Saturday, October 10, 2015

पी. एन.डी.टी. आणि परमेश्वर

देशात जन्माच्या वेळी असणारे मुलगे आणि मुली यांचे प्रमाण बिघडत चालले होते. मुलगे मुलींपेक्षा बरेच जास्त व्हायला लागले होते. त्यांतले काही स्त्रीभ्रुणहत्येमुळे होते तर काही जन्मापूर्वीच मुलीऐवजी मुलगे निवडल्यामुळे होते. जनतेला असणा~या मुलग्यांच्या जबर हौसेमुळे हे घडत होते. ते थांबवावे म्हणून दिल्लीच्या तख्ताने पी.एन.डी.टी. नावाचा कायदा बनविला होता. तो आटपाट नगरांतही लागू झाला होता. कायद्याची अंमलाजावणी करण्यासाठी सरकारी बाबू आणि नगरपालिकेचे बाबू यांच्यावर बिगरसरकारी संस्था आणि सजग नागरिक यांचा प्रचंड दबाव होता. त्यामुळे त्यांच्याकडून अतिशय चोख कार्यवाही होत होती.

अशाच एका बाबूने तर कमालच केली. कायद्याप्रमाणे गर्भधारणा होण्यापूर्वी मुलगा होण्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्यास मनाई होती. त्याप्रमाणे या बाबूने परिपत्रक काढले. त्यांत खालील बाबी समाविष्ट होत्या.

  1. मुलगा व्हावा म्हणून कोणीही परमेश्वराची प्रार्थना करू नये.
  2. देवळांत प्रार्थना करतांना मनातल्या मनात काहीही मागू नये. देवाकडे लोक काय मागतात ते पुजा~यांनी काळजीपूर्वक ऐकावे. जर मुलगा मागितला तर पोलीसांकडे तक्रार करावी. जर बरेच जण एकाच वेळी प्रार्थना करत असतील तर प्रत्येकाला एक सायलेंट ऑब्झर्वर वापरण्यास द्यावा व त्यावर मुद्रित झालेली प्रार्थना नंतर संबंधित अधिका~याकडे तपासण्यासाठी पाठवावी.
  3. ज्यांच्या घरी देव असतील त्यांनी प्रत्येक प्रार्थनेच्या वेळी एफ नावाचा फॉर्म अचूकपणे भरावा. त्याच्यात आ्रधीच्या अपत्यांचे वय ब लिंग बिनचूकपणे भरावे. त्याच्यात त्रुटी राहिल्या तर संबंधित अधिका~याने कायदेशीर कारवाई करावी. आपण पुत्रप्राप्तीची मागणी केली नाही असे प्रतिज्ञापत्र  देणे प्रत्येक प्रार्थना करणा~या व्यक्तीला बंधनकारक राहील..
  4. श्री गणेशस्तोत्र म्हणण्यास बंदी आहे, कारण त्यांत स्पष्ट म्हटलेले आहे की 'द्वादशानि नामानि त्रिसंध्यं यत् पठेत् नरः ....पुत्रार्थि लभते पुत्राम्'
  5. पुत्रकामेष्टी यज्ञावर बंदी राहील.

सुदैवाने काही सजग नागरिकांनी राजाला या परिपत्रकाची वेळीच माहिती दिली आणि राजाने ते परिपत्रक वेळीच मागे घेतले. सरकारी परिपत्रके ती काढणारे बाबू आणि त्यांचे टंकलेखक सोडून इतर कोणी पटकन वाचत नसत त्यामुळे ते मागे घेण्यापूर्वी फारसे कोणी वाचले नव्हते. नाहीतर कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती धोक्यात आली असती.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क