आटपाट नगरांत काळानुसार बदलाचे वारे वाहू लागले होते. पाश्चात्य शिक्षणाच्या पद्धती हळूहळू शिरकाव करू लागल्या होत्या. गुरुजींना या विषयांत रस होता हे माहीत असल्यामुळे राजवैद्यांनी त्यांना ही गोष्ट सांगितली.
"गुरुजी, दूरस्थ शिक्षणम्हणजे काय ते आपल्याला माहीत आहे.हो ना?"
"ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणसंस्थेत जाऊन शिकता येत नाही त्यांना आपल्या घरी राहून स्वतः अभ्यास करून शिक्षण घेता यावे म्हणून निर्माण केलेली ही पद्धत आहे. विद्यापीठ त्यांना शिक्षण साहित्य पुरविते आणि त्यांची योग्य वेळी परीक्षा घेते."
"बरोबर. आपल्याकडे ही पद्धत काही विद्यापीठांत सुरू झालेली आहे. आता त्यांत एका नव्या पद्धतीची भर पडते आहे. आजच मला एका जुन्या विद्यार्थी वैद्याने त्यांच्या विद्यापीठांत सुरू झालेली नवी प्रथा कशी आहे त्याची माहिती पाठविली आहे. आपल्याकडे ती यायला वेळ लागणार नाही. कदाचित तिने शिरकाव करून घेतलाही असेल."
"काय आहे ती प्रथा?" गुरुजींनी विचारले.
"विद्यार्थी विद्यालयांत प्रवेश घेतात. त्यांच्या उपस्थितीचा हा तक्ता पाहिला की ही प्रथा काय आहे याचा उलगडा होईल. जांभळ्या रंगात अनुपस्थिती दाखविली आहे, किरमिजी रंगात उशीराची उपस्थिती दाखविली आहे, तर फिकट पिवळ्या रंगात वेळेवर उपस्थित राहणे देर्शविले आहे."
गुरुजींनी तक्ता काळजीपूर्वक पाहिला.
"वेळेवर उपस्थिती येव्हढी थोडी? आणि अनुपस्थि्ती येव्हढी जास्त?" त्यांनी आश्चर्याने विचारले. "मग त्यांचे शिक्षण कसे होते? विद्यापीठ त्यांना परीक्षेला बसू कसे देते?"
"त्यांचे शिक्षण दूरस्थ असते, म्हनजे ते आपले आपण जमेल तसे शिकतात. रुग्ण न बघता वैद्य होतात. विद्यापीठाचे काय सांगायचे? ते आंग्ल भाषेत स्टुडंट फ्रेंडली आहे. उपस्थिती कमी पडली तर शेवटच्या दिवसापर्यंत दिवसाचे २४ तास शिकवून त्यांची उपस्थिती पूर्ण करावी असे विद्यापीठाचे आदेश असतात. १०% अनुपस्थिती माफ करण्याचे अधिकार अधिष्ठात्यांना असतात आणि ते त्यांनी वापरावे असा संकेत असतो."
"पण ते अनुपस्थित असतात तेव्हा असतात कोठे?"
"काही जण घरी असतात. काही विद्यालयात असतात, पण वसतीग्रुहात झोपलेले असतात, उपहारग्रुहात बसलेले असतात, किंवा कट्ट्यावर गप्पा मारत असतात."
"असे आहे तर त्यांना विद्यापीठ खरोखरीचे दूरस्थ शिक्षण का घेऊ देत नाही?"
"मेडिकल कौन्सिल परवानगी देईल तर तेही होईल. पण दूरस्थ पद्धतींत रुग्ण तपासता येत नाहीत ना! तेथेच तर घोडे मार खाते आहे."