाला स्पर्शही केला नाही.
"बघा हो, त्या उंदराला माणसापेक्षा जास्त अक्कल आहे. जी गोष्ट खाऊन त्रास होते ती माणूस मोहापोटी पुनःपुन्हा खातो, पण उंदराने मात्र ते निग्रहाने टाळले" गुरुजींची पत्नी कौतुकाने म्हणाली.
मग गुरुजींनी तारेची जाळी आणून प्रत्येक कुंडीच्या वरच्या भा्गावर लावली, जेणेकरून उंदीर माती खणायला पोचला नसता. या  वेळी तर उंदराने कमालच केली. त्याने कडिलिंबाच्या डहाळ्या तोडल्या आणि एका जाळीच्या खालून जाऊन झाडाच्या मुळाशी नेऊन टाकल्या. ते बघून गुरुजींची पत्नी स्तिमित झाली.
"अग, तू त्याला खायला येवढे काही देतेस, म्हणून त्याला तुझा लळा लागला असे दिसते" गुरुजी म्हणाले. "जाळी लावल्यावर तुला झाडाच्या मुळाशी पाने टाकता येणार नाहीत म्हणून त्याने स्वतः पाने तोडून जाळीखाली नेऊन टाकली बघ."
मला वाटते या उंदराला आहे तसे राहू द्यावे" गुरुजींची पत्नी  म्हणाली.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क