Wednesday, November 11, 2015

क्रुतीशीलता

"गुरुजी, नवे वारे वाहू लागले आहेत हो" आटपाटनगरच्या राजाच्या रुग्णालयांतील राजवैद्यांनी जाहीर केले. "आमचे जुने ठोकताळे आता बहुधा मागे पडणार."
गुरुजी राजवैद्यांना चांगले ओळखत होते. ते जरा तिरकस बोलत आहेत हे त्यांच्या लगेच लक्षांत आले.
"ते कसे काय?" गुरुजींनी विचारले.
"पूर्वीसारखे र्वैद्यकशास्त्र आले की झाले असे हल्ली उरले नाही. नव्या दमाचे वैद्य आणि जुन्या दमाचे पण केस काळे केलेले वैद्य व्यवस्थापन वगैरेच्या कार्यशाळा करून येतात. क्रुतीशीलता (ज्याला management मध्ये proactivity असे म्हणतात) वगैरे मुळे रुग्णांवर उपचार अधिक कुशलतेने करता येतात असे ते म्हणतात."
"म्हणजे काय ते नीटसे कळले नाही" गुरुजी म्हणाले.
"गुरुजी, क्रुतीशीलता म्हणजे पुढे काय होणार याचा विचार करून आधीच योग्य ती पावले उचलणे. अतिशय योग्य अशी संकल्पना आहे ती. आता आमच्या क्रुतीशील वैद्यांनी काय केले ते पहा. आमच्या एका रुग्णाला आंतडे अडकण्याचा विकार झाला होता. ती दोन महिन्यांची गर्भार पण होती. शल्यक्रिया करून तिचे आंतडे सोडवावे अशी विनंती आम्ही शल्यक्रिया करणाऱ्या वैद्यांना केली. पण त्यांनी कार्यवाहीत विलंब केला. तिला जंतूसंसर्ग झाला. रक्तांत दोष निर्माण झाला आणि रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबली (ज्याला disseminated intravascular coagulation किंवा DIC असे म्हणतात). पोटात गर्भाचा म्रुत्यू झाला तरीही हा विकार होऊ शकतो. पण तिला तो विकार आधी झाला आणि नंतर तिच्या गर्भाचा म्रुत्यू झाला. कालांतराने तिची शल्यक्रिया झाली पण ती दगावली. माताम्रुत्यू अन्वेषणाच्या वेळी शल्यक्रिया करणऱ्या वैद्यांनी असा मुद्दा माडला की गर्भाच्या म्रुत्यूमुळे तिला तो रक्ताचा विकार झाला. आणि त्यामुळे ती दगावली."
"यांत क्रुतीशीलता कोठे आली? उलट निष्क्रियता दिसून आली" गुरुजी म्हणाले.
"गर्भ म्रुत झाल्यावर पांच आठवड्यांनी हा रक्ताचा विकार होतो. या रुग्णामध्ये आता गर्भ मरेल अशी परिस्थिती आली आणि शल्यक्रिया करणारे वैद्य क्रुतीशील असल्यामुळे हा रक्ताचा विकार आधीच झाला. निदान असे त्यांच्या म्हणण्यावरून वाटते. हे क्रुतीशीलतेचे उदाहरण असावे" राजवैद्य म्हणाले. "मी भरल्या बैठकीत तसे सर्वांसमोर म्हणालो देखील."
"मग ते काय म्हणाले?"
"काही नाही. गप्प बसले."
(Keywords: proactivity in medicine)

प्रशंसा करायचीय, नावे ठेवायचीयेत, काही विचारायचय, किंवा करायला आणखी चांगले काही सुचत नाहीये, तर क्लिक करा.

संपर्क