Thursday, November 19, 2015

पायघोळ अडचण

आटपाट नगरच्या राजाच्या रुग्णालयात शल्यक्रियागृहात प्रवेश करण्यापूर्वी आपले कपडे बदलून स्वच्छ हिरव्या रंगाचे सुती कपडे घालावे लागत असत. सदरा आणि पायजमा असा तो पेहेराव असे. जंतूसंसर्ग होण्याचे प्रमाण कमी व्हावे म्हणून हा नियम केला होता. कपडे रुग्णालय पुरवीत असे. ते रुग्णालयाचा धोबी धुवून देत असे. छोटे, मध्यम, मोठे असे भिन्न आकाराचे कपडे शिवण्याची तेथे पद्धत नव्हती. त्यामुळे माणूस कोणत्याही आकाराचा असो, त्याला मध्यम आकाराचे कपडे वापरावे लागत असत. स्त्री आणि पुरुष यांच्यासाठी भिन्न आकाराचे किंवा प्रकारचे कपडे नसत. नाहीतरी तोंडाला शल्यक्रियेचे मास्क लावले की पुरुष आणि स्त्री यांतला फरक कोठे समजत असे? छोट्या चणीच्या स्त्रियांना यामुळे एक त्रास होत असे. सदरा जरा लांब झाला किंवा त्याच्या बह्या कोपराखाली उतरल्या म्हणून काही फारसे बिघडत नसे. पण पायजम्याचे पाय पावलांच्या खालीपर्यंत पोहोचले की ते चालताना पायांत येत आणि अडखळून पडायला होत असे. खाली दाखविलेल्या छायाचित्रात ही गोष्ट स्पष्ट दिसते.


शल्यक्रियागृहात कधीकधी धावपळ करावी लागे. अशा वेळी पायांत पायजमा अडकून पडण्याचे प्रमाण जास्त असे. दुचाकी चालविताना तुमानीचे पाय चेनमध्ये अडकू नये म्हणून त्यांना लावायला क्लिपा वापरत असत. आटपाट नगरात त्या क्लिपा मिळत की नाही कोण जाणे. दुसरा सोपा उपाय म्हणजे पायजम्याचा पाय खोटेभोवती गुंडाळून त्यावर चिकटपट्टी लावणे. पण ते छान दिसत नाही म्हणून म्हणा की त्यामुळे उकडते म्हणून म्हणा, स्त्रिया तसेही करत नसत. अगदी पुनःपुन्हा पडायले झाले तरीही.
(Key words: Operation theater dress)

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क