Monday, October 12, 2015

सोनोग्राफी मशिन्स आता औषध?

दिल्लीच्या तख्ताने पी. एन्. डी. टी. कायदा सुधारण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमली असे आटपाटनगरच्या राजवैद्यांनी ऐकले. समितीत तज्ज्ञ आहेत म्हणजे तिचे काम जबरदस्त असणार याबद्दल त्यांच्या मनांत अजिबात शंका नव्हती. काही कालानंतर 'पत्र नव्हे मित्र' असा बोलबाला असणा~या एका व्रुत्तपत्रांत १०-१०-२०१५ रोजी एक बातमी झळकली. सोनोग्राफी मशीन हे औषध म्हणून समजले जावे व त्याची नोंद औषधांच्या यादीत केली जावी अशी शिफारस तज्ज्ञ समिती करत आहे अशी बातमी आली होती. औषध आणि सौंदर्यप्रसाधन कायद्याच्या अंतर्गत या मशिन्सची नोंद केल्यामुळे अशा मशिनच्या निर्मितीपासून किंमतीपर्यंत सर्व गोष्टींवर आणि आयातशुल्कावर नियंत्रण ठेवणे सोपे जाईल असा हा विचारप्रवाह आहे असे समजले.
"अहो पण या नियंत्रणाचा आणि गर्भलिंगचिकित्सा रोखण्याचा संबंधच काय?" एक वैद्य तारस्वरांत म्हणाले. दिल्लीतल्या समितीच्या तज्ज्ञ सदस्यांना थेट ऐकू जावे म्हणून ते अशा तारस्वरांत बोलले असावे असे राजवैद्यांना वाटले.
"पी. एन्. डी. टी. कायद्यांत अशा नियंत्रणाची सोय नाही तर तो कायदा सुधारा, मशिन्सना औषध म्हणू नका हो" दुस~या एका वैद्यांनी सल्ला दिला. तो तारस्वरांत नसल्यामुळे बहुधा दिल्लीपर्यंत पोहोचला नसावा.
"मशिन्स आता औषधे झाली. उद्या खूप महाग झाली म्हणून कांदे आणि डाळी-कढधान्यांना यंत्रे म्हणतील" तिसरा वैद्य म्हणाला. दिल्ली तख्ताची त्या विषयावरची तज्ज्ञ समिती तसे करेलही असे खुद्द राजवैद्यांनाही क्षणभर वाटले.
"हे वैचारीक दारिद्र्य नाही का?" एक वैद्यबाई चाचरत चाचरत म्हणाल्या.
"अहो असे म्हणू नका. दिल्ली तख्त आपली जीभ कलम करेल. राज्यकर्त्यांवर टीका करणे याला सेडिशन का कायसेसे म्हणतात आणि तो गुन्हा आहे असे परिपत्रक कोतवालाने काढले ते आपल्याला माहित नाही काय?" राजवैद्य म्हणाले. "हे वैचारीक दारिद्र्य नाही, तर वैचारीक प्रगल्भता आहे असे दहा माणसांच्या समोर म्हणा." वैद्यबाई तसे करयासाठी कक्षाबाहेर गेल्या.
"मशिन्स औषधे झाली की त्यांना एक्सपायरीची तारीखही येईल नाही का? मग काय ती टाकून द्यायची आणि नवी खरेदी करायची? दिवाळे वाजेल" एक तरुण वैद्य म्हणाले.
"अहो, समितीची मंडळी काम करून कंटाळल्यावर गंमत म्हणून काहीबाही बोलली असतील आणि वर्तमानपत्रवाल्यांनी ते छापले असेल. ते खरे धरून चालू नका. उद्या नवा मसुदा समितीने प्रसिद्ध करेपर्यंत जरा धीर धरा" राजवैद्य म्हणाले. पत्र नव्हे मित्र असणारे वर्तमानपत्र तसे करणार नाही असे त्यांच्या मनांत आले, पण कल्ली कोणाची खात्री देता येत नाही असे खुद्द महाराज म्हणाले होते ते त्यांना आठवले. मंडळी पांगली.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क