Friday, November 13, 2015

सात जणी

दिवाळीचा पाडवा होता. 'मुंबई पुणे मुंबई २' चा पहिलाच शो होता. त्या सात मुली बाल्कनीच्या मागून दुसऱ्या रांगेत येऊन बसल्या. दहावी बारावीत शिकत असाव्यात. जाहिराती आणि इतर सिनेमांची ट्रेलर चालू होती तेव्हा त्यांची चिवचिव आणि एकमेकींच्या फिरक्या घेणं चालू होतं. पण सिनेमा सुरू झाला आणि सगळ्या एकदम गप्प झाल्या.  नायक आणि नायिकेचं लग्न ठरलं होतं. बोलणी वगैरे झाली होती. प्रेमविवाह होता. त्यामुळे प्रेम तर होतच. नायक स्वप्नील जोशी - चॉकलेट हिरो. त्याच्या छोट्याछोट्या गंमतीदार संवादांना त्या उस्फूर्तपणे एकसुरांत दाद देत होत्या. त्याच्या प्रेमाच्या संवादांवर उस्फूर्तपणे एकसुरांत उसासे टाकत होत्या. मध्ये एकदा नायिका आणि तिच्या आईचा सीन होता. नायिका अस्वस्थ होती. आईवडिलांचं घर सोडून परक्या घरांत जायचं म्हणून तिला एक अनामिक भिती पण वाटत होती. आईचं लहानपणापासूनचं प्रेम आठवत होतं. 'लग्न झाल्यावरपण आई तू मला पहिल्यासारखीच मेसेज करत रहात हां, म्हणजे बरोबर तू आहेस असं वाटेल आणि धीर येईल, करशील ना?' असं ती आईला म्हणाली. ती माउली मुलगी सासरी जाणार म्हणून आधीच व्याकूळ झाली होती. मुलीचं बोलणं ऐकून तिचा बांध फुटला. इथे सात जणींचाही बांध फुटला. उद्या कधीतरी त्या अशाच सासरी जाणार होत्या, त्या आजच आई वडिलांना सोडून निघाल्यासारख्या रडल्या. आपल्या आया अशाच रडतील म्हणून कासावीस झाल्या. त्यांच्या आयांना घरी पत्ता नव्हता असेल की आपल्या पोरींच्या ह्रुदयांत काय कालवाकालव होत असेल. त्या आपापल्या घरी जाऊन यांतलं काहीच सांगणार नव्हत्या हे नक्की. त्यांच्या अईवडिलांना ती वेळ आल्यावर ते घडलं की कळलंच असतं. पण मागच्या रांगेत बसलेल्या एका वयस्क ग्रुहस्थाला ते कळलं. त्याच्या पत्नीने डोळ्यांना रुमाल लावलाच होता. तिला स्वतःच्या लग्नाची वेळ आठवली असेल. आपल्याला मुलगी असती तर तीही अशीच आपल्या नकळत स्वतःच्या भविष्याच्या विचारांत रडली असती या विचाराने त्या ग्रुहस्थाचं पित्याचं ह्रुदय व्याकूळ झालं. चष्मा काढून त्याने रुमालाने डोळे पुसले. कसं कोण जाणे, त्याच्या पुढे बसलेल्या मुलीला काहीतरी जाणवलं. इंटर्वल झालं होतं. मंद दिवे लागले होते. तिने मागे वळून पाहिलं. त्या ग्रुहस्थाच्या चेहऱ्यावरचे कष्टी भाव बघितले. काय ते समजली आणि आपल्या लग्नाच्या वेळी आपला पिता असाच व्याकूळ होईल असं वाटून परत समोर बघायला लागली. मैत्रीणींची नजर चुकवून तिने परत डोळ्यांना रुमाल लावला.

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क