Sunday, November 1, 2015

मरायची वेळ

आटपाट नगरांत देवाचा उत्सव सुरू व्हायचा होता. आबालव्रुद्ध उत्साहात आणि आनंदात होते. देवाचे आगमन घरोघरी होणार होते तसेच सार्वजनिक उत्सवांतही व्हायचे होते. तयारी जोरात सुरू होती.
"अहो ऐकलत का? काकी वारल्या" गुरुजी पत्नीला म्हणाले. काकी व्रुद्ध होत्या. कधीतरी देवाघरी जाणारच होत्या. तरीही आपले माणूस गेले की दुःख हे होतेच.
"कधी हो?" गुरुजींच्या पत्नीने विचारले.
"काल अर्ध्या रात्री गेल्या. आताच दूरध्वनी आला."
"वाईट झाले" गुरुजींची पत्नी म्हणाली.
गुरुजींनी काकींच्या मुलाबाळांचे सांत्वन केले. मग रोजची कामे. दिवस हां हां म्हणता सरला.
दुस~या दिवसाची पहाट झाली आणि गुरुजींचा दूरध्वनी खणखणला. येव्हढ्या पहाटे कधी कोणी त्यांना दूरध्वनी करत नसे. त्यांच्या ह्रुदयांत चर्र झाले.
"गुरुजी, काकींचा पुतण्या वारला,"
गुरुजी सुन्न झाले. काकींचे वय झाले होते तसे पुतण्याचे झाले नव्हते.
"बरे झाले बोललात" गुरुजी म्हणाले. "अकस्मात गेला! काकी गेल्या म्हणून हाय खाऊन गेला की काय?"
"नाही हो" पलीकडून उत्तर आले. "बरा होता. उत्सवाच्या तयारीत मग्न होता. काकी गेल्याचे समजले तेव्हा चिडून म्हणाला देखील की काकींना जायला हीच वेळ मिळाली? आता आपल्याला देव पूजता येणार नाही. सगळी तयारी वाया गेली."
"वाईट झाले" गुरुजी म्हणाले. गुरुजी पुढे काही बोलतील म्हणून बातमी देणारा थांबला. पण गुरुजी काहीच बोलले नाहीत. वाट बघून तो बर तर मग असे म्हणाला आणि त्याने दूरध्वनी खाली ठेवला. मनातल्या विचारांच्या कल्लोळात ते गुरुजींच्या लक्षातही आले नाही.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क