Saturday, November 21, 2015

जोडलेली मने

गुरुजींचा एक जुना मित्र त्यांना खूप दिवसांनी भेटला. क्षेमकुशल विचारून झाले. घरच्यांची विचारपूस करून झाली. कामकाजासंबंधी चौकशी करून झाली. मित्र गुरुजींना भेटून आनंदला होता खरा, पण पूर्वीसारखा आनंदी वाटत नव्हता.
"मित्रा, तुझ्या मनाला काहीतरी त्रास होतो आहे" गुरुजी म्हणाले. "आपल्या विद्यार्थीदशेत होतास तसा आता तू आनंदी वाटत नाहीयेस."
"काय सांगू रे" मित्र म्हणाला. "बोलून काही फायदा होईल असे वाटत नाही."
"प्रयत्न तर करून पहा" गुरुजी म्हणाले.
"कामाच्या मागे वेळ कसा जातो समजत नाही. पैसा खूप कमावला, पण माणसे पूर्वीसारखी जोडलेली रहात नाहीत."
"अरे, तो जीवनाचा नियमच आहे. तरीपण लोकांबरोबर जोडलेले रहाण्यासाठी तू काय काय केलेस ते तर सांग."
"मोबाईल फोन आले तेव्हा नोकिआ कंपनीची जाहिरात पाहिली. 'Nokia, connecting people'. हातांत गुंफलेला हात होता त्या जाहिरातीत. पटकन जाऊन एक फोन घेऊन आलो."
"मग प्रश्न सुटला असेल?" गुरुजी म्हणाले.
"छे रे! ईमेल वापरायचो. त्यानेही काही फरक पडला नाही. संपर्कात बरेच जण होते. पण काहीबाही एकीकडून आलेले इतरांना फॉर्वर्ड करणे या पलिकडे काही होईना. मग स्मार्ट फोन आले. ते व्हॉट्सऍप माझ्या प्रश्नाचे उत्तर आहे असे परिचीत म्हणाले. झाले. जाऊन एक स्मार्ट फोन घेऊन आलो. व्हॉट्सऍप घातले. पूर्वी फॉरवर्ड केलेल्या ईमेल्स यायच्या त्यांची जागा कालापव्यय करणार्‍या चुटक्यांनी, गोष्टींनी, व्हिडियो क्लिप्सनी घेतली. माणसे काही जोडलेली राहीनात. आता मी काय करू सांग."
"बाबारे, एकमेकांना ईमेल आणि मेसेज करून कालापव्यय केल्यामुळे माणसे जोडलेली रहात नाहीत. संपर्काची साधने कोणतीही असोत, जर मने जुळलेली नसतील तर काही उपयोग नसतो. एकमेकांच्या आनंदाच्या प्रसंगी आनंद व्यक्त करणे, दुःखाच्या प्रसंगी सांत्वन करणे, अडीअडचणीला धावून जाणे, स्वार्थीपणे न वागणे यामुळे मने जुळतात आणि जुळलेली रहातात बघ."
मित्राने असे काही पूर्वी ऐकले नव्हते. आजच्या काळांत मोठे झालेल्या त्याच्या मुलाबाळांना तर या गोष्टीची कल्पना असण्याचे काही कारणच नव्हते. मनाशी काही निर्धार करून मित्र उठला, आणि म्हणाला, "मित्रा, तो पहिला मोबाईल फोन खरेदी करण्यापूर्वी तू भेटला असतास तर किती बरे झाले असते."

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क