Monday, November 23, 2015

दुष्काळाचे गणित

"यंदा पाऊस खूपच कमी प्रमाणात झालाय. पाणी जपून वापरायला हवे" आटपाट नगरचे महाराज म्हणाले. "आपण काय कार्यवाही केली?"
"महाराज, वेगवेगळ्या वॉर्डांचा पाणीपुरवठा तीस टक्के कमी केला आहे" अमा्त्य म्हणाले.
"आणि आपल्या रुग्णालयांत काय केले आहे?"
"सर्वांनी पाणी जपून वापरावे म्हणून परिपत्रक काढले आहे."
राजवैद्य शांतपणे सर्व ऐकत होते. सकाळी एका कक्षाच्या प्रमुख परिचारिकेने केलेली तक्रार त्यांना आठवली. 'तीन दिवस झाले. वरच्या मजल्यावरच्या कक्षाच्या स्नानगॄहांतून आमच्या कक्षाबाहेर धो धो पाणी वहात आहे. अभियांत्रिकी विभागाला तीन वेळा पाचारण केले. आत्ता येतो असे म्हणतात पण कोणीही फिरकत नाही.' पिण्यासाठी पाणी नाही म्हणून माणसे देशोधडीला लागली आहेत, आणि येथे बेफिकीरीमुळे किती पाण्याची नासाडी होते आहे, असे त्यांचा मनांत आले. त्यांनी स्वतः अभियांत्रिकी विभागात दूरध्वनी केला. पण उपयोग झाला की नाही ते मात्र त्या जगन्नियंत्यालाच ठाऊक. समोरच्या इमारतीतून पंप लावून हजारो लिटर पाणी गेले दोन दिवस उपसून बाहेर टाकत होते तेही त्यांना आठवले. ते दूरध्वनी करून कोणाला कळवायचे ते माहीत नसल्यामुळे  ते गप्पच राहिले होते. शेवटी तिसर्‍या दिवशी ते थांबले.


विषय निघाला त्यावरून राजवैद्यांना पूर्वीच्या एका दुष्काळाची आठवण आली आणि मनाची खपली निघाली. कर्करोग झाला त्याच्या उपचारांसाठी त्यांची काकी अकस्मात त्यांच्या घरी काकांसह आली होती. महिनाभर मुक्काम ठोकून, बरी होऊन परत गेली होती. काकी म्हणून राजवैद्यांनी सर्व काही केले होते. पु्नःतपासणीसाठी दोघे परत आले तेव्हा शहरात पाऊस सुरूच होत नव्हता. नक्षत्रे कोरडी जात होती. सर्वांच्या तोंडचे पाणी पळाले होते. काका-काकी राजवैद्यांच्या घरीच मुक्काम ठोकून होते. 'आता पाऊस आला नाही तर आम्ही सर्व जण पाण्यासाठी गावाला तुमच्या धरी येतो' असे राजवैद्यांच्या मातोश्री काका-काकींना सहज म्हणाल्या. क्षणभरही विचार न करता काकी म्हणाल्या, 'पाणी आम्ही देऊ, पण धान्य वगैरे तुम्ही भरा हो'. हक्काने आपल्या घरी येऊन, महिन्यामागून महिने आपल्याच खर्चात काढून, आपलेच सर्व काही फुकट वापरून, वर काकींनी असे म्हणावे हे राजवैद्यांच्या जिव्हारी लागले. पाण्यासाठी कोणीही गावाला गेले नाही. कालांतराने काका-काकी वयोपरत्वे वारले. पण पाऊस पडला नाही की राजवैद्यांची जुनी जखम परत भळभळ वाहू लागे.
(Key words: Drought, water wastage)

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क