Tuesday, October 20, 2015

गर्वावर उतारा

आटपाटनगरांत गुरुजी विद्यापन करत असत. त्यांचे अनेक विद्यार्थी पुढे मोठे झाले आणि देशीविदेशी स्थायिक झाले. काही जण गुरुजींना विसरले नाहीत. गुरुपौर्णिमेला ते नेमाने गुरुजींना दूरध्वनी करून दुरून का होईना, प्रणाम करत. आणखी काहीजण कदाचित त्यांना विसरले नसतील, पण मनांतील आठवणी मनांतच राहिल्या तर ते गुरुजींना कसे कळावे. कोणी आठवण काढो अथवा न काढो, गुरुजींनी आपले विद्यापनाचे व्रत सोडले नव्हते. जे त्यांना विसरले त्यांनाही गुरुजींचा आशीर्वाद असायचाच. विद्यार्थी आपल्या मुलांसारखेच असतात अशी गुरुजींची धारणा होती. विद्यार्थ्यांनी आपण कमावले त्याच्या सहस्त्रपट पैसे कमावले याचा त्यांना आनंद असायचा. विद्यापनाची आवड म्हणून त्यांनी ते स्विकारले होते. त्यांत अर्थार्जन फारसे होणार नाही याची पूर्ण कल्पना असतांनाही त्यांनी ते अंगिकारले होते, आणि म्हणून त्यांना अजिबात विषाद वाटत नसे.
सगळेच जण गुरुजींसारखे नसतात, याची त्यांनाही कल्पना होती. पण त्या दिवशी त्यांच्या मते कहरच झाला. गुरुजींच्या एक विद्या्र्थ्याने त्यांना सल्ला विचारण्यासाठी इ-मेल केली. असे अनेक जण करत. गुरुजींनी सर्वांना विनामूल्य सल्ला दिला होता. या विद्यार्थ्यालाही ते तसेच करणार होते. पण ई-मेल च्या शेवटी एक वाक्य होते - 'माझ्या आय् फोन ६ वरून पाठविली आहे.'
"शेवटी असे लिहिण्याची काय गरज होती?" गुरुजींनी राजवैद्यांना विचारले.
"अहो गुरुजी, ते तसे आपोआपच येते" राजवैद्य म्हणाले. "ते जर नको असेल तर ते येऊ नये असे सेटिंग करावे लागते."
"तरी त्याने ते केले नाही. याच विद्यार्थ्याने पूर्वी मला मुलांच्या शिकवणी क्लासमध्ये नोकरी देऊ केली होती" गुरुजी म्हणाले.
राजवैद्यांनी खेदाने मान हलवली, पण काहीच बोलले नाहीत. गुरुजीही गप्पच राहिले.
आठ एक दिवसांनी दोघे परत भेटले.
"गुरुजी, त्या विद्यार्थ्याला काय उत्तर दिलेत?" राजवैद्यांनी विचारले.
"योग्य तो सल्ला दिला" गुरुजी म्हणाले. "कोणी विचित्रपणा केला म्हणून आपले व्रत सोडायचे नसते. पण आयुष्यात कधी नाही तो थोडासा उपरोधिकपणाही केला."
"तुम्ही आणि उपरोध?" राजवैद्यांनी आश्चर्याने विचारले. "उपरोध म्हणजे नक्की काय केलेत?"
"माझ्या ई-मेलच्या शेवटी एक ओळ लिहिली - 'माझ्या डबडा, रडतखडत चालणा~या कंप्यूटरवरून पाठविली" गुरुजी स्मितहास्य करीत म्हणाले. "अपेक्षेप्रमाणे ई-मेलला उत्तर आले नाही."
"पण तुम्ही तुमच्या आय् पॅडवरून पाठवायची होती" राजवैद्य म्हणाले. "त्यावर तुमच्या आय् पॅडवरून पाठविली असे लिहून आले असते."
"उद्देश तो नव्हता. त्या विद्यार्थ्याला विनम्रता आणि निगर्वीपणा शिकविणे हा होता. त्याच्या शिक्षणाच्या काळांत हे शिकविण्याचे कदाचित राहून गेले असावे, ते आता तरी करावे या हेतूने मी असे केले."

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क